पुणे/दि/ प्रतिनिधी/
बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावरील गंगाधाम चौकातील सॉलिएटर गृहप्रकल्पालगत असलेले पुणे महापालिकेचे सार्वजनिक शौचालय बांधकाम व्यावसायिक, पुणे महापालिकेतील अधिकारी आणि नगरसेवकांच्या संगनमताने जमिनदोस्त करण्यात आले आहे. सार्वजनिक शौचालयासाठी नगरसेविका मानसी देशपांडे व सुनिल कांबळे यांच्या २०१५-१६ मधील नगरसेवक निधीतून तरतुद करण्यात आली होती. पुणेकर नागरीक दिवाळीच्या लक्ष्मीपुजनाच्या लगबगीत असतांनाच बुधवार दि. ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
गंगाधाम चौकात मोठ मोठे गृहप्रकल्प व व्यावसायिक प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेचे सार्वजनिक शौचालयाचा त्रास या बांधकाम व्यावसायिकांना होत होता. सार्वजनिक शौचालय असल्यामुळे भाव मिळत नसल्यामुळे पुणे महापालिकेतील अधिकारी/ कर्मचारी, बांधकाम व्यावासयिक व नगरसेवकांनी पुणे महापालिकेच्या मालकीची स्थायी स्वरूपाची मालमत्ता नष्ट करण्यात आली आहे.
गंगाधाम चौक ते कोंढव्यापर्यंत कुठेही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे या भागात येणार्या जाणार्या प्रत्येकाची कुचंबना होते. विशेषतः महिला वर्गाची मोठी कुचंबना होत आहे. सार्वजनिक शौचालय रातोरात पाडल्यामुळे नागरीकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे.
बिल्डरलॉबीसाठी पैशांची उधळपट्टी –
पुणेकरांनी कर रूपाने भरलेला पैशांची उधळपट्टी सुरू आहे. बिल्डर लॉबीसाठी बुधवारी मध्यरात्री रातोरात सार्वजनिक शौचालय पाडून, पुणे महापालिकेचे आर्थिक नुकसान करण्यात आलेले आहे. पुणे महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात आले असल्याने बांधकाम व्यावसायिकांविरूद्ध गुन्हे दाखल करून बांधकाम व्यावसायिकाकडून पुनः आहे त्याच जागेवर सार्वजनिक शौचालय बांधण्याचा आदेश पुणे माहपालिका आयुक्तांनी करण्याची नागरीकांनी मागणी करण्यात आली आहे. बांधकाम प्रकल्प सुरू होण्याआधीपासून हे शौचालय अस्तित्वात होते.
त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाने केलेले दुष्कृत्य वाईट हेतूने करण्यात आले आहे. त्यामुळे आहे त्या जागेवर तातडीने शौचालय बांधण्याची मागणी होत आहे.