पुणे/दि/ प्रतिनिधी/
टू आणि फ्रॉम नेमकं कुणाला करावं, टिपण कसे घ्यावेत, पत्रलेखन कसे करावे, कनिष्ठ वा वरीष्ठ अधिकार्यांना पत्रव्यवहार करतांना कोणत्या आदरयुक्त शब्दांनी पत्रव्यवहार करावा यासहित लिपिक संवर्गाचे काम सुरू असते. परंतु हाच कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक आजही पदोन्नतीच्या वाटेवर गेल्या दशकभर पुणे महापालिकेतील अधिकार्यांच्या दयामर्जीची वाट पाहत बसला आहे. परंतु पदोन्नतीचा नियत कालावधी उलटून दीडपट कालावधी उलटून गेला असतांना देखील पुणे महापालिकेत पदोन्नतीचा निर्णय होतांना दिसत नाहीये. लिपिक संवर्ग हा तसा दुर्लक्षिलेला इसम म्हणून ओळखला जातो. नागरीकांशी थेट संबंध येत असल्यामुळे तर दर दिवसाला शंभरऐक शिव्याशाप त्यांनाच नियमित सहन कराव्यात लागत आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेतील कनिष्ठ लिपिकांची नियमित भरतीसह पदोन्नतीचे आदेश तातडीने काढण्याची मागणी होत आहे.
लिपिक संवर्ग हा प्रशासनाचा उजवा हात –
शासनाच्या कोणत्याही कार्यालयातील लिपिक संवर्ग हा शासनाचा उजवा हात म्हणून ओळखला जातो. परंतु हा उजवा हात नेमका कुणालाही दिसत नाहीये. त्यामुळेच त्याचे सातत्याने कलम करण्याचे काम निर्णयक्षमता असलेल्या अधिकार्यांकडून केले जात असल्याचे सांगितले जात आहे. पुणे महापालिकेत कनिष्ठ लिपिकांच्या सुमारे ३०० पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. तर कनिष्ठ लिपिक ते वरीष्ठ लिपिक या संवर्गातील २५० पेक्षा अधिक जागा/पदे पदोन्नतीविना रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत. कनिष्ठ लिपिकांना पदोन्नती देत नसल्यामुळे त्यांच्यात कमालिचा असंतोष निर्माण झाला आहे.
दरम्यान एखाद्या कार्यासनातील लिपिक संवर्गातील कर्मचारी आले नाहीत तर सगळे कामकाज ठप्प होवून जाते. अधिकारी जागेवर असले तरी लिपिकांच्या अभावी सगळे काम रेंगाळून पडते हा अनुभव आहे. वर्ग १ आणि दोन यांना केवळ सह्या करणं इतकंच ठाऊक आहे. परंतु कोणत्याही विषयाला नियमात बसविण्याचे काम हे लिपिक संवर्गाकडून केले जाते. त्यामुळे कार्यालयातील त्यांचे महत्व अधिकार्यांपेक्षा कमी दर्जाचे नाही हे देखील तितकेच खरे आहे.
पोलीस विभागातील आंधळा कारभार –
गृह व पोलीस विभागात महसुल विभागातूनच लिपिक संवर्गाची भरती केली जाते. परंतु पुरेशा प्रमाणात कर्मचारी नसल्यामुळे बहुतांश कामे ही पोलीस कर्मचार्यांकडून करवुन घेतली जातात. तथापी अधिकार्यांनी डिक्टेशन दिल्यानंतर, विषय समजुन सांगितल्यानंतर देखील टू कुणाला करावे आणि फ्रॉम नेमकं कुणाला करावं हा प्रश्न देखील कर्मचारी विचारत असल्यामुळे
फरासखान्यातील एका डीसीपींनी तर माझ्या समोरच कपाळालाच हात लावला होता. माझ्याकडे तोंड करून म्हणाल्या की, असा स्टाफ असेल तर काम कसं करायचं.. अनिरूद्ध.. कार्यालय चालविणे एवढंही सोप्पं नाहीये.
शासनातील बहुतांश कार्यालये व विभागात लिपिक संवर्गाचे काम मोठ्ठ आहे. परंतु पदाचं मूल्यमापन चुकीच्या पद्धतीने केल्याने तसेच वर्ग ३ व वर्ग ३ मधील ड विभाग म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.
अधिकार्यांपेक्षा लिपिकांनाच शिव्याशाप-
पुणे महापालिका असो किंवा राज्य शासनाची कार्यालये. या सगळ्या कार्यालयात अधिकारी जागेवर नसले तरी नागरीकांचे कोणतेही काम अडत नाहीये. परंतु जर प्रशासकीय कर्मचारी जागेवर नसतील तर नागरीकांचा पारा गगनाला भिडलेला असतो.
एखादी थोडी चुक झाली तरी नागरीक आणि महापालिका सदस्यांच्या रोषाला प्रथम लिपिकांना सामोरे जावे लागते. दर दिवशी एका एका लिपिकाला किमान शंभरऐक शिव्याशाप खाव्या लागत असतील यात शंकाच नाही.
पुणे महापालिकेतील लिपिक संवर्गातील बदल्या नेमक्या कधी –
तांत्रिक खात्यात गोचिडा सारख्या कर्मचार्यांची बदली कधी …
पुणे महापालिकेत गेल्या कित्येक वर्षांपासून कनिष्ठ लिपिक व वरीष्ठ लिपिकांच्या बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. बदल्या केल्या तरी अधिकारी वर्ग जुन्या कर्मचार्यांना सोडत नाहीत. त्यामुळे बदली आदेश निघाला तरी लिपिक संवर्गातील कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर होण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान या पैकी काही लिपिक एवढे हुश्शार आहेत की, मागील १५ ते २० वर्षांपासून एकाच जागेवर कायम आहेत. अधिकारी आले आणि गेले, कर्मचारी मात्र आहे त्याच कार्यालयात कार्यरत आहेत.
ज्या ठिकाणी खाण्याचे काम आहे त्याला इंग्रजी भाषेत क्रिम ऑफिस असं म्हटलं जात. तर त्या क्रिम कार्यालयातील कर्मचारी गोचिडासारखे चिटकुन बसले आहेत. एकाही कर्मचार्याला आत येऊ देत नाहीत व आतले बाहेर जाऊ देत नाहीत.
पुणे महापालिकेतील बांधकाम विभाग, पथ विभाग, ड्रेनेज विभाग, मलःनिस्सारण- ड्रेनेज विभाग, या सारख्या एकुण आठ तांत्रिक खात्यासह आरोग्य व क्षेत्रिय कार्यालयातील स्थापत्य व विद्युत विभागातील लिपिक संवर्गातील कर्मचारी अगदी घट्ट चिटकुन बसले आहेत. तर दुसरीकडे सामाजिक विकास विभाग, गवनीसहित इतर ५५ ओसाड विभागात मात्र शेकडोंनी कर्मचारी आहे त्याच पदावर काम करीत आहेत.
प्रत्येक लिपिकाला प्रत्येक खात्यातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाच्या बदली धोरणानुसार, दर तीन वर्षांनी बदली होणे आवश्यक आहे. त्याशिवाय विहीत कालावधीत पदोन्नती होणे देखील तितकेच महत्वाचे आहे. परंतु यापैकी कोणतीही बाब पुणे महापालिकेत होताना दिसत नाहीये. त्यामुळे लिपिक संवर्गात एक प्रकारची मगरळ आली आहे. बदली, सक्तीची बदली आणि पदोन्नती आदेशाखेरीज हा गुंता सुटणे आता शक्य नाहीये.
त्यामुळे पुणे महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागात गेल्या कित्येक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या लिपिकांनी आता आपल्या इतर लिपिक सहकार्यांना मदतीचा हात देवून, विहीत कालावधीत बदलीचे आदेश व विहीत नियमानुसार पदोन्नतीचे आदेशांच्या फाईल्स अधिकार्यांच्या टेबलवर पाठविणे आवश्यक ठरत आहे.
पुणे महापालिकेतील साप्रवि बाबत अनेक मुद्दे आहेत. परंतु ते आत्ताच नको.. नाहीतर तर शिल्लक राहिली माहिती देखील मला मिळणे अवघड होवून बसेल. त्यामुळे तुर्तास इतकेच. (क्रमशः)