Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे पोलीस आयुक्तालयाची कमाल आणि पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाची धमाल

police pune

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/

                महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील सुचनेनुसार, प्रत्येक कार्यालयाची रचना व कार्यपद्धती निश्‍चित करून ती गट अ ते ड लोकसेवकांसाठी व नागरीकांच्या माहितीसाठी तत्काळ सादर करणे आवश्यक आहे. तथापी पुणे पोलीस आयुक्तालयातून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन निर्माण झाल्यापासून, पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील यंत्रणाच ठप्प पडली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन असले तरी, त्यांनी देखील विहीत वेळेत कार्यालयाची र व का पूर्ण करणे आवश्यक आहे. तथापी दोन्ही कार्यालयांचा कारभार ठप्प झाला असल्याचे दिसून येत आहे.

                पोलीस आयुक्त, सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व त्यांच्याकडील पोलीस ठाणी, त्यांचे कार्यक्षेत्र ह्याबाबी प्रथमतः जाहीर करणे आवश्यक आहे. तथापी ही सर्व माहिती काही पोलीसांच्या मोबाईलवरील व्हॉटसअप वर दिसून येते. पुणे पोलीसांची वेबसाईट म्हणजे विठाबाई किंवा रघुविर खेडकरसह कांताबाई सातारकर यांच्या तमाशा मंडळापेक्षा अधिकच वाईट आहे. तिथं तर काहीच नाही. पुणे पोलीसांची जीओव्हीची वेबसाईट तर बंदच आहे. तर बर्‍याच जणांना याची माहितीच नाही.

                दरम्यान १०७ व ११० च्या प्रकरणांत पळापळ सुरू आहे. खडकी सहायक पोलीस आयुक्तांच्या जागेवर येरवडा एसीपी आले, खडकीपासून दूरवर औंध येथे वि.वाडी- खडकीला पाठविले तर येरवड्याला नगर रोडवरून खडकीत आणले. कोणत्या बहाद्दराचे हे डोके असेल याचा आता मलाच प्रश्‍न पडला आहे. खडकी एसीपी कार्यालयात आहे त्या जागेवर ठेवून, येरवडा  एसीपींना येरवडा पोलीस ठाण्यात तात्पुरती जागा करून, तेथे कार्यालय सुरू करता आले असते. मग खडकी एसीपींना औंध मध्ये पिटाळण्याची आवश्यकता काय होती…

                त्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी तर कमालच केलीय. म्हणे वॉकीटॉकीवरून कार्यालयीन आदेश जारी केलाय. खरं तर त्यांनी कार्यालयीन अर्धशासकीय परिपत्रक काढुन अधिकार्‍यांना समज देणे आवश्यक होते. दरम्यान ते काढले असले तरी वॉकीटॉकी वरून अधिकार्‍यांना समज देणे ही पद्धत भयंकर आहे. बरं समजा उद्या कुणी मॅट मध्ये गेलेच तर अर्धशासकीय परिपत्रक सादर करणे सोईचे झाले असते. मध्यंतरी पुणे पोलीस आयुक्तालयातील ४८ पोलीस कर्मचारी मॅट मध्ये गेले होते. त्यावेळी बदलीची कारणमिमांसा आयुक्तालयास करता आली नव्हती. आता ती चूक पिंपरी पोलीस आयुक्तालयाने करणे आवश्यक नाही. आम दरबार किंवा खास दरबार भरवुन पोलीसांना बदल्यांबाबत अवगत करणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही.

                दरम्यान पुणे पोलीस आयुक्तालयाने भर रविवारी म्हणजे २९/७/२०१८ रोजी २५ पोलीसांच्या बदल्यांचे गॅजेट जारी केले आहे. मागील १०० वर्षात जे झाले नाही ते २०१८ मध्ये पुणे पोलीसांनी करून दाखविले… ही चूक लक्षात येताच, त्यावर पांघरूण घालण्यासाठी पुन्हा ५० की १५० पोलीसांच्या विनंती बदल्यांचे आदेश जारी केले.

                या सर्व बदली प्रकरणावरून पुणे व पिंपरीत पोलीस आयुक्तालयात वादंग माजले आहे. दरम्यान पुरब-पश्‍चिम= उत्तर -दक्षिण हे काहीतरी ठरवा. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी दसरा अगदी तोंडावर आलाय,

                दरम्यान अजूनही कार्यालयांचे बोर्डच रंगविण्यात वेळ गेला तर कायदा आणि सुव्यवस्थेचे पुढे काय… सगळीच गंम्मत जंम्मंत..आहे की नाही… पुणे पोलीसांची कमाल आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची धमाल…!!!!!