Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे- आंबेडकर

मुंबई/दि/ प्रतिनिधी/
नवी मुंबई मध्ये अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या विमानतळा साठी रायगड जिल्ह्यातील उलवे कोपर पनवेल या पट्टयातील मूळ रहिवासी व भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळी बांधवांनी जमिन दिली आहे. या बांधवांनी इथलेच भूमिपुत्र असलेल्या दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी जोरदार मागणी केलेली आहे.


नवी मुंबई च्या इतिहासात दि.बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे. नवी मुंबई साठी ज्या भूमिपुत्रांनी जमिन दिली त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला त्याचे नेतृत्व दिबांनी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात देखिल दिबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते.
पनवेल चे नगराध्यक्षपद भूषविलेल्या दि. बा. नि लोकसभेत त्यांनी चार वेळेस रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषविले.
या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांची समाज भूषण दिबांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळा साठी दान देणार्‍या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोक नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे.