Sunday, November 17 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी दोन अभियंते निलंबित, लाखनीची खातेनिहाय चौकशी

उपायुक्त जयंत भोसेकरांकडून होत होती पाठराखण, अखेर गिते आणि परदेशी निलंबित….,
रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण /
धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाकडील निविदा कामात झालेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी केलेल्या तक्रार अर्जांवर चौकशी होवून, अखेर शाखा अभियंता अजय परदेशी आणि कनिष्ठ अभियंता गणेश गिते यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच उपअभियंता कन्हैयालाल लाखनी यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत.

धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाने माहे २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांच्या कालावधीत निविदा कामांमध्ये कमालिचा भ्रष्टाचार करण्यात आलेला होता. कामे न करताच बिलांची वसूली करण्यात येत होती. एका ठिकाणी कामाचे क्षेत्र दाखवुन दुसर्‍या ठिकाणी कामे केल्याचे दाखवुन देखिल बिलांची वसूली करण्यात आली आहे. दरम्यान बेरोजगार सहकारी स्वयंरोजगार संस्थांना देण्यात आलेल्या विना निविदा कामांमध्ये  देखील भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाला आहे. 
याबाबत पुणे महापालिका उपायुक्त परिमंडळ क्र. ३ श्री. जयंत भोसेकर यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करीत असतांना, श्री. जयंत भोसेकर यांनी धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाकडील बेजबाबदार अभियंत्यांना सातत्याने पाठीशी घालण्यात आले होते. भ्रष्टाचार झालाच नसल्याचा निर्वाळा श्री. भोसेकर देत होते. दरम्यान याबाबत महापालिका आयुक्त यांचेकडे अर्ज केल्यानंतर, वरील अर्ज हा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचेकडे चौकशी कामी आलेला होता. अतिरिक्त आयुक्त श्री. बिनवडे यांनी तातडीने चौकशीचे आदेश देवून, भ्रष्टाचार व गैरव्यवहारांची माहिती घेतली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शाखा अभियंता श्री. परदेशी व कनिष्ठ अभियंता श्री. गिते यांनी महागैरव्यवहार केल्याचे दिसून आले आहे. याबाबत उपअभियंता श्री. लाखनी यांनी देखील प्रकरण दाबुन टाकण्याचा अटोकाट प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळेच श्री. बिनवडे यांनी उपअभियंता श्री. लाखनी यांचीही खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

आता बारी रजत बोबडेंची –
धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाकडील विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. रजत बोबडे यांनी देखील विदयुत निविदा कामांत भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत. याबाबत देखील उपआयुक्त श्री. जयंत भोसेकर यांनी रजत बोबडे यांची पाठराखण करण्यात आली आहे. रजत बोबडे यांनी देखील एकुण १५ कामांमध्ये भ्रष्टाचार व गैरव्यवहार करून, न केलेल्या कामांचे बिले काढण्यात आली आहेत. त्यामुळेच गिते, परदेशी आणि लाखनी नंतर आता रजत बोबडे यांचे निलंबन करण्याची मागणी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी केली आहे.