मुंबई/दि/ प्रतिनिधी/
सदैव प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची हौस आणि आपले मनोरथ उघड न करता लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याची सवय यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेले ३ दिवस दिल्लीत केलेली भाषणे म्हणजे परस्पर विसंगत विधाने, संघाच्याच इतिहासाशी बेईमानी आणि लोकांच्या मनात सतत संभ्रम निर्माण करण्याच्या सवयीचं उत्तम उदाहरण आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी गांधीभवन इथं पत्रकार परिषदेत केली.
वैचारिक दारिद्र्याचं प्रदर्शन
आगामी २०१९ च्या निवडणुका जवळ येत असून आपल्या कामगिरीमुळे त्या जिंकता येणार नाहीत अशी खात्री वाटल्याने पुन्हा एकदा राम मंदिराचं भूत त्यांनी उभं केलं आहे. हिंदू आणि मुस्लिम हे भारतीयच असल्याने त्यांच्यात भेद करणं संघाला मान्य नाही आणि हिंदू राष्ट्र हे मुस्लिमांशिवाय असूच शकत नाही, असं आपल्या वैचारिक दारिद्र्याचे प्रदर्शन करणारं विधान त्यांनी केले आहे. हे जर खरं असेल तर राम मंदिराच्या बरोबरीने त्याच जागेवर त्यांच्या अनुयायांनी पाडलेली बाबरी मशीद पुन्हा बांधून देण्याचा शब्द ते देतील काय? असा सवाल डॉ. महाजन यांनी केला.
वित्त आयोगाची फरफट
केंद्रीय वित्त आयोगाचे प्रतिनिधी राज्यातील सरकारी व बिगर सरकारी तसंच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी नुकताच राज्यात आले होते. या बैठकीपूर्वी केंद्रीय वित्त आयोगाने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीचं विदारक चित्र जाहीर पत्रक काढून उभं केलं होतं. मात्र केवळ ४ दिवसात वित्त आयोगाने कोलांटीउडी मारून राज्याच्या आर्थिक स्थितीचे कौतुक करून टाकलं. यापैकी वित्त आयोगाचं खरं मत कोणतं समजायचं?
आपण दिलेल्या आकडेवारीची जबाबदारी वित्त आयोगाने राज्याच्या महालेखापालांवर टाकली असून त्यांनी दिलेल्या आकडेवारीच्या आधारे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने हे पत्र प्रसिद्ध केल्याचे अजब स्पष्टीकरण देऊन वित्त आयोगाने विश्वामित्री पवित्रा घेतला आहे. केंद्र आणि राज्य पातळीवरील भाजपच्या ‘सुशासनाचा’ दावा फोल ठरवणारा हा गोंधळ कुणाच्या दबावामुळे झाला हे जाणून घेण्याचा अधिकार लोकांना असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.