Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

किती पिढ्या आरक्षण सुरू राहणार असा सवाल सर्वोच्च न्यायालय कसा करू शकते?:

पुणे/दि/ प्रतिनिधी/
सर्वोच्च न्यायालयात सध्या मराठा आरक्षणप्रश्नी सुनावणी सुरू असून ‘तुम्ही किती पिढ्या हे आरक्षण सुरू ठेवणार आहात?’ असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान केला. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आक्षेप घेतला असून आरक्षण किती काळ राहणार असा सवाल सर्वोच्च न्यायालय कसा करू शकते?, असा सवाल केला आहे.


मराठा आरक्षणावरील सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी मंडल आयोग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय १९३१ च्या जनगणनेवर आधारित होता. आताची बदललेली परिस्थिती पाहता आरक्षणाचा कोटा ठरवण्याची जबाबदारी ही राज्यांवर सोपवली पाहिजे. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णयही ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन करणारा आहे, असा शुक्रवारी युक्तिवाद केला.
रोहतगी यांच्या युक्तिवादादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आरक्षणाची ५० टक्के मर्यादा किंवा मर्यादाच नसेल तर समानतेच्यी संकल्पना काय असेल?
शेवटी, आपल्याला या स्थितीला सामोरे जावे लागेल, यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे? त्यातून उद्भवणार्‍या असमानतेबद्दल आपल्याला काय म्हणायचे आहे? तुम्ही किती पिढ्या हे आरक्षण पुढे सुरू ठेवणार आहात? असे सवाल सर्वोच्च न्यायालयाने केले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आक्षेप घेतला असून आरक्षण किती काळ सुरू राहणार यासारखे प्रश्न सर्वोच्च न्यायालय कसे काय करू शकते? स्थापित व्यवस्थेच्या धोरण किंवा सकारात्मक कृतींवर सवाल करण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाने न्यायदानावर ठाम राहिले पाहिजे, असे बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे.