Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यात ना पोलीसांची भिती, ना कायदयाचा धाक, रस्त्यावर पडतायत बिनधोक मुडदे, 2030 पर्यंत पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जाणार काय…

नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/
पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांवर जबरी कारवाई सुरू आहे. सहा महिन्यापूर्वी पदभार स्वीकारलेल्या पोलीस आयुक्तांनी मकोका व एमपीडीए या कायदयाखाली प्रत्येकी अर्ध शतक गाठले आहे. यापूर्वीच्या पोलीस आयुक्तांचा रेकॉर्ड मोडणार यात शंकाच राहिली नाही. दरम्यान जबरी कारवाई करून देखील आजही गुन्हेगारांच्या मनांत पोलीसांची भिती नाही, कायदयाचा धाक राहिला असल्याचे दिसत नाहीये. गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांची शहरात दशहत आहेच, कारवाईचा हाच वेग राहिला तर 2030 पर्यंत पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून नावलौकिक मिळवेल असेच काहीसे चित्र सध्या दिसत आहे. 18 ते 22 वर्षापर्यंतची मुले गुन्हेगार का होत आहेत यावर विचार मंथन होण्याऐवजी केवळ कारवाईच धडाका सुरू असल्याचे दिसत आहे.

मंगला टॉकिजसमोर तरुणाचा खुन करणाऱ्या 17 आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक-
पुणे शहर पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पुणे स्टेशन जवळील मंगला टॉकिजच्या बाहेर ताडीवाला रोड येथे राहणारा नितीन मोहन म्हस्के याची निर्घृन हत्या झाली. हत्येनंतर संपूर्ण पुणे शहर खडबडुन जागे झाले. त्यातच वेगवेगळ्या गुन्हे शाखेची पथके तयार करून गुन्हेगारांचा माग काढला आहे. त्यात गुन्हे शाखेच्या सहा पथकांनी 17 आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली आहे.
नितीन म्हस्के हा मंगला टॉकिज येथे गदर – 2 हा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. चित्रपट पाहून मित्रासोबत दुचाकीवरुन घरी जात असतांना, पूर्ववैमनस्यातून टोळक्याने दुचाकीवरुन येऊन नितीन म्हस्के व त्याचा मित्र सतिश आनंदा वानखेडे यांना खाली पाडून नितीन याच्यावर तलवारी, पालघन, लोखंडी हत्याराने हल्ला करुन त्याचा खून केला. याबाबत सतिश वानखेडे याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर कोळानट्टी उर्फ यल्ल्या, मलिक उर्फ मल्या कोळी, इम्रान शेख, पंडीत कांबळे, विवेक उर्फ भोला, लॉरेन्स पिल्ले, सुशील सूर्यवंशी, मनोज हावळे, आकाश उर्फ चडी, रोहन उर्फ मच्छी यांच्यासह इतर 7 ते 8 जांवर आयपीसी 302, 141, 142, 143, 144, 145, 147, 148, 149 आर्म ॲक्ट नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान हत्या केल्यानंतर, आरोपींनी पलायल केले. पोलीस त्यांच्या मागावर होतेच. अखेर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागर उर्फ यल्ल्या व त्याचे साथीदार लातुर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, पुणे शहर परिसरात तसेच कर्नाटक राज्यातील रायचुर, बेळगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्याद यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कर्नाटकात जाऊन आरोपींचा शोध घेऊन 5 जणांना ताब्यात घेतले. सागर उर्फ यल्ल्या ईराप्पा कोळानट्टी (वय-35 रा. ताडीवाला रोड, सध्या रा. हडपसर), सुशिल अच्युतराव सुर्यवंशी (वय-27 रा. ताडीवाला रोड, पुणे), शशांक उर्फ वृषभ संतोष बेंगळे (वय-21 रा. ताडीवाला रोड), गुडगप्पा फकीरप्पा भागराई (वय-28 रा. बुद्धविहार जवळ, ताडीवाला रोड) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला रायचुर, हुबळी येथील दुर्गम भागात शोध घेऊन ताब्यात घेतले.

दरम्यान गुन्हे शाखेच्या एका पथकाने विश्रांतवाडी, पुणे शहर, चौफुला, पुणे ग्रामीण भागातून 5 आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. मलेश उर्फ मल्ल्या शिवराज कोळी (वय-24 रा. भाजी मार्केट, ताडीवाला रोड), किशोर संभाजी पात्रे (वय-20 रा, रमाबाई आंबेडकर रोड, पुणे), साहिल उर्फ सल्ल्या मनोहर कांबळे (वय-20 रा. महात्मा फुले वसाहत, ताडीवाला रोड), गणेश शिवाजी चौधरी (वय-24 रा. कुंजीरवाडी, ता. हवेली), रोहित बालाजी बंडगर (वय-20 रा. ताडीवाला रोड) यांना अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या दोन पथकांनी या गुन्ह्यातील एकूण 10 आरोपींना ताब्यात घेतले.

याशिवाय खंडणी विरोधी पथक एकने केशवनगर, मुंढवा, पुणे शहर भागात आरोपींचा शोध घेतला. पथकाने विवेक उर्फ भोला भोलेनाथ नवघरे (वय-25 रा. मुळीक कॉम्पलेक्स, रामवाडी), इम्रान हमीद शेख (वय-31 रा. झेड कॉर्नर, केशवनगर) यांना ताब्यात घेतले.दरोडा व वाहन चोरी पथकाने खडकवासला, पुणे ग्रामीण ( ) भागातून आकाश उर्फ चड्डी सुनिल गायकवाड (वय-22 रा. उत्तमनगर) याला ताब्यात घेतले.

गुन्हे शाखा युनिट दोन या पथकाने खराडी, कल्याणीनगर याभागात आरोपींचा शोध घेऊन लॉरेन्स राजु पिल्ले (वय-36 रा. ताडीवाला रोड), मनोज उर्फ बाबा विकास हावळे (वय-23 रा. जोगमाया मिनीमार्केट जवळ, ताडीवाला रोड), रोहन उर्फ मच्छी मल्लेश तुपधर (वय-23), विकी उर्फ नेप्या काशीनाथ कांबळे (वय-22 दोघे रा. नवरत्न तरुण मंडळाजवळ, ताडीवाला रोड) यांना ताब्यात घेतले आहे.

सर्व आरोपी हे 18 ते 25 वयोगटातील आहेत. तसेच त्यांच्या पूर्वी दहा/दहा पंधरा पंधारा  गुन्ह्यांच्या नोंदी आढळुन आलेल्या आहेत. पुणे शहराच्या बहुतांश भागातील गुन्हेगारांचे वय 18 ते 25 मधील आहेत. त्यामुळे ही गुन्हेगारी का वाढत आहे यावर अन्वेषण होण्याची आवश्यकता आहे. गुन्हा घडल्यानंतर, पळापळ करणे हा कायदयाचा भाग आहेच, परंतु कमी वयातील मुले शिक्षण सोडून गुन्हेगारी क्षेत्राकडे का वळत आहेत, त्यांच्या मागे कोणती शक्ती कार्यरत आहे, डोकं नेमकं कुणाचे आहे याचाही शोध घेणे गरजेचे आहे. तसेच कारागृहातून सोडविण्यासाठी कोण लोक पुढे येतात यावर पोलीसांचे लक्ष असणे आवश्यक आहे.  गुन्ह्याची हीच सरासरी राहिली तर 2030 पर्यंत पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून उदयाला येते की अशी आज शंका निर्माण झाली आहे. 

पोलीसांची भिती, कायदयाची भिती गुन्हेगारांच्याच काय पण सामान्यांच्या मनांत देखील राहिली पाहिजे. कायदयाच्या राज्यासाठी, कायदयाचा धाक असणे आवश्यक आहे, अन्यथा नागरीक प्राण्यापेक्षाही अधिक क्रुर बनु शकतो. ते पुणेकर आज पाहत आहेत. आज पोलीस उपआयुक्त हातात दंडा घेवून फिरत आहेत, अंमलदार मात्र रस्त्यावर दिसत नाहीत हीच पुणे शहराची ओळख ठेवायची आहे काय याचाही विचार होणे आवश्यक आहे.