Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

स्वारगेट-मार्केटचा शाहू त्याला का मानलाय पोलीसांनी भाऊ

Swarget police pune shau
  1. स्वारगेट-मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील एकुण गुन्हेगार किती, एकुण शस्त्रसाठा किती- त्यातही अग्नीशस्त्र किती, एकुण अमली पदार्थांचा साठा किती, अबबब… कोणत्या युद्धाचा सराव सुरू आहे.
    2 स्वारगेट – मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या चारही दिशांना एक हजारापेक्षा अधिक गुन्हेगारांचा ताफा
  2. मोक्का- एमपीडीए खालील गुन्हेगारांचा सहभाग असलेल्या शाहूच्या धंदयांना स्वारगेट मार्केटयार्ड पोलीसांचे संरक्षण कवच कशासाठी…
  3. जुगार मालकांवर तडीपारी आणि एकाच हद्दीत दोन वेळा कारवाई झालेल्या पोलीस स्टेशनच्या वरीष्ठ पोलीसांची बदली नक्की होणार?
  4. पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
    पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचे श्री. राजेश पुराणिक यांनी अवैध धंदयाविरूद्ध मोहिम उघडली आहे. पे बॅक टू सोसायटी अर्थात आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने ते शासकीय कर्तव्य पार पाडत आहेत. दुसरीकडे मात्र स्थानिक पोलीसांना सोबत घेवून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांनी नव नव्या शक्कल लढवुन अवैध धंदे चालु ठेवले जात आहेत. स्वारगेट व मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत शाहू व हसन या दोन अवैध धंदयाच्या माफियांनी पुरता उच्छाद मांडून ठेवला आहे. सोबतीला स्वारगेट व वानवडी हद्दीतील तडीपार व मोक्कातील गुन्हेगारांना सोबत ठेवून स्वारगेट व मार्केटयार्ड या दोन पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 22 पेक्षा अधिक अवैध जुगार अड्डे शाहू नावाच्या इसमाने चालु ठेवले आहेत तर हसन याचेही तेवढेच धंदे असल्याचे समोर आले आहे. अवैध धंदयावरील कारवाई गुन्हे शाखेसह सर्वच स्थानिक पोलीसांनी करणे अपेक्षित असतांना, स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांकरवी सुरू असलेल्या अवैध धंदयाकडून हप्ता वसुली करणारे पोलीस कर्मचारी यांच्या आशिर्वादाने सुरू असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे या सर्व गंभिर प्रकरणांची दखल घेवून हद्दीत सुरू असलेली दहशत व गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेला ॲलर्ट करणे आवश्यक ठरले आहे.

अबबब… कोणत्या युद्धाचा सराव सुरू आहे –
स्वारगेट व मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत अनेक बेकायदेशिर व अवैध स्वरूपाचे धंदे कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. खाजगी सावकारी आणि जुगार अड्डे हीच स्वारगेट व मार्केटयार्ड पोलीस स्टेशनची ओळख झाली आहे. दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाच्या मोहिमेविरूद्ध लढा देण्यासाठी स्वारगेट व मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या दहाही दिशांना गुन्हे शाखेच्या पोलिसांवर पाळत ठेवण्यासाठी गुन्हेगारांकडून खबऱ्याचे जाळे निर्माण केले असल्याचेही दिसून येत आहे.
स्वारगेट व मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 1200 पेक्षा अधिक गुन्हेगार कार्यरत असल्याचे व त्यांच्याकडे गंभिर दुखापत करणाऱ्या शस्त्रासह अग्निशस्त्र असल्याचे आढळुन आले आहे. बाराशे गुन्हेगारांकडे अग्निशस्त्रासह सत्तुर, कुकरी, रॅम्बो सुरा, लोखंडी गज, या सराखी घातक शस्त्रे बाळगली जात असल्याचेही समोर आले आहे. एवढी शस्त्रे नेमकी कुठून आली ह्याचाही तपास होणे आवश्यक आहे. ही बाब स्वारगेट व मार्केटयार्ड पोलीसांना माहिती नाहीत हे कशाच्या आधारे मान्य करायवयाचे हा प्रश्न असला तरी कायदा आणि सुव्यवस्था नावाचा काही प्रकार शिल्लक ठेवलाय की नाही असा सवाल निर्माण होत आहे. कोणत्या युद्धाचा सराव सुरू आहे हे पुढील काळातसमोर येईलच. परंतु खबरदारी घेणे आवश्यक आहे.
अवैध धंदयाविरूद्ध कारवाई होऊ नये म्हणून खबऱ्यांचे जाळे-
स्वारगेट व मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील शाहू व हसन या दोन इसमांचे 22 + 9 असे अवैध धंदे असून या अवैध व बेकायदेशिर धंदयावर कारवाई होऊ नये म्हणून खबऱ्यांचे जाळे कसे विणले आहे त्याचे एक उदाहरण समोर आले आहे.
स्वारगेट पोलीस स्टेशन समोरील बसस्टॉप पासून कॅनॉल ते व्होल्गा चौकापर्यंत पाच जुगार अड्डे व क्लब कार्यरत आहेत. त्यासाठी प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा दोन/ तीन मिटरवर खबरे बसविण्यात आले आहेत. एकुण 22 धंदयाचे हेडक्वॉर्टर अतिसुरक्षित असे इंदिरानगर औद्योगीक वसाहत येथील खड्यात करण्यात आले आहे. भारतीय लष्कराने औदयोगीक वसाहतीतील खड्यात प्रवेश करायला म्हटला तरी सहज शक्य नाही. भारतीय लष्कराने बॉर्डरवरील पाकीस्तानच्या छुप्या टेहळणी चौक्या शोधून काढणे शक्य आहे, परंतु औदयोगीक वसाहतीतील खड्डा शोधणे अतिअवघड बाब आहे. या खड्ड्यात जाण्यासाठी केवळ बोळी आहेत. एखादे दुचाही वाहन घालणे शक्यच नाही.
तसे खड्डयात जाण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी अनेक पायवाटा आहेत. त्यामुळे पोलीस कोणत्याही दिशेने आले तरी लगेच खबर मिळते. एवढं कठिण सुरक्षा कवच आहे. याच ठिकाणी जुगार अड्डयावर सुमारे 20 ते 25 मटका जुगार घेणारे बसलेले असतात. सोबत क्लब सह एकुण 60 ते 70 इसम या ठिकाणी जुगार कामासाठी बसलेले असतात. खेळींची संख्या मोठी आहे. याच ठिकाणी तीन पत्ती, 52 पत्ता, काठी, क्बलसह गांजा, एमडी सारखे अंमली पदार्थाची विक्री केली जात असल्याचे सांगितले जात आहे. क्लबमध्ये खेळण्यासाठी व अंमली पदार्थ घेण्यासाठी दुरदूरवरून अनेक लोक इंदिरानगर औद्योगीक वसाहतीच्या आजुबाजूला आलेले असतात हे विशेष.
मोक्का- एमपीडीए खालील गुन्हेगारांचा सहभाग असलेल्या शाहूच्या धंदयांना स्वारगेट मार्केटयार्ड पोलीसांचे संरक्षण कवच कशासाठी…
स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत सर्वाधिक अवैध धंदे आहेत. तसेच स्वारगेट मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 22 पेक्षा अधिक जुगार अड्डे व अंमली पदार्थांची विक्रीची ठिकाणे कार्यरत आहेत. शाहू व हसन यांचे अनेक बेकायदेशिर धंदे कार्यरत आहेत. या धंदयाचे खरे मालक स्वारगेट पोलीस स्टेशन मधील वसुलदार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये वसुलदारी करणारेच यापूर्वी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन मध्ये वसुलदार म्हणून कार्यरत होते. सोबतच एमपीडीए व मोक्का अंतर्गत कारवाई झालेले दोन घातक गुन्हेगारांच्या बळावर हे अवैध धंदे सुरू असल्याचे समजते.
दरम्यान पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता हे पुणे शहरातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करीत आहेत. मोक्का अंतर्गत आत्तापर्यंत सुमारे 86 गुन्हेगारांवर कारवाई केली आहे तर 72 गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. स्वारगेट व मार्केटयार्ड पोलीसांना माहिती असतांना देखील मोक्का व एमपीडीए मधील गुन्हेगार तसेच वारंवार गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम या दोन पोलीस स्टेशनकडून केले जात असल्याचे दिसून येते. दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशन व मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी वरील नमूद केलेल्या सर्वच गंभिर बाबींकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून दहशतवादाला खतपाणी घातले असल्याचे दिसून येत आहे.
जुगार मालकांवर तडीपारी आणि एकाच हद्दीत दोन वेळा कारवाई झालेल्या पोलीस स्टेशनच्या वरीष्ठ पोलीसांची बदली नक्की होणार का….
पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी पोलीसांच्या मासिक बैठकीमध्ये ज्या पोलीस स्टेशन हद्दीत दोन पेक्षा अधिक वेळा जुगार अड्डयांसह बेकादेशिर कृत्य करणाऱ्या इसमांवर गुन्हे शाखेने कारवाई केल्यास, तिथल्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्याबाबत तसेच जुगार अड्याच्या मालकांवर तडीपारीची कारवाई करण्याबाबत सुतोवाच केले आहे. त्याचा जबरी फटका समर्थ पोलीस स्टेशनला बसला असला तरी स्वारगेट, विश्रांतवाडीसह एकुण 28 ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभागाने दोन/ तीन वेळा कारवाई करून देखील तिथल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बदली केली नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार व पोलीस उपआयुक्त परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे दोन वेळा कारवाई झाली असल्याचे समजते. तरी पोलीस आयुक्तांनी काढलेले आदेश केवळ काही अधिकाऱ्यांना लागु नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
थोडक्यात पुणे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना हाताशी धरून, त्यांच्या टोळीतील हजारापेक्षा अधिक सदस्यांना आर्थिक बळ देणासाठी, स्वारगेट व मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 31 पेक्षाही अधिक जुगार अड्डे, अंमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या, शाहू व हसन हे दोन इसमांनी स्थानिक पोलीस स्टेशनला हाताशी धरून पुणे शहर पोलीस आयुक्तालयाला आव्हान दिले आहे एवढं मात्र नक्की. (क्रमशः)