Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे पोलीसांवर हल्ला करण्याची सुपारी कुणी दिली ?

pune police attack

पुणे/दि/अनिरूद्ध शालन चव्हाण/
विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत दोन वेळेस पोलीसांवर प्राणघातक हल्ला झाला. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतही तीन/चार पोलीसांवर प्राणघातक हल्ला झाला. पाच सहा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीसांवर हल्ले झाले आहेत. या हल्यामागे नेमके कोण आहे.
विमानतळ पोलीस स्टेशन मधील पोलीस अंमलदार श्री. सचिन जगदाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची बातमी सर्वत्र प्रसारित झाली आहे. त्यात कारण तर काय, श्री. जगदाळे हे नियंत्रण कक्षाकडून फोन आल्यामुळे चायनिज सेंटर बंद करण्यासाठी गेले होते. परंतु आरोपी महानंदेश्वर उर्फ मल्ल्या महादेव बताले वय- 24 रा. जिल्हा उस्मानाबाद याला जेवायला मिळाले नाही म्हणून त्याने पोलीसांवर चाकुने हल्ला केला अशी सर्वत्र बातमी प्रसारित झाली आहे. भले… भले… नागरीक आणि गुन्हेगारही पोलीसांपासून चार हात दूर राहतात. त्यात उस्मानाबाद म्हटल्यानंतर तर … पाहुणा माणूस. त्यातही उस्मानाबादकर मंडळी अद्यापपर्यंत चाकु-सुऱ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत हे उस्मानाबाद पोलीसही ठामपणे सांगु शकतील. थोडक्यात उस्मानाबादच काय पुण्यातील सरावलेले गुन्हेगारही पोलीसांवर हल्ला करू शकत नाहीत, सर्व सामान्यांची तर काही बिषादच नाही. दरम्यान पुणे शहर पोलीस खात्यात वेगळीच चर्चा असून, पोलीसांवर हल्ला करण्याची ही सुपार तर कुणी दिली नाहीये ना अशी चर्चा सर्वत्र होत आहे. पुणे पोलीसांवर आजपर्यंत सहा पोलीस स्टेशन हद्दीत हल्ले झाले आहेत. परंतु आजपर्यंत केवळ दोनच हल्ल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. यामागे नेमकं इंगित काय आहे….


विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये पोलीसांवरील हा दुसरा हल्ला –
विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत सचिन जगदाळे यांच्यावरील हा पहिलाच हल्ला नसून, यापूर्वी देखील लोहगावातील सुमारे 10 ते 12 गावगुंडांनी एका दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला हॉकी स्टीक, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यात त्या पोलीस अंमलदाराचे डोके फुटले होते. तीन महिने हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होते. तर दोन महिने घरीच आराम करावा लागला होता. ही बातमी आजपर्यंत कधीच प्रसारित झाली नाही. स्थानिक पोलीसांनी सांगितले की, वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी हे प्रकरण वाढवु नका अशी तंबी दिली होती. त्यानंतर अवघ्या 15/20 दिवसात त्या वरिष्ठांना मलाईदार क्राईम खाते मिळाले हा इतिहास आहे.
सहकारनगर मध्ये किती पोलीसांवर हल्ले झाले –
पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 2 यांच्या अधिनस्थ असलेल्या सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत आजपर्यंत दोन वेळेस पोलीस अंमलदारांना गुन्हेगारांनी ठोक.. ठोक… ठोकले आहे. ही मुजोरी नेमकी सराईत गुन्हेगारांमध्ये नेमकी आली तरी कुठून हा प्रश्न होताच. दरम्यान सहकारनगर पोलीस स्टेशन मधील मटका, जुगार अड्डे, क्लब सारख्या अवैध धंदयाचे वसुलदारांनी दोन/तीन पोलीसांना ठोकण्याची सुपारी दिली होती अशी बऱ्याच ठिकाणी चर्चा आहे. तसेच याच वसुलदार पोलीसाचे आजही सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचे अड्डे आहेत.
मध्यंतरी सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी पद्मावती, सहकारनगर, धनकवडी येथे जुगार अड्ड्यांवर कारवाई केल्यानंतर, त्यांचेच नाव प्रथम आले होते. एका खाजगी मुलाखतीत श्री.पुराणिक यांनी नावाचा उच्चारही केला होता. थोडक्यात पोलीस असतांना जुगार अड्डे, मटका अड्डे चालविणे, त्यानंतर, स्वतःसह इतरही अवैध धंदयाची वसुली करणे आणि त्यामध्ये आडकाठी आणणाऱ्या पोलीसांची सुपारी गुन्हेगारांना देऊन दोन/तीन पोलीस अंमलदारांवर हल्ले केले होते.
याबाबतची बातमी आजपर्यंत कुठेही आलेली नाहीये. थोडक्यात दोन्ही बाजुने पोलीसांचे मरणच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पोलीसाला मारहाण झाली म्हणून बातमी प्रसिद्ध करावी तर खात्याची बदनामी…. पोलीसांची बदनामी… तर मारहाण झाली नसल्याचे व बातमी लपवुन ठेवावी तर गुन्हेगारांची मुजोरी अधिक वाढत आहे… पोलीस अंमलदारांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाच्या राजेश पुराणिकांनी कारवाई केलेला व जुगार अड्डयाचा मालक असलेला पोलीस कर्मचारी आता कुठे आहे –
ज्या पोलीस कर्मचाऱ्याचे आजही सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत जुगार,मटक्याचे अड्डे आहेत. धनकवडी येथे आजही मोठा क्लब सुरू आहे. ज्याच्यावर यापूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाने सुमारे तीन वेळेस धाडी टाकल्या होत्या. ते सर्व धंदे आजही सुरू आहेत. तो पोलीस कर्मचारी आता कुठे आहे, असा सवाल केल्यास, भले … भले… डोक्याला हात लावतील यात शंकाच नाही.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस उपायुक्तांच्या दरबारात प्रतिनियुक्तीवर त्यांची नियुक्ती झाली आहे… तिथेही वसुलदाराचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. खरं तर अशा बदनाम व्यक्तीला आपल्या दरबारात प्रतिनियुक्तीवर घेवून स्वतःची व खात्याची बदनामी का करून घ्यावी असे जराही त्या पोलीस उपआयुक्तांना वाटले नाही हे मात्र विशेष….
आता तर संपूर्ण पुणे शहराची सुत्रे वसुलदार पोलीसांच्या हातात आले आहेत. पोलीस असुनही स्वतःचे मटका, जुगार अड्डे व क्लब…. मित्रांचे जुगार अड्डे व क्लब यांचा धंदा वाढविण्याकडे या महाशयांचा मोठा कल असतो. मध्यंतरी एका विमानतळ हद्दीतील मोठ्ठ्या जुगार अड्डा क्लबसाठी त्यांनी काही ठिकाणचे धंदयावर मध्यरात्री घुसून धंदा चालविणाऱ्याला नव्हे तर जुगार खेळायला येणाऱ्यांना काठीने पकडून पकडून मारल्याची मोठी बातमी मध्यंतरी समोर आली होती. त्यात एकावरही गुन्हा दाखल केला नाही. मग ही मारहाण कशासाठी… गुन्हा केला आहे तर अटक करून पोलीस स्टेशनच्या हवाली करणे अपेक्षित असतांना कायदा हातात घेतला तरी त्याची कुठेही वाच्चता होत नाही ही मोठी शोकांतिका असल्याची प्रतिक्रीया काही पोलीसांनी व्यक्त केली आहे.
थोडक्यात पोलीसच.. पोलीसांचा काटा काढत आहेत का… पोलीसच … पोलीसांची सुपारी देत आहेत काय… असे अनुमान काढावे किंवा कसे याबाबत पुणे पोलीसांनी संशोधन, अन्वेषण करणे आवश्यक आहे.