Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मंत्रीमंडळाचं घोडं नेमकं कुठं अडलंय?

मुंबई/दि/
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन 15 दिवस उलटून गेले. मात्र त्यानंतरही अजून मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. त्याचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन करताच महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र अशा प्रकारचा निर्णय या सरकारने घेणे अपेक्षित नव्हते, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
जयंत पाटील म्हणाले की, आधी नगरसेवकातून नगराध्यक्ष मग जनतेतून पुन्हा नगरसेवकातून आणि आता पुन्हा जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवड करण्यात येणार आहे. मात्र यापुर्वी आपण अनेकवेळा पाहिलं आहे की, सरपंच एका गटाचा आणि बहुमत दुसऱ्या गटाला त्यामुळे त्याचा परिणाम गावच्या विकासावर होतो. त्यामुळे हा निर्णय चुकीचा असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राज्यात सरकार स्थापन होऊन 15 दिवस झाले आहेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. राज्यात अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने मंत्रीमंडळ विस्तार करून लोकांना मदत पोहचवणे अत्यंत गरजेचे असताना अजूनही मंत्रीमंडळ विस्तार नाही. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या विस्ताराचं घोडं नेमकं कुठं आडलं आहे? हे समजत नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.