नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध अधिनियम 1981 नुसार पुणे शहर पोलीसांनी आजपर्यंत या कायदयाखाली सुमारे 71 जणांविरूद्ध कठोर कारवाई करून त्यांना राज्यातील विविध कारागृहात डांबण्यात आले आहे. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यास बाधा येईल अशा कोणत्याही प्रकारचे वर्तन करणाऱ्यांविरूद्ध या कायदयानुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे. पर्वती पोलीस स्टेशन व खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगाराविरूद्ध चालु सप्ताहात कारवाई करून त्यांना वेगवेगळ्या कारागृहत बंदिस्त करण्यात आले आहे.
पर्वती पोलीस स्टेशनमध्ये 70 वी एमपीडीए कारवाई –
पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार नामे यश उर्फ मनोज दिनेश मेरवाडे, वय-22 वर्ष. रा.स.नं. 130. दांडेकर पुल मारणे गिरणी समोर सिंहगड रोड, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह कोयता, तलवार, लोखंडी रॉड, बांबू या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारासह खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, साधी दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखी गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील 05 वर्षामध्ये त्याचेविरूध्द 05 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी नमुद इसमाचे विरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे 01 वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमुद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री जयराम पायगुडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पर्वती पोलीस स्टेशन पुणे व श्री. चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.सी. बी. गुन्हे शाखा पुणे शहर यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी सदरची कामगिरी पार पाडली.
पोलीस आयुक्त यांनी चालु वर्षा मध्ये दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या कारवाया केल्या आहेत. पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील ही 70 वी कारवाई आहे.
खडकी पोलीस स्टेशनमध्ये 71 वी एमपीडीए कारवाई –
पुणे पोलीस आयुक्तालयातील खडकी पोलीस स्टेशनचे हदीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे अजय उर्फ काबू शिवकुमार पिल्ले, वय 28 वर्षे, रा. नाईक चाळ, बोपोडी, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असुन त्याने साथीदारांसह खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार, चाकू या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खूनाचा प्रयत्न, घातक हत्याराने दुखापतीसह जबरी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
मागील 05 वर्षामध्ये त्याचेविरूध्द 03 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे 01 वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत.
नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री. राजेंद्र सहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलीस स्टेशन, पुणे व श्री. चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कामगिरी पार पाडली.
पोलीस आयुक्त यांनी चालु वर्षा मध्ये दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या कारवाया केल्या असुन खडकी पोलीस स्टेशन येथे ही 71 वी कारवाई आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.