Friday, January 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेतील नोकरी व पदोन्नतीच्या कायदेशिर तरतुदी गेल्या उडत… सबसे बडा रूप्पय्या…

पैसे दया- बदली घ्या,
पैसे दया – हवे तिथे पोस्टिंग मिळवा,
पैसे दया – अतिरिक्त पदभार मिळवा,
पैसे दया – पाहिजे तो प्रभारी पदभार मिळवा

शिक्षण किंवा पात्रता आहे किंवा नाही…. सबसे बडा रूप्पय्या…


पुणे दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेतील बदल्या, पदोन्नती आणि पदस्थापना हा विषय पैशाशिवाय पुढे सरकत नाही. ज्याच्याकडे पैसे आहेत, त्याला हवी तिथे बदली दिली जाते, पाहिजे ज्या ठिकाणी पोस्टींग (पदस्थापना) दिली जाते, जास्त पैसे दिले तर अतिरिक्त पदभार व प्रभारी पदभाराची खिरापत वाटली जात आहे. थोडक्यात पुणे महापालिकेच्या मंजुर आकृतीबंधातील पद आणि त्यासाठीची शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती हा निकष मागे पडत असून, केवळ पैसे देणाऱ्यांनाच पदाची खिरापत केली जात आहे. पैसे हे भ्रष्टाचार केल्याशिवाय मिळत नाहीत. थोडक्यात भ्रष्टाचार करा, गैरव्यवहार करा, पण पैसे आणून द्या असेच धोरण सध्या पुणे महापालिकेत सुरू असल्यामुळे सगळीकडे पदांचा बाजार मांडला गेला आहे.

पुणे महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त पदभार व प्रभारी पदभार हा लाखो रुपये घेऊन बोगस व भ्रष्टाचारी पद्धतीने देण्यात येत असल्यानेच आता… पुणे महानगरपालिकेचे नाव बदलून अतिरिक्त पुणे महानगरपालिका व प्रभारी पुणे महानगरपालिका, (बोगस आणि भ्रष्टाचारी पद्धतीने देण्यात येणाऱ्या पदोन्नती बोगस कागदपत्रे असताना व अनुभवाचे दाखले नसताना पदोन्नती देण्यात येतात त्यांची चौकशी करण्यात येत नाही) असे ठेवण्यात यावे अशी तीव्र भावना पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची झाली असल्याची दिसून येत आहे. तसेच हे सर्व प्रकार आयुक्त व अतिरिक्त आयुक्त श्री. रवींद्र बिनवडे व श्री. कुनाल खेमनार तसेच उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग श्री. सचिन इथापे यांना माहित नाहीत काय की सर्व माहीत असूनही हे गप्प का आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.


पुणे महापालिकेच्या आकृतीबंधामध्ये महाराष्ट्र शासन आदेशानुसार मान्य झालेले आहे. त्यानुसार नोकर भरती न करता मनमानी पद्धतीने, हम करे सो कायदा यानुसार मनमानी पद्धतीने व बेकायदेशीरपणे सर्व कामकाज चालू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेची नाहक मोठ्या प्रमाणावर मोठी बदनामी होत आहे. त्यास आयुक्त व अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त व संबंधित खाते प्रमुख हेच जबाबदार आहेत. याच भ्रष्टाचाराची काही उदाहरणे दिली जात आहे ते

1) श्री. शिवाजी भिकाजी दौंडकर , मुख्य कामगार अधिकारी
पुणे महानगरपालिका यांच्याकडे सुरक्षा सनियंत्रक शिक्षण विभाग प्रमुख अशा खात्यांचा चार्ज होता. याच कालावधीमध्ये व पूर्वीपासून दौंडकर यांच्या नावावर अनेक भ्रष्टाचार व घोटाळे दाखल असून अँटी करप्शन विभागानेही यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले आहे. परंतु ही कारवाई करणे तर सोडा, मागील सात वर्षांपासून यांच्या प्रकरणाला हात सुद्धा लावलेला नाही. तसेच कारवाई ही लांबची गोष्ट. या उलट श्री. दौंडकर यांना प्रमोशनवर प्रमोशन व अनेक खात्यांचा चार्ज देण्यात येत आहे. म्हणजेच जो जास्त भ्रष्टाचारी आहे, जो जास्त पैसे कमवून देईल त्यालाच चांगली पदे पुणे महानगरपालिकेत मिळतात. श्री. दौंडकर यांना नुकतेच सह आयुक्त म्हणून पदोन्नती मिळालेली आहे. तसेच श्री. दौंडकर यांना नगरसचिव पदाचा अतिरिक्त पदभार मिळालेला आहे . यामध्ये गौडबंगाल असे आहे की नगरसचिव पदासाठी जवळजवळ 30 अर्ज आले होते. ते सर्व अर्ज पात्रापात्र करून त्यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये आयुक्त व कर्मचारी निवड समिती व मुलाखत पॅनल होती. या सर्वांनी मुलाखत घेऊन मुलाखतीला कोणतेही गुण दिलेले नाहीत. याचा अर्थ काय…
तसेच या 30 जणांपैकी एकही उमेदवारास अनुभव नाही व त्या उमेदवारांची पात्रता नाही असा सर्वांनी.. सर्वानुमते निर्णय करण्यात आला व त्यातील उमेदवारांची या पदावर बसण्यासाठी लायकी नाही असे ठरविण्यात आले. असे असताना यामध्ये अनेक अधिकारी, अनेक सह आयुक्त , उपयुक्त होते तसेच यामध्ये दौंडकर हे स्वतःही मुलाखतीमध्ये सहभागी झालेले होते. म्हणजेच या सर्वानुमते दौंडकर यांनाही अनुभव नाही, त्यांची पात्रता नाही व ते मुलाखतीमध्ये पात्र झालेली नाहीत. म्हणजेच या नगरसचिव पदासाठी त्यांची पात्रता नाही तरीही पुन्हा यांचे आर्थिक हितसंबंधामुळे त्यांच्याच गळ्यात नगरसचिव पदाची माळ घालण्यात आली. आता ही माळ मागील दोन वर्षांपासून तशीच आहे. तसेच यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी, आंदोलने, मोर्चे, माहिती अधिकार अर्ज आलेले आहेत तरीही आयुक्त व अतिरिक्त आयुक्त कोणतेही दखल न घेता फक्त वेळ काढूपणा करत असल्याचे दिसून येत आहे. यापेक्षा मोठे भ्रष्टाचाराचे उदाहरण असू शकत नसल्याने या सर्वांची दखल घेऊन तात्काळ श्री. दौंडकरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

2) श्रीमती निशा चव्हाण मुख्य विधि अधिकारी – विधी विभाग
श्रीमती निशा चव्हाण यांची पुणे महानगरपालिकेतील विधी अधिकारी या पदावरील नेमणूकच मुळात बेकायदेशीर असल्याचे अनेक तक्रार अर्ज पुणे महापालिकेकडे आलेले आहेत. तसेच श्रीमती चव्हाण यांच्याकडे स्वतंत्र वकीलीचा, न्यायालयीन कामकाजाचा कोणताही अनुभवाचा दाखला नसताना व प्रत्यक्ष लीगल प्रॅक्टिसचा अनुभव नसताना यांना पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळालेली आहे. तसेच विधी अधिकारी म्हणून मागील दहा वर्षापासून या काम करीत आहेत. यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आले असून त्यामध्ये प्रोबेशन पिरेडमध्येही अनेक तक्रारी आलेले आहेत. त्यामध्ये दोषी, गांधी, खामकर असे अनेक तक्रारदार आहेत. सर्व तक्रारदारांनी श्रीमती चव्हाण या वेळेवर कामावर येत नाहीत, काम नीट करत नाहीत, कामाची माहिती नाही, पुणे महापालिकेच्या मालकीचे चारचाकी वाहन बेकायदेशीरपणे घेऊन वापरत आहेत अशा तक्रारी आलेल्या आहेत. पुणे महापालिकेच्या पॅनलवरील वकिलांना चुकीच्या पद्धतीने केस देत आहेत, पैसे घेऊन वकिलांची नेमणूक करत आहेत अशी मोठी ओरड पुणे महापालिकेत आहे.
तसेच श्रीमती चव्हाण यांची पुणे महानगरपालिकेतील नियुक्ती बेकायदेशीर असली तरी यांनी केलेली कामे ही सर्व भ्रष्टाचारी पद्धतीने सुरू आहेत. अनेक प्रकरणांमध्ये कोर्ट केसेस मध्ये पैसे खाऊन कामे सुरू असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अशा एक ना अनेक तक्रारी पुणे महानगरपालिकेत आलेले आहेत. परंतु यामध्येही आयुक्त , अतिरिक्त आयुक्त, तसेच उपायुक्त सामान्य प्रशासन हे कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत.
परंतु श्रीमती निशा चव्हाण यांना प्रमोशनवर प्रमोशन देणे म्हणजे विधी अधिकारी चे मुख्य अधिकारी पदावर प्रमोशन देणे सुरूच आहे. तक्रारींची चौकशी नाही व त्यावर कारवाई तर नाहीच नाही. म्हणजे सर्व भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे. या सर्व तक्रारींची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

3) श्री. नितीन केंजळे- कामगार कल्याण अधिकारी पुणे महानगरपालिका –
श्री. केंजळे हे शिपाई म्हणून पुणे महानगरपालिकेच्या सेवेत रुजु झाले. आस्थापना शाखा, सेवक वर्ग विभागात शिपायापासून ते क्लार्क- लघु टंकलेखक, कामगार कल्याण अधिकारी तसेच प्रभारी सुरक्षा अधिकारी अशा पदांवर नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे सेवक वर्ग-आस्थापनेत सामान काम करणाऱ्या सेवकांना तत्काळ पदोन्नती मिळतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे. दरम्यान सुरक्षा विभागात चार हजार कंत्राटी कामगार नियुक्त कसे झाले होते व पुन्हा 4000 चे सोळाशे कर्मचारी, सोळाशे सुरक्षारक्षक कसे झाले याची प्रशासनाने चौकशी करणे आवश्यक होते. तसेच आज रोजी यांच्याकडे आकृतीबंधानुसार कुठलीही पात्रता नसताना, शैक्षणिक व अनुभव नसताना, मिलिटरी, आर्मी, पोलीस या खात्यांचा अनुभव नसताना, यांना सुरक्षा रक्षकांचा पदभार देण्यात आलेला आहे. हा पदभार कसा देण्यात आलेला आहे….
तसेच सुरक्षा विभागातून कंत्राटी कामगारांची फाईल तपासणीसाठी कामगार कल्याण विभागात पाठवायचे व पुन्हा कामगार कल्याण विभागातून स्वतःच फाईल तपासून भ्रष्टाचार करून ती सुरक्षा विभागात पाठवायची व सर्व देय भत्ते, एस. आय. पी. एफ. व किमान वेतन दिलेले आहे असे दाखवायचे. आज रोजी दिवाळीच्या सुमारास अनेक कंत्राटी कामगारांस दिवाळीचे पगार बोनस व इतर देय रक्कम मिळालेले नाहीत, ही सद्यस्थिती आहे. यामध्ये श्री. नितीन केंजळे हे सर्वस्वी जबाबदार आहेत.

 तरीही श्री. केंजळे यांना पदभार देण्यात आलेले आहेत. तसेच मध्यंतरी भाजपाचे खासदासर श्री. किरीट सोमय्या हे पुणे महानगरपालिकेच्या दौऱ्यावर आलेले असताना तेथे बेकायदेशीररित्या जमाव जमा होऊन तेथे मारहाणीच्या घटना घडल्या. त्यावेळी सुरक्षा प्रमुख श्री. महादेव जगताप व सुरक्षा अधिकारी श्री. केंजळे यांना तात्काळ बडतर्फ करणे गरजेचे होते. परंतु असे काही केलेले नाही. त्यामुळे त्यांना देण्यात आलेले पदभार तात्काळ काढून यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी होत आहे. व हे पदभार कुणाच्या सांगण्यावरून व कुणाच्या दबावरून दिलेले आहेत, की पैसे खाऊन दिलेले आहेत, हे जाहीर करणे अपेक्षित आहे.

5) कामगार कल्याण विभागातील 10 उपकामगार अधिकारी
पुणे महानगरपालिकेमध्ये प्रभारी उपकामगार अधिकारी पदासाठी एकुण 37 अर्ज आले होते. परंतु एलएलबी धारक असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे असे श्री. दौंडकर यांनी सांगितले होते. तथापी नियमानुसार काम करतील ते दौंडकर कसले … त्यांनी फक्त डी एल एल कामगार कायद्याची पदवी असणाऱ्यांना डायरेक्ट स्वतःच्या मनमानी कारभारानुसार प्रभारी पदभार दिला आहे. थोडक्यात सद्या कार्यरत असणाऱ्या प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांकडे काही जणांकडे विधी शाखेची पदवी तर काही जणांकडे निव्वळ डीएलएल होते. पूर्ण शैक्षणिक पात्रता कुणाकडेच नव्हती. तरी देखील त्यांना प्रभारी उपकामगार अधिकारी पदाचा पदभार देण्यात आलेला आहे.
याप्रकारे पुणे महापालिकेत आजपर्यंत श्री. प्रदीप महाडिक (क्रीडा) श्री. योगेश हेंद्रे जनसंपर्क, राकेश विटकर सुरक्षा विभाग, श्री. वाडेकर लेखा विभाग, सुनिल मते सांस्कृतिक केंद्र अधीक्षक या सारख्यांना अतिरिक्त पदभार व प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे. यांच्या बाबत पुढील अंकात पाहुयात….