Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपासहित प्रस्थापित पक्षांनी, प्रत्येक निवडणूकीत आंबेडकरी चळवळ आणि बाळासाहेब आंबेडकर यांना ब्लॅकमेल केले

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण
वंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांची युती झाल्यानंतर, सर्वाधिक मळमळ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळुन आली असल्याचे खाजगी वृत्तवाहिनीवरील अनेक बातम्यांमधुन दिसून येत आहे. वृत्तपत्र व टिव्ही चॅनेल्सच्या काही पत्रकारांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री. नाना पटोले यांना मविआ युतीबाबत विचारले असता, बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागण्या काय आहेत हे माहिती नसल्याचे सांगितले आहे. प्रसारमाध्यमांसमोर रागजळफाट व्यक्त केला असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील बुडाला आग लागल्यासारखे सगळीकडे आरोळ्या ठोकत सुटले असल्याचे वृत्तवाहिनीवरून दिसत आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते राष्ट्रवादीची बाजु सावरतांना दिसत आहेत. दरम्यान मागील 40/50 वर्षात सत्ताधारी व विरोधी पक्षातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी आंबेडकरी चळवळ व बाळासाहेब आंबेडकर यांना कसे ब्लॅकमेले केले, बहुजन समाजातील राजकीय नेतृत्व कसे नेस्तनाबुत केले, याचा अितिहास या लेखातून मांडला आहे.

बाळासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस युतीसाठी काय प्रस्ताव होता –
वंचित बहुजन आघाडी व शिवसेना युती झाली असली तरी मविआ मध्ये बाळासाहेब आंबेडकरांचे स्थान काय असेल याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण व प्रदेश अध्यक्ष नाना पटोल यांनी, बाळासाहेब आंबेडकर यांचा काय प्रस्ताव आहे हे माहिती नसल्याचे वृत्तवाहिन्यांसमोर आरडा ओरडा केला आहे. दरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांची भूमिका 2019 च्या लोकसभा निवडणूकीतच जाहीर केली होती. ते म्हणतात, काँग्रसने मागील पाच लोकसभा निवडणूकीत, ज्या लोकसभेच्या 12 जागा हरलेल्या आहेत, त्या जागा वंचित बहुजन आघाडीला देण्याबाबत काँग्रेस -वंचित युतीची बोलणी केली होती. लोकसभेच्या 48 जागांपैकी पैकी 12 जागांबाबत चर्चा होत होती. परंतु काँग्रेसने युती केल्याचा बहाणा करून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांना चर्चेत ठेवले. शेवटी काँग्रेसने पारंपारीकपणे जुन्या जमिनदारासारखे वंचित बहुजन आघाडीला एकही जागा न देता काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागांवर उमेदवार जाहीर केले.
बाळासाहेब आंबेडकर म्हणतात, शोषित, पिडीत, वंचित बहुजन समाजाला सत्तेत येऊ दयायचे नाही, गरीब मराठा समाजाला सत्तेत येऊ दयायचे नाही, ओबीसी समाजाला सत्तेत येऊ दयायचे नाही, अल्पसंख्याकांना तर सत्तेपासून दुरदुर ठेवायचे असा चंग काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने कायम बांधला होता व आहे. त्यामुळे नवीन नेतृत्व तयार झाले नाही. राजकाणात तोच तोच पणा आला आहे. असो, परिणामी वंचित व काँग्रेस युती तुटली अशी प्रसारमाध्यमांसमोर काँग्रेसने घोषणा केली. युतीची चर्चा चार भिंतीच्या आत होत असतांना, युती तुटल्याचे मात्र पत्रकारांसमोरच सांगितले. ही वंचित बरोबर काँग्रेसने केलेली सपशेल ब्लॅकमेलींग होती.
काँग्रेसचे वर्तन नेमके कशासाठी होते –
यातून काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी फोडण्याचा चंग बांधला. एैनवेळी जागा वाटपात 48 पैकी 1 जागा देण्याची भाषा सुरू केली. युती तुटावी हा काँग्रेसचा हेतू होता. आणि पुढे काँग्रेस व वंचित अशी कधीही न झालेली युती तुटली. काँग्रेसने हेतूपुरस्सर वंचितचे पारंपारीक मुख्य मदार असलेली दलित-ओबीसी मते निवडणूकीत कुजविण्याचा प्रयत्न केला. वंचितला केवळ दलितांपुरते मर्यादित ठेवण्यासाठी वृत्तपत्र व खाजगी वृत्तवाहिन्यांचा बेसुमार वापर करण्यात आला. निवडणूकीत वंचितचे चिडलेले मतदार एक तर वंचितला मतदान करतील किंवा काँग्रेस – राष्ट्रवादीला ती मते मिळतील किंवा रागारागाने ते मतदान करणार नाहीत किंवा वंचितचे पारंपारीक मतदान भाजपाला कसे होईल यासाठीच काँग्रेसने अटोकाट प्रयत्न केला आहे. वंचितकडे आशेने पाहणारा मतदार देखील पळुन जाईल अशी राजकीय खेळी खेळण्यात आली.
2019 च्या लोकसभेचे निकाल समोर आहेत. याचे सर्व अपश्रेय काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला जाते. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीसारखा दगाफटका केल्यानंतर देखील वंचित बहुजन आघाडीने राज्यात स्वतःचे राजकीय स्थान निर्माण केले आहे. आज राज्यात काँग्रेसचे केवळ दोनच खासदार आहेत. हे सर्व काँग्रेसच्या हट्टी व विषारी जातीयवादामुळे झाले असल्याचे विश्लेषण राजकीय तज्ज्ञांनी केले आहे. काँग्रेसच्या बहुतांश मतदारसंघात भाजपा विजयी झाला आहे. थोडक्यात भाजपाला विजयी करण्यासाठीच बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली नाही असेही काही राजकीय जाणकारांचे मत आहे. राज्यात भाजपाला विजयी करण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे योगदान आहे. एकवेळ भाजपा सत्तेत आली तरी चालेल परंतु बाळासाहेब आंबेडकर सत्तेत येता कामा नये ही काँग्रेसची आजपर्यंतची तळमळ-मळमळ राहिलेली आहे. कॉंग्रेसने मागील 40/50 वर्षात हेच केले आहे. तेच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आज पत्रकारांपुढे म्हणतात, वंचितचा काय प्रस्ताव आहे हे आम्हाला माहिती नाही.
ही आहे वंचितची राजकीय ताकद-
वंचित व शिवसेना युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर, वंचित महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी प्रबुद्ध भारत मध्ये वंचितच्या राजकीय ताकदीची जाणिव करून दिली आहे. तसेच याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यांनी प्रबुद्ध भारत मध्ये नमूद केलं आहे की, आजच्या युतीचे राजकीय परिणाम संघ आणि भाजप दोघांना चिंताक्रांत करणारी आहेत याचे महत्वाचे कारण
सन 2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणूकीत भारिप बहुजन महासंघाने राज्यात 23 उमेदवार उभे केले होते.त्यांना एकत्रित 3,60,854 (0.7%) मते मिळाली होती.2014 मध्ये झालेल्या 13 व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत भारिप बहुजन महासंघाने 70 उमेदवार उभे होते, मात्र त्यापैकी केवळ एकच आमदार विजयी झाला. सर्व उमेदवारांना एकत्रित 4,72,925 (0.9%) मते मिळाली होती.
मात्र वंचित ने 2019 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूकीत, 41,32,242 (7.64%) एवढी मते मिळवली होती. महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघात 5,40,54,245 एवढे एकूण मतदान झाले होते,त्यात 41,32,242 हा वंचितचा वोट शेयर आहे. औरंगाबाद या एका लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी समर्थित एआयएमआयएम पहिल्या स्थानी होती, अकोला या एका मतदार संघात वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या स्थानी होती तर 41 मतदार संघात वंबआ तिसऱ्या स्थानी होती.
राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी 80 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 288 पैकी 236 जागा पक्षावर लढत 25,23,583 मते घेतली होती.2019 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मागील जागा 122, 2019 मध्ये जिंकलेल्या जागा 105, शिवसेना मागील जागा 63, 2019 मध्ये जिंकलेल्या जागा 56, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागील जागा 41,2019 मध्ये जिंकलेल्या जागा 54. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- मागील जागा 42, 2019 मध्ये जिंकलेल्या जागा 44 असे पक्षीय बलाबल होते.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची राजकीय खेळी-
राज्यात बाळासाहेब आंबेडकर सत्तेत येऊ नये म्हणून, त्यांचे नेतृत्व पुढे येऊ नये म्हणून त्यांच्या अकोला लोकसभा मतदारसंघात मागील 20 वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक काळात तळ ठोकला आहे. तसेच राज्यातही बाळासाहेब आंबेडकर यांची राजकीय ताकद वाढु नये यासाठी सत्तेचा अटोकाट अंकुश वापरला आहे. ज्या जागांवर बाळासाहेब आंबेडकरांचा राजकीय पक्ष निवडूण येईल, तेथे भाजपाने मदत केल्याचा सुर काँग्रेस-राष्ट्रवादीने आळवला आहे. ते भाजपाचे आहेत असे सांगुन सांगुन बाळासाहेबांची बदनामी केली. भाजपा वाढला तरी चालेल परंतु बाळासाहेब आंबेडकरांची राजकीय ताकद वाढणार नाही यासाठी मागील 40/50 वर्ष …. पूर्वी एकसंघ काँग्रेस व नंतर काँग्रेस- फुटीर राष्ट्रवादी काँग्रेस यांनी चंग बांधला आहे. ॲड.बाळासाहेब आंबेडकर भाजपाचे आहेत म्हणून एका बाजुने बदनामी करायची आणि दुसऱ्या बाजुने राजकीय ताकद कमी करायची तर तिसऱ्या बाजुने पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या मागे कोर्ट कचेऱ्या लावण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीने केले आहे. बाळासाहेब आंबेडकर आणि वंचितची राजकीय ताकद वाढु दयायची नाही, वाढलीच तर भाजपा… भाजपा अशी गरळ ओकत फिरायचे असे धोरण, प्रस्थापित पक्षांनी ठेवले आहे. राजकारणात धर्माचा वापर करणाऱ्या किंवा भाजपा व मनुवादी विचारधारेबरोबर बाळासाहेब आंबेडकर कधीच जाणार नाहीत हे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला पक्के ठावुक आहे. बाळासाहेब आंबेडकर यांना आमच्याशिवाय पर्यायच नाही, त्यामुळे निवडणूकीत त्यांच्या पक्षाला स्थान दिले काय किंवा नाही दिले तरी त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीलाच मतदान करावे लागेल असा भयंकर आत्मविश्वास बाळगला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाने नेहमीच बाळासाहेब आंबेडकर यांना अशा प्रकारे ब्लॅकमेल केले आहे. परंतु पुढे वंचितची मदार व मतदार पक्के असल्यामुळे आज राज्यात वंचितने राजकीय स्थान निर्माण केले आहे.
एका बाजुने बाळासाहेब आंबेडकर यांना राजकीयदृष्ट्या बदनाम करून, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सातत्याने सुरू असतांनाच, दुसऱ्या बाजूने, बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचा राजकीय पक्ष कसा कमकुवत होईल याकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. पूर्वीचा भारीप बहुजन महासंघ व आत्ताच वंचित बहुजन आघाडी कमकुवत कशी होईल यासाठी मोठी राजकीय खेळी प्रस्थापित राजकीय पक्षांनी खेळलेली आहे.
पूर्वीचा भारिपबहुजन व आत्ता वंचित बहुजन आघाडी कमकुवत करण्याचे कुटील डावपेच –
1956 ते 1965 (वरळीची दंगल), 1965 ते 1980… बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर तब्बल 25 वर्ष सीट ओर नो सिट पण आमची मते तुम्हाला… संपूर्ण देशभरात राजकीय ताकद असलेल्या बाबासाहेबांच्या पक्षाची अवस्था दयनिय करण्यात आली. लोकसभेच्या 548 जागांपैकी केवळ एक खासदारकी, राज्यात कुठेतरी एक आमदार किंवा मंत्रिपद किंवा फारतर एखाद्या राज्याचा राज्यपाल एवढ्यावच राजकीय पक्ष सिमित करण्यात आला. बाबासाहेबांनंतर आंबेडकरी राजकीय पक्षांला आलेली मरगळ आणि पुढे दलित पँथरच्या माध्यमातून उभे राहिलेले आंबेडकरी विचारांचे वादळ… यामुळे देखील राज्याचे राजकारण ढवळुन निघाले होते. महाराष्ट्रापेक्षा उत्तर भारतात आंबेडकरी चळवळीने जोर धरला होता. ( या इतिहासाची पुनः चर्चा करू… लेखन मर्यादा क्षमस्वः) महाराष्ट्रात 1980 साली बाळासाहेबांचे नेतृत्व उभे राहत असतांना, बाळासाहेबांचा झंझावात कमी करण्याचा, चळवळ क्षीण करण्याचे अनेक प्रयत्न होत होते. नागपुर शासकीय विश्रामगृहात जीवघेण्या हल्ल्यापासून ते कालपर्यंत त्यांच्यावर अनेक जीव घेणे हल्ले झाले आहेत. याबाबत कुठेही चर्चा झालेली नाहीये.
भारीप, भारीप-बहुजन महासंघ व पुढे काळाच्या ओघात वंचित बहुजन आघाडीची निर्मिती झाली. दरम्यानच्या काळात 40/50 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसने, बाळासाहेब आंबेडकरांविरूद्ध सरळ सरळ छुपे युद्ध पुकारले होते.
प्रस्थापित राजकीय पक्षांनी जाणिव पूर्वक पुढे केलेले दलित नेतृत्व-
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व इतर प्रस्थापित राजकीय पक्षांकडे जसे महिला सेल, मागासवर्गीय सेल, अल्पसंख्याक सेल, युवा सेल अशा वेगवेगळ्या आघाड्या किंवा सेल असतात, तस्से, कॉंग्रेसने त्यांच्या पक्षाच्या वतीने रिपब्लिकन नावाची आघाडी किंवा सेल उभे केले होते. त्यात याच पक्षांनी रिपब्लिकन पक्ष/ संघटनेला नेते दिले. त्यांना वृत्तपत्र व वृत्तवाहीन्यांवरून दलितांचे नेते म्हणून पुढे आणले गेले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा वा प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तथाकथित दलित नेत्यांच्या हातात निळे झेंडे देऊन दलितांचे पुढारी म्हणून घोषित केले. पुढे जावुन आंबेडकरी चळवळीत गट म्हणू लागले. त्याच्याही पुढे सर्व रिपब्लिकन पक्षांचे एैक्याचे गाणे सुरू झाले. ऐन लोकसभा निवडणूकीत रिपब्लिकन ऐक्य झाले आणि पुढे सहा महिन्यात तुकडे झाले. आजही ते गट म्हणून कार्यरत आहेत. हे केवळ बाळासाहेब आंबेडकर यांची राजकीय ताकद क्षीण करण्याचा प्रयत्न केला आहे. 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला आंबेडकरी जनतेपुढे भाषण करणे म्हणजे लोकांचे नेतृत्व नाही. परंतु प्रस्थापित पक्षांनी जाणिवपूर्वक त्यांना पाहिजे तसे दलित नेते पुढे करून आंबेडकरांना रोखले आहे.खरा जनाधार कुणाला आहे हे आंबेडकरी जनतेला पुरते ठाऊक आहे.
आज सर्वच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी रिपब्लिकन पक्षाच्या गटाचे ऐक्य होणार का.. एकसंघ पक्ष कधी उभा राहणार अशी टूम काढुन आंबेडकरी मतदारांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान कोणते रिपब्लिकन गट… कुणाचे ऐक्य… हे गट तर प्रस्थापित राजकीय पक्षांचे पक्षांचे सेल किंवा विभाग आहेत. त्यामुळे त्यांचे ऐक्य होणार तरी कसे… हे होणार नाही म्हणूनच आंबेडकरी विचारामध्ये फुट पाडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सहित भाजपा व प्रस्थापित पक्षांनी महाराष्ट्रात 40/50 वर्ष सत्ता उपभोगली आहे.
एवढं करूनही महाराष्ट्रात 40/50 वर्षत सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आंबेडकरी विचारधारा संपविण्यासाठी, त्यातील जाज्वल्य नष्ट करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. ऐन निवडणूक काळातील राजकीय खेळ्या पहा
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, सेना व प्रस्थापित राजकीय पक्षांना टक्कर देत बाळासाहेब आंबेडकर एक एक प्रयोग करीत बहुजनांची वज्रमुठ उभी करीत असतांना, ऐन निवडणूक काळात सत्ताधारी व प्रस्थापित राजकीय पक्षांनी कुटील व कपटी राजकीय डावपेच खेळले आहेत.

  1. ॲट्रॉसिटीचा मुद्दा नसतांना देखील तो विषय ऐन निवडणूकीत चर्चेत आणणे, विकाऊ पत्रकारांना हाताशी धरून या विषयांवर माध्यमांत व वृत्तपत्रात विनाकारण चर्चा घडवुन वातावरण गढुन करण्याचे काम केले आहे.
  2. निवडणूक लोकसभेची असो की विधानसभेची, जिल्हा परिषद असो की महापालिका, पंचायत समिती व नगरपालिकेची…. प्रत्येक निवडणूकीत ज्या मतदारसंघात बाळासाहेब आंबेडकर यांचा उमेदवार जिंकण्याच्या स्थितीत आहे, त्या त्या मतदारसंघात जातीय व धार्मिक विष पेरण्याचे काम सत्ताधारी व प्रस्थापित राजकीय पक्षांनी केले आहे. गणपतीच्या अंगावर निळ टाकणे, देवी देवतांच्या मंदिरावर रातोरात निळा झेंडा लावणे, बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना करणे, बुध्द विहारासमोर किंवा मोठ्या दलित वसाहतीमध्ये देवी देवतांची स्पीकरवरून मोठ्याने गाणी लावणे यासह दलित समाजाबद्दल इतर समाजाच्या मनात घृणा निर्माण होईल असे कृत्य करणे आणि दलितांच्या मनात सवर्ण समाजाबाबत व्देष व तिरस्कार निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्याचे अनेक प्रयोग महाराष्ट्रात झाले आहेत.
    या सर्व प्रयोगाचे शिल्पकार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सह भाजपा व प्रस्थापित राजकीय पक्षांना जात असल्याचे आंबेडकरी विचारवंतांनी अनेक लेखांतून मत व्यक्त केले आहे. यात ज.वि. पवार, राजा ढाले, नामदेव ढसाळ, शांताराम पंदेरे, अविनाश महातेकर यांच्या अनेक लेखांत यापूर्वी हे मुद्दे आलेले आहेत.
    या सर्व राजकीय कपटी खेळात एक उद्देश होता व आहे की, बाळासाहेब आंबेडकरांचे बहुजन हिताय, बहुजन सुखाय ची संकल्पना राज्यात रुजली जाऊ नये, शोषित, पिडीत, वंचित बहुजन समाजाला सत्तेत येऊ दयायचे नाही, गरीब मराठा समाजाला सत्तेत येऊ दयायचे नाही, ओबीसी समाजाला सत्तेत येऊ दयायचे नाही, अल्पसंख्याकांना तर सत्तेपासून दुरदुर ठेवायचे… हिंदू आणि हिंदूत्वावर चर्चा करून, मुस्लिम अल्पसंख्यांकाविरूद्ध विव्देषाचे राजकारण खेळण्यात आले आहे. ऐन निवडणूकीत धार्मिक व जातीय वातावरण निर्माण करून मतविभागणी घडवुन सत्तेपर्यंत पोहोचण्याचे अनेक प्रयत्न प्रस्थापित राजकीय पक्षांनी केलेले आहेत.
    जातीय धार्मिक तेढ ऐन निवडणूकीत निर्माण करून, प्रादेशिक अस्मिता मोडून काढणे, नागरीकांच्या भावना चिरडून टाकणे, जातीय व धार्मिक धु्रवीकरणानुसार व धु्रवीकरणानंतर मतदारांच्या मानसिकतेनुसार, एक तर ही मते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावीत, ती जर काँग्रेस- राष्ट्रवादीला मिळाली नाहीत तर ती मते भाजपाला मिळाली पाहिजे यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागलेली असते. परंतु काहीही करून, ही मते बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय पक्षाला मिळणार नाहीत अशी तरतुद केली जाते. एकवेळ भावना दुखावलेला मतदार … रागाने आम्हाला मतदान करतील किंवा मतदानच करणार नाही म्हणजे राजकीय भाषेत प्रतिस्पर्धी उमेदवाराचे मतदान कुजवुन टाकणे असे त्याला म्हटले जाते.
    काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस या सत्तापिपासू पक्षाने आजपर्यंत बहुजन समाजातील उगवत्या राजकीय नेतृत्वाचे रक्तपिपासूपणाचे कृत्य केले आहे. आंबेडकरी राजकीय पक्षाची युती झाली तरी त्यांची मते भारीप किंवा वंचित बहुजन आघाडी किंवा अन्य बहुजन समाजातील नेत्याच्या राजकीय पक्षाला ती मिळत नाहीत. मतांचे आदान प्रदान केले जात नाही. आमची मते युतीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतात परंतु काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची मते भाजपाला वळवली जातात हा इतिहास आहे.
    40/50 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने राखीव जागा किंवा आरक्षणाच्या नावाने गळा काढला आहे. परंतु आजही गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, मुस्लिमांना आरक्षण मिळाले नाही, धनगर समाजाला आजही अनु. जमातीमध्ये न्याय मिळाला नाही… लिंगायत समाजाला न्याय मिळाला नाही… आजही ही सर्व प्रकरणे न्यायालयात व विधीमंडळात धुळखात पडली आहेत.
    याच सत्तापिपासू काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मागील 40/50 वर्षात भारतीय संविधानातील आरक्षणाच्या तरतुदीनुसार, अनु. जातीतील 60 जाती, अनु. जमाती(आदिवासी) तील 58 जाती, भटक्या व विमुक्त जातीतील एकुण जाती संख्या 50, विशेष मागासवर्ग, ओबीसी एकुण जाती 500 या सर्व 1500 जातींसाठी असलेले आरक्षणाची एक 1 टक्का जरी अंमलबजावणी केली असती तर आज महाराष्ट्राच्या 50 टक्के घरात सरकारी अधिकारी व कर्मचारी असते. 100 टक्के अंमलबजावणी केली असती तर मागासवर्गीय असलेल्या 1500 (एक हजार पाचशे जातीमध्ये) समाजात एकही बेरोजगार, गुन्हेगार झाला नसता. परंतु ह्याचे सर्व श्रेय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाचे आहे.
    आज जातीय व धार्मिक ध्रृवीकरण करून, सामाजिक ध्रृवीकरण व राजकीय पक्षांच्या मतविभागणीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा सहित प्रस्थापित पक्षांचे आमदार, खासदार नगरसेवक झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेचा यांना जनाधार नाही. केवळ जात-धर्म ध्रृवीकरण, मतांचे विभाजन करून सत्तेपर्यंत पोहोचलेले हे सांड आहेत. त्यामुळे ह्या सत्तापिपासू व बहुजन समाजाचे रक्तपिपासू व बहुजन समाजातील पिढ्या न पिढ्या बर्बाद करणाऱ्या राजकीय पक्षांपासून बहुजन समाजाने दूर राहणेच योग्य ठरणार आहे. सत्तापिपासू पक्षांच्या धोरणांमुळेच आज राजु शेट्टी, सदाभाऊ खोत, गोपिचंद पडळकर व बहुजन समाजातील लढवय्ये रागराग व्यक्त करीत आहेत. ते कोणत्याही पक्षात असले तरी यांची हीच खंत आहे.
    मित्रहो, मागील 40/50 वर्षातील हा इतिहास आहे. यावर शेकडो पुस्तके व हजारोंनी लेख प्रकाशित झाले आहेत. परंतु त्यावर कोणतीही आजपर्यंत चर्चा घडवुन आणली नाही. आज ही धमक केवळ बाळासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये आहे. म्हणूनच ईडी, सीबीआय, आयटी ची कोणतीही भिती न बाळगता ते लढवय्या सरदारासारखे मैदानात उतरले आहेत.
    आता पुढे जाऊन यापैकी वरील सर्व गुन्हे व राजकीय खेळ्या नव्या स्वरूपात, नव्याने मांडले जातील. जाणिवपूर्वक खिजगणीत पडलेले दलित पुढारी बाहेर आणण्याचे काम केले जाईल. परंतु जातीय व धार्मिक मुद्दे बाजुला ठेवणे काळाची गरज आहे. महाराष्ट्रात देशात पराकोटीची महागाई आहे, बेरोजगारीने मागील 70 वर्षातील रेकॉर्ड मोडला आहे, गृहउदयोग, लघुउदयोग बंद पडले आहेत. मोठ्या उद्योगांना घरघर लागली आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही, मध्येच कांदा असो की, सोयाबीन त्याचे भाव पाडले जात आहेत. महाराष्ट्राने आजपर्यंत देशाला नेतृत्व व मार्ग दाखविला आहे, त्या महाराष्ट्राच्या हितासाठी… महाराष्ट्राच्या विकासासाठी… महाराष्ट्राचे पुरोगामित्व जपण्यासाठी… राज्यात वंचित बहुजन आघाडी व शिवसेना युती झाली आहे. बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहून महाराष्ट्र प्रगतीपथावर न्यायचा आहे. त्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे येऊन वंचिला सत्तेत आणणे आणि वंचित सोबतच सत्तेत पोहोचून, बहुजन हिताय… बहुजन सुखाय… चे राज्याची पुनः उभारणी होणे आज काळाची गरज आहे. ही शेवटची संधी आहे… चुक झाली तर इतिहास कधीच माफ करणार नाहीये….