Friday, December 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडणारा डॉन…

मला आमदार झाल्यासारखं वाटतय…
गुन्हेगारांवर कारवाई करतांना पोलीस दलाची पुनर्रचना करणे आवश्यक
पुण्यातील गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडणारा डॉन…

  • गुटख्यावर धडक कारवाई,
  • ड्रग्जवर हातोडा,
  • सरावलेल्या 3,700 गुन्हेगारांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई
  • 9 गुन्हेगारी टोळयां मधील 65 गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई
  • 3 गुन्हेगार स्थानबध्द तर
  • 42 गुन्हेगार तडीपार… आता….

आता पुढे….
1) खाजगी सावकारी,
2) लँड माफिया व रिअल इस्टेट,
3) गोल्ड मार्ट व गोल्डन सावकारी
4) बांधकाम व्यावसायिक
5) दुचाकी, चारचाकी वाहनांचे डिलर,
6) फायनान्स कंपन्या व त्यांचे वसुलीचे एजंट
आता यांच्यावर कारवाई होणे आवश्यक

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयात सलग पाच पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळात गुन्हेगार व गुन्हेगारी कृत्यांवर जेवढ्या कारवाया झाल्या नाहीत तेवढ्या कारवाय पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यापासून श्री रितेश कुमार यांनी केल्या आहेत. गुन्हेगारांना आर्थिक रसद पुरविणाऱ्या गुटखा, ड्रग्ज विरूद्ध मोहिम उघडण्यात आली आहे. दरम्यान पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे संघटीत गुन्हेगारी करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच सराईत गुन्हेगार यांचेवर अंकुश ठेवण्यासाठी ऑल आऊट व कॉम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगार चेकींग, गुन्हेगार आदान-प्रदान, दत्तक गुन्हेगार अशा योजना राबवुन अशा गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करणे व त्यांचे हालचालींवर लक्ष ठेवुन त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यात येत आहे. अशा रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाईबाबत श्री. रितेश कुमार यांनी विशेष मोहिम सुरू करून, त्यांनी पदभार घेतल्यापासुन 3,700 सराईत गुन्हेगारावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.


याच बरोबर गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांना आर्थिक रसद पुरविणाऱ्या गुटखा माफिया, ड्रग्ज माफियांविरूद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. डेक्कन, शिवाजीनगर, फरासखाना, समर्थ, सहकारनगर, भारती विदयापीठ, दत्तवाडी, वारजे, उत्तमनगर, कोथरूड, सिंहगड चतुःश्रृंगी, चंदननगर, विमानतळ, येरवडा, विश्रांतवाडी, मुंढवा, लोणीकाळभोर व हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान पुणे शहरात गुटखा नेमका येतो कुठून, त्याचे डिलर कोण आहेत, साठा कुठे करून ठेवला जातो. या धंदयात किती गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत याचाही शोध घेणे आवश्यक आहे.
आरोग्यास घातक असलेला व राज्य शासनाने बंदी घातलेल्या गुटख्यासहित सुगंधी सुपारी, आणि पान मसाल्याचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तथापी आता मोठा मासा गळाला लागणे अपेक्षित आहे.
गांजा, पन्नी, चर्रस, मेफेड्रॉन, कोकेन सारख्या अंमली पदार्थांची पुण्यात मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. अंमली पदार्थ विभाग क्र. 1 व 2 चे अनुक्रमे श्री.विनायक गायकवाड व श्री. थोपटे यांनी अंमली पदार्थांविरूद्ध अगोदरच दंड थोपटले आहेत. ड्रग्जविरूद्ध सगळीकडे धडाधड कारवाया होत आहेत.
दरम्यान गुन्हेगारांना आर्थिक रसद ज्या ज्या अवैध धंदयातून मिळते त्या त्या सर्व धंदयाची माहिती घेवून, संबंधितांविरूद्ध कठोर कारवाई करणे आवश्यक आहे असे एकंदरीत दिसून येते. गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्या ह्या प्रामुख्याने 1) खाजगी सावकारी, 2) लँड माफिया व रिअल इस्टेट, 3) गोल्ड मार्ट व गोल्डन सावकारी 4) काही कुख्यात बांधकाम व्यावसायिक यांच्यावर देखील कारवाई होणे अपेक्षित आहे. खाजगी सावकार, रिअल इस्टेट, गोल्डन सावकारी, बांधकाम व्यावसायिक, फायनान्स कंपन्या यांचे मोठ्या प्रमाणातील रक्कम विखुरली गेली आहे. ज्यांच्याकडून रकमांची वसुली होत नाही, त्या त्या ठिकाणी गुन्हेगारी टोळ्यांचा वापर होत असल्याचे अनेक प्रकरणांवरून दिसून येत आहे. गुटखा आणि अंमली पदार्थाविरूद्ध कारवाई होत आहेच परंतु वरील बाबींवर देखील कारवाई होणे अपेक्षित आहे.
कोयता गँगचा मास्टर माईंड आणि आर्थिक रसद –
नुतन पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांच्या अगोदरच्या पोलीस आयुक्तांनी पदावरून पाय उतार होताच, पुणे शहरात कोयता गँग हा प्रकार सुरू झाला आहे. यामागचे नक्की कारण काय आहे याचा शोध लागत नाहीये. मकोका आणि एमपीडीए च्या धडाधड कारवाया करून तुफान प्रसिद्धी मिळविली. परंतु गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडली असल्याचे दिसून आले नाही. गुटख्याविरूद्ध, ड्रग्ज विरूद्ध पाहिजे तेवढी कारवाई दिसून आली नाही. कुख्यात बांधकाम व्यावसायिक आणि गोल्डन सावकार मात्र या काळात तेजित राहिले होते. त्यांच्या पायउतार होत्या क्षणीच कोयता हा प्रकार सुरू झाला आहे. यावर मंथन व चौकशी होणे आवश्यक आहे.
पुणे शहर व परिसरातील एकुण गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्या नेमक्या किती आहेत, त्यांना अर्थिक रसद कुठून मिळते, त्यांचे नेमके धंदे काय सुरू आहेत याच्यावर संशोधन व अन्वेषण होणे आवश्यक आहे. संबंधित गुन्हेगारी टोळ्यांना कोणत्या राजकीय पक्षांचे बळ प्राप्त आहे, प्रत्येक टोळ्यांचे येरवड्यासहित अन्य कारागृहात एकुण किती गुन्हेगार आत आहेत, त्यांच्या आतील व बाहेरील कारवाया कशा सुरू असतात, यावर अन्वेषण झाल्यास, पुणे शहरात गुन्हेगारी डोके वर काढू शकणार नाही. दरम्यान हडपसर, लोणी व मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत काही अल्पवयीन मुलांनी हातातील कोयते हवेत फिरवुन दशहत निर्माण केली, त्याला पुण्यातील माध्यमांनी कोयता गँग हे नाव देवून त्याला मोठ्ठी प्रसिद्धी दिली. त्यामुळे त्यांचे अनुकरण इतरही पोलीस स्टेशन हद्दीत पहावयास मिळत आहे. एखाद्या बातमीला प्रमाणापेक्षा अधिक प्रसिद्धी मिळाली की त्याचे लोण शहरात इतरत्र पसरणार यात शंकाच नसते.
एकाच गँगने इतर दोन तीन पोलीस स्टेशन हद्दीत धुडगूस घातला तर गँग म्हणजे उचित ठरते. परंतु प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत पकडण्यात आलेल्या कोयते बहाद्दरांपैकी बहुतांश चेहरे नवीन होते. एकाही स्वरूपाचे होते. त्यामुळे त्याला गँग किंवा टोळी म्हणून प्रसिद्धी देणे शहराच्या दृष्टीने घातक ठरत आहे. पोलीस आयुक्तांच्या प्रेसनोट मध्ये देखील कोयता गँग ह्या शब्दाचा उल्लेख करणे उचित नव्हते.
वास्तविक पाहता, हवेत कोयता फिरवुन दहशत माजविणारे कोणत्या गुन्हेगारी टोळीशी त्यांचे लागेबांधे आहेत काय, नव नवीन चेहऱ्यांना नेमक कोण ऑपरेट करीत आहे काय, याचा एकच मास्टरमाईंड आहे की अनेक गुन्हेगारी टोळ्या नवयुवकांचा गुन्हेगार म्हणून वापर करीत आहेत हे पाहणे आवश्यक आहे. हवेत कोयता, तलवारी फिरविणे, दहशत माजविणे हे सर्व प्रकार पूर्वी झोपडपट्टी भागात होत होते. हा नवीन प्रकार मुळीच नाही. हे सर्व प्रकार त्या त्या भागात होत होते. परंतु त्याची लागण संपूर्ण शहरात झाली आहे. त्याचे कारण खाजगी सावकारी, गोल्डन सावकारी, बांधकाम व्यावसायिक, ड्रग्ज माफिया, गुटखा माफिया हे असू शकते. याच बरोबरीने फायनान्स कंपन्या व कंपन्यांची थकित वसुली करणारे एजंट, दुचाकी, चारचाकी वाहनांचे डिलर यांनी देखील थकित रकमांच्या वसुलीसाठी अशा प्रकारचे गुन्हेगार पाळले असल्याचे अनेक प्रकरणांवरून समोर आलेले आहे. थकित रकमांची वसुली करण्यासाठी नव्या दमाचे अल्पवयीन पैलवान असले की, काम लगेच होते असे काही समज गैरसमज गुन्हेगारी टोळ्यांमध्ये नव्याने आले आहेत काय… दादा, भाई, डॉन होण्यासाठी, इतरांनी आपल्याला घाबरून भाई… भाई … म्हणून सलाम करावा असे चित्रपट सदृष्य कथन वास्तवात आणण्यासाठी किती मुले यात गुंतलेली आहेत, याचाही तपास होणे आवश्यक आहे.
दरम्यान काही पोलीसांकडून कायदयाचा दुरूपयोग होत असल्याचे अनेकांचे रडगाणे सुरू असते. आयपीसी 384, 385 च्या खोट्या केसेस केल्या जात असल्याचे अनेकांचे मत झाले असल्याचे ऐकण्यात आले आहे. तसेच इतरही अनेक प्रकरणांत ओरड होत असल्याचे दिसून येत आहे.
मला आमदार झाल्यासारखं वाटतय…
गुन्हे विषयक बातम्या आणि न्यायालयीन खटल्यांच्या संदर्भात अनेकदा शिवाजीनगर येथील न्यायालयात गेल्यानंतर, हल्ली हल्ली मिसरूड फुटलेले शेकडोंनी मुले न्यायालयात आणि न्यायालयाच्या बाहेर थांबलेले असतात. काल तर कमालच झाली. प्रकरण काय होते समजले नाही. पंरतु दोन जाळीच्या मोठ्या पोलीस वाहनात 30/40 आरोपी, गुन्हेगार जाळीतून हात बाहेर काढुन, बाहेर थांबलेल्या शेकडो मुलांकडे हात करीत होती. बाहेर थांबलेली तरूण मुले देखील तोंडात गुटख्याचा तोबरा भरून, हसत मुखाने, आनंदी आनंद होवून, पोलीस वाहनातील गुन्हेगार आरोपींना आनंदाने हातवारे करीत होती. अगदी पोलीस वाहनातील आरोपी गुन्हेगारांना देखील… मला आमदार झाल्यासारखं वाटतय …. हे गाणे म्हणणं बाकी राहीलं होतं. गुन्हा करून, जेल एन्ट्री झालेल्यात एवढा जोश तर बाहेर असलेल्यांमध्ये किती जोश भरलाय हे पाहून मन चिंताक्रांत झालं होतं.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा पदभार श्री. रितेश कुमार यांनी घेतल्यापासून पुण्यात कोयता प्रकार सुरू झाला आहे. कारवाया देखील दमदार आहेत. आता इतर गुन्हेगारी रसद पुरविणाऱ्यांची देखील झाडाझडती होणे आवश्यक आहे.
गुन्हेगारांवर कारवाई करतांना पोलीस दलाची पुर्नरचना करणे आवश्यक-
एकाच पोलीस स्टेशनमध्ये काही अधिकारी कर्मचारी वषानुवर्षे कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. सहा.पोलीस निरीक्षक ते वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदापर्यंतचे अधिकारी हे आलटून पालटून पोलीस स्टेशन घेतात, प्रसंगी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील 20/25 प्रकारच्या गुन्हे शाखांमध्ये बदली करून घेतात. कामात तोच तोच पणा, निरसपणा आलेला आहे. त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या हेडक्वॉर्टरमध्ये काही काळासाठी करणे आवश्यक आहे. तर हेडक्वॉर्टर किंवा अकार्यकारी पदावर सध्या कार्यरत असलेल्यांना संधी देणे आवश्यक आहे.
प्रतिनियुक्तीवर कार्यरत कर्मचाऱ्यांची देखील झाडाझडती घेणे आवश्यक ठरत आहेच. परंतु मागील अनेक वर्षांपासून केवळ पोलीस स्टेशन, पोलीस चौकी करणाऱ्या शिपाई ते सहा.पो.नि. पर्यंत सर्वांना बदलीचा बदल दाखविणे काळाची गरज झाली आहे. तसेच गुन्हे शाखेच्या अनेक युनिट मध्ये आलटून पालटून गुन्हे शाखेतच कार्यरत असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या गुन्हे शाखांची पुनर्रचना होणे आवश्यक ठरते. पुणे शहर पोलीसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाया केल्या आहेत, परंतु आता खात्याची पुर्नरचना होणे आवश्यक ठरत आहे. याबाबत देखील वरीष्ठ आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक ठरत आहे. थोडाफार बदल करून पहायला काय हरकत आहे. पुणे शहरासाठी अशा प्रकारचे प्रयोग होणे आवश्यक वाटते.