Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मामा आणि मामुची जमली जोडी, पर्वतीला लावली- जुगाराची गोडी,अहो दाजीबा, गावात होईल शोभा हे वागणं बरं नव्हं

पोलीस आयुक्त रितेश कुमारांची 53 वी मकोका कारवाईत पर्वती पोलीस स्टेशनने बाजी मारली
वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडेंचे अक्षम्य दुर्लक्ष

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
दिवाळीत उडवण्यात येणारी शोभेच्या दारूच्या फटाकड्या तयार करण्याचे काम दक्षिण भारतात घराघरात आणि प्रत्येक गल्लीबोळात काम करणारे लोक आढळून येतात, पुण्याच्या दक्षिण भागातही घराघरात आणि गल्लीबोळात वेगवेगळ्या डाळींचे पापड लाटण्याचे काम केले जाते. पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी, चतुःश्रृंगी, बिबेवाडी, वारजे माळवाडी इत्यादी पोलीस स्टेशन हद्दीत घराघरात आणि गल्लीबळात हातभट्टी निर्मिती केली जाते. तस्सं जुन्या दत्तवाडी व अत्ताच्या पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील जनता वसाहत या महाकाय झोपडपट्टीमध्ये घराघरात आणि गल्लीबोळात गुन्हेगार तयार केले जात आहेत, निर्माण होत आहेत. थोडक्यात गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना म्हणून किंवा सरावलेले गुन्हेगार पुणे शहराला देण्याचे काम पर्वती पोलीस स्टेशन यांनी केले आहे. यामुळेच पर्वती पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्वाधिक जास्त तडीपार गुन्हेगार, मकोका व एमपीडीए कायदयाने कारवाई केलेले सर्वाधिक जास्त गुन्हेगार, पर्वती पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आढळून येत आहेत. पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांनी आज मकोका कायदयान्वये 53 वी मकोका कारवाई पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील करण्यात आली आहे. थोडक्यात सर्वाधिक जास्त गुन्हेगार पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत असल्याचे दिसून येत आहे. यात पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीची अंतिमतः जबाबदारी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांचीच आहे.

पर्वती पोलीस स्टेशन बाबत चार शब्द –
पूर्वीचे नाव दत्तवाडी व आत्ताचे पर्वती पोलीस स्टेशनचे एकुण लोकसंख्या साडेपाच लाख लोकसंख्येवर कायदेशिर नियंत्रण आहे. त्यात लक्ष्मीनगर, जनता वसाहत, पर्वती दर्शन व दत्तवाडी अशा चार पोलीस चौक्या असून तीन वायरलेस व एकुण चार बिट मार्शल कार्यरत आहेत.वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदावर सध्या जयराम पायगुडे कार्यरत आहेत. पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील जनता वसाहत, लक्ष्मीनगर, आंबेडकर वसाहत, अण्णाभाऊ साठे वसाहत, तावरे कॉलनी आदि ठिकाणी मोठ्या झोपडपट्टया असून, सहकारनगर दोन मधील काही झोपड्यांचा समावेश पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत होत आहे.
पर्वती पोलीस स्टेशन होण्यापूर्वी स्वारगेट पोलीस स्टेशन नंतर सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत या भागांचा समावेश होता. लोकसंख्येच्या घनतेनुसार, व वाढत्या गुन्हेगारीचा प्रतिबंध करण्यासाठी दत्तवाडी पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. दत्तवाडीचे नामांतर केले असून दत्तवाडीला पर्वती पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जात आहे.

गुन्हेगारी वाढण्याची मुळ कारणे-
मामा आणि मामुची जमली जोडी, पर्वतीला लावली- जुगाराची गोडी –
बेसूमार गुन्हेगारी वाढीची अनेक कारणे असली तरी सहजपणे उपलब्ध होणारा पैसा, त्यातून आलेला चंगळवाद हे सर्व टिकविण्यासाठी गुन्हेगारी वाढत असल्याचा एक निष्कर्ष आहे. पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत कमालीचे जुगार, मटका अड्डे सुरू झाले आहेत. एक दोन नव्हे तर सात ते आठ ठिकाणी मटका जुगार अड्डे, पत्ते, रमीचे क्बल सुरू आहेत. याच्या जोडीला, नशेखोरीसाठी गांजाची सर्वाधिक विक्री ही पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतून होत आहे. थोडक्यात गुन्हेगारांचे उत्पादन व गांजाची विक्री हीच पर्वती पोलीस स्टेशनची सर्वाधिक खासित म्हणून ओळखली जात आहे.

मी मागेच नमूद केले आहे, एखाद्या बेरोजगाराने साधी चहा नाष्टयाची किंवा पालेभाजीची हातगाडी लावली तरी, पुणे महापालिका अतिक्रमण विभागासह पोलीसांची धाड पडते. महापालिका कर्मचारी आणि पोलीसांसोबत सौदा पक्का न केल्यास, त्याच्यावर धडक कारवाई होते. आता एवढ्या मोठ्या संख्येने मटका जुगार अड्डे चालु असतांना, ही बाब स्थानिक पोलीसांना माहिती नाहीये असे म्हणता येईल किंवा कसे याबाबत विचारमंथन सुरू आहे. 

पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत पूर्वीपासून मामा नावाच्या इसमाचे वर्षानुवर्ष बस्तान आहे. पर्वती गावासह गजानन महाराज मठातील नाल्यात व पुढे दांडेकर पुलावर वेगवान घोडदौड सुरू आहे. मध्यंतरी सवारीगेटची परिक्रमा केली, आता पुनः जुन्या वाड्यात घोडदौड सुरू केली आहे. आता मामासह शब्बीरमामू की साहीलबाबु याचीही पर्वती पोलीसांच्या मदतकार्यावर बरीच घोडदौड ऐकायला मिळत आहे. एक नाही, दोन नाही, तर तब्बल पाच ठिकाणी सेंटर उभे करून, संपूर्ण पर्वतीवर कब्जा केला आहे. जोडीला इर्न्फोरमेशन टेक्नॉलॉजिचा भंग करणारी ऑनलाईन लॉटरी, व्हिडीओ गेम सोबतीला आहेच. एवढ्याच पर्वती पोलीसांची कामगिरी थांबत नाही. अंमली पदार्थांची बरीच मोठी उलाढाल केली जात आहे. अर्ध्या पुणे शहराला दर दिवसाला पुरेल इतक्या गांज्याची निर्यात केली जात आहे. गांजाच्या निर्यातीबाबत तर अंमली पदार्थ विभागाने मौन बाळगले आहे की काय अशी शंका येते. संपूर्ण शहरात कारवाया होतात. परंतु पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत मागील 5 वर्षात एकदाही कारवाई झाली नाही हे विशेष. 

इतर गुन्हे शाखा इतक्या शांत कशा –
सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा, इतर गुन्हे विषयक शाखांची तर कारवाई नाहीच. दरम्यान पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील 12/15 वर्षांच्या मुलांच्या तोंडात गुटखा येतो तरी कुठून, नशेखोरीसाठी अंमली पदार्थ येतात तरी कुठून, गुन्हेगारी कृत्ये करण्यासाठी आर्थिक बळ मिळते तरी कुठून याचा तपास करणे आवश्यक असतांना, गुन्हे घडल्यानंतर, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांच्या जुन्या काळातील चित्रपटातील पोलीसांप्रमाणे सध्या पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत सर्वच विभागांच्या पोलीसांचा अभिनय पहायला मिळत आहे. ही तर बाब खरीच आहे की, पुणे महापालिका आणि पोलीसांच्या मर्जीखेरीज रस्त्यावर बसून साधी चहा नाष्टयाचीही गाडी लावु शकत नाही. मग अशा प्रकारचे अवैध धंदे पोलीसांच्या नरजेतून सुटतील कसे हा गहन प्रश्न आहे. गुन्हेगारांना अवैध धंदे चालवण्यासाठी राजदरबाराचे दरवाजे खुले करायचे आणि दोन टोळ्यांमध्ये युद्ध झाले की, एकावर मकोका दुसऱ्याच्या डोक्यावर राजमुकूट. अशा प्रकारच्या भेदभावामुळे गुन्हेगारी पराकोटीला पोहोतच आहे. 12 वर्ष, 15 वर्ष 18 वर्ष 22 वर्ष अशा वयाचे तरूण जर गुन्हेगारीत आले तर पुढे त्यांचे भविष्य काय असा प्रश्न उपस्थित होतो.

पोलीस आयुक्तांनी या विषयांवर आदेश काढावेत-
गंभिर गुन्ह्यांमुळे त्यांना सरकारी नोकरीपासून कायम वंचित रहावे लागेल. या शिवाय चारित्र्य पडताळणी खेरीज खाजगी नोकरीही मिळणार नाही. बँका पायरीवर पाय ठेवू देणार नाही. त्यांना उपजिविकेचे कोणतेही साधन उपलब्ध होणार नाही. मग पुढे गुन्हेगारी हाच एक मार्ग राहतो. एक दुसऱ्याला ठोकणार, दुसरा तिसऱ्याला ठोकणार, एक एकाचे मुडदे पडत राहणार… शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत राहणार आहेत.त्यामुळेच पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी आढावा बैठकीत गुन्हे विषयक विषयांवर चर्चा करतांना ह्या बाबी देखील प्रकर्षाने मांडणे आवश्यक आहे. एकट्या पायगुडे यांच्यावर जबाबदारी न टाकता, इतरही गुन्हे शाखांवर जबाबदारी निश्चित करणे अपेक्षित आहे. तुर्तात इतकेच.