Monday, December 30 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

आरक्षणवाद्यांनी आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, महायुती व महाभकास आघाडीच्या कटकारस्थानांपासून दूर रहा

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
आपण दलित आहोत की आदिवासी, ओबीसी आहोत की, भटके विमुक्त हे सर्व आरक्षणाच्या कक्षेत येतात. ज्या ज्या समाज घटकांनी, ज्या ज्या लहान मोठ्या पक्षांनी काँग्रेस किंवा भाजपाला आजपर्यंत समर्थन दिले ते सर्व पक्ष, संघटना नेस्तनाबुत झाले आहेत. नामशेष झाले आहेत. मुस्लिम समाजाने आजपर्यंत काँग्रेसला साथ दिली, आज त्याच मुसलमानांना काँग्रेसने 288 पैकी 3 जागा दिल्या आहेत, शिवसेना ठाकरे गटाने 288 पैकी एकाही मुसलमानाला उमेदवारी दिली नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाने 288 पैकी केवळ 2 ठिकाणी मुसलमानांना उमेदवारी दिली आहे. राज्यात मुस्लिमांची संख्या दोन ते अडीज कोटी आहे. एवढ्या मोठ्या समाजाला एकाही पक्षाने आमदारकीसाठी आणि खासदारकीसाठी उमेदवारी देत नाहीत. महाराष्ट्रातून मुस्लिम आणि ओबीसीचा एकही खासदार नसावा ही मोठी शोकांतिका आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांची मते आम्हालाच मिळणार आहेत असे गृहित धरले आहे. त्यामुळे या पक्षांना मुसलमानांची मते हवीत परंतु त्यांना सत्तेत सहभाग दिला जात नाही. तीच अवस्था काही दलित संघटनांची आहे, कालपर्यंत काँग्रेस, भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा देणारे पक्ष आज नामशेष झाले आहेत. हे मोठे पक्ष- लहान पक्ष व संघटनांना गिळंकृत करतात, त्यांना सत्तेत सहभाग दिला जात नाही. राज्यात 20/22 टक्के एससी/एसटी व 52 टक्के ओबीसी समाज आहे. 5 टक्के मुस्लिम समाज आहे. ह्या समाजाने एकजुट दाखविली तर प्रस्थापित पक्षांची दाणादण उडेल. परंतु बहुजन समाजाची गरीबी आणि लाचारीने बहुजन समाजाचे पक्ष उभे राहत नाहीत. त्यात हे मोठे पक्ष बहुजन जातीतील पक्षांमध्ये फुट कशी पडेल, जाती जाती मध्ये भांडण कसे लागेल यासाठी अधिक प्रयत्न करतात. लहान पक्षात एकाद्याला आमदारकी, महामंडळाची लालुच दाखविली जाते व लहान पक्ष फोडले जातात हा इतिहास आहे.
राज्यात भाजपा- शिवसेना आली काय आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवा आली काय… ते कधीच बहुजन जाती धर्मांचा विकास होवू देणार नाहीत. आज ओबीसींचे आरक्षण थांबविण्यात आले आहे. राजकीय आरक्षणाचा घोळ सर्वोच्च न्यायालयापर्यत घेवून गेले आहेत, कोर्टामार्फत हे आरक्षण थांबविले गेले आहे. उद्या ओबीसींचे शिक्षण व नोकरीतील आरक्षण जाण्याच्या मार्गावर आहे. आंबेडकरी चळवळीने प्रस्थापितांना भांडून मंडल कमशिनची अंमलबजावणी करण्यास 90 च्या दशकात भाग पाडले. आज 30/35 वर्षांनंतर पुन्हा ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा एैरणीवर आला आहे. त्यामुळे आम्ही आरक्षणवादी आघाडीची स्थापना करून लहान मोठ्या संघटनांची वज्रमुठ बांधत आहेत. ही बातमी कोणतेही वृत्तपत्र किंवा टिव्ही चॅनेलवाले दाखविणार नाहीत.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा भाजपा शिवसेना सत्तेवर आली तरी काहीच फरक पडत नाही. धर्मनिरपेक्षतेचा ठेका आम्हीच घेतला नाही, धर्मनिरपेक्ष म्हणून ज्यांना मतदान केले, ते भाजपा शिवसेनेसोबत गेले. आपल्या उमेदवाराला दिलेले मत वाया जात नाही, समाजाची एकजुट दाखविल्यास, प्रस्थापित पक्षही आपल्या पायाशी येतील…यासाठी आरक्षणवादी समाजाने आरक्षणवादी उमेदवार युवराज बनसोडे यांना विजयी करण्याचे आवाहन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.

राज्यातील प्रस्थापित पक्ष एकाच जातीचे आहेत-
राज्यातील काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी आणि भाजपा प्रणित महायुतीतील सर्वच राजकीय पक्ष हे केवळ एकाच जातीचे आहेत. वर्षानुवर्षे तेच आमदार, तेच खासदार होतात. कधी ह्या पक्षात तर कधी त्या पक्षात अशा कोलांटउड्या मारून कायम सत्तेत राहण्याची जादू करून दाखवित असतात. प्रत्येक निवडणूकीत दलित-आदिवासी, ओबीसी व मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना कधीच उमेदवारी दिली जात नाही, तसेच या समाजातील मतदारांना कधीच विश्वासात घेतले जात नाही. केवळ जाती जाती व धर्माधर्मात भांडण लावले की यांचे काम झाले. भितीपोटी हा समाजा एकतर काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीतील पक्षांना मतदान करतो नाहीतर भाजपा प्रणित महायुतीतील पक्षांना मतदान करतो. आलटून पालटून हेच सत्तेवर येतात.
मतदारांना कधीच विचार करीत नाहीत. निवडणूका आल्या की, जाती आणि धर्मातील वाद निर्माण केले जातात. परंतु सत्तेत असतांना मागील 15 वर्षात काय विकास कामे केली, बेरोजगारी व महागाई नियंत्रीत ठेवण्यासाठी कोणत्या उपाय योजना केल्या, शिक्षण आणि आरोग्य, हॉस्पीटल यासाठी कोणते प्रयत्न केले या विषयावर कधीच चर्चा होत नाही. जातीधर्मात भांडण लावुन, फुकटात मतदान घेण्याची काँग्रेस व भाजपा चे एकच मिशन आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. त्यामुळे दलित-आदिवासी, ओबीसी व मुस्लिम समाजातील मतदारांनी आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी असे आवाहन रिपब्लिकन सेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.

मराठा आणि ब्राम्हणांची मते कधीच फुटत नाहीत, मग आमच्याच मतांमध्ये फुट का पडते –
राज्यातील काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे गट हे पक्ष एकट्या मराठा समाजाचे आहेत. भाजपा तर ब्राह्मणांशिवाय अपूर्ण आहे. त्या समाजाची मते कधीच फुटत नाहीत. हा समाज केवळ त्यांच्याच पक्षातील उमेदवाराला मतदान करतात. त्यांच्या त्यांच्या पक्षातील उमेदवार लायकीचा नसला तरी त्याला मतदान करतात, वास्तविक पाहता दलितमुस्लिम समाजाने ब्राह्मण व मराठा समाजाकडून हे शिकुन घेतले पाहिजे. परंतु आपण ते कधीच समजुन घेत नाही. आपल्या समाजातील होतकरू उमेदवार निवडणूकीत उभे राहिल्यानंतर, त्याच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा हा समाज, प्रस्थापित पक्षाने लावलेल्या भांडणात उडी मारतो. भाजपाने एनआरसीचा मुद्दा काढायचा, बटेंगो तो कटेंगे असा नारा दयायचा आणि दुसऱ्या बाजुने लगेच काँग्रेसवाले दलितांना घाबरवुन टाकतात. परंतु जेंव्हा राज्यात हजरत मुहमंद पैंगबर हे बील आणण्यात आल्यानंतर, सगळ्याच पक्षाचे आमदार मुग गिळुन गप्प होते. केंद्र सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणल्यानंतर ह्याच काँग्रेसने भाजपाला पाठींबा दिला होता हे लक्षात घ्यावे लागेल.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमध्ये क्रिमिलेअर व उपवर्गीकरणाचा निकाल दिला आहे. काँग्रेस शासित राज्यात ह्याच सुप्रिम कोर्टाची अंमलबजावणी सुरू करून दलितामधील वेगवेगळ्या जाती व आदिवासी मधील वेगवेगळ्या जाती जाती मध्ये भांडणे लावण्यात आली. आपल्यात भांडणे लावुन हेच पक्ष मागील 70 वर्ष सत्तेत आहेत. त्यामुळे आपण कधी जागे होणार आहोत असाही सवाल आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. 

आम्ही आपल्या उमेदवारावर अविश्वास का दाखवावा –
भारतीय जनता पार्टीतील 60 टक्के आमदार खासदार हे पूर्वीच्या काँग्रेस मधीलच आहेत हे त्यांच्या नावानीशी पहा. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी व दोन्ही शिवसेनेतील सर्व आमदार, खासदार हे एकमेकांचे नातेवाईक व सगेसोयरे आहेत. त्यांचे हजार दोन हजार कोटींचे साखर कारखाने, सहकारी सुतगिरण्या, मोठ मोठ्या शिक्षण संस्था, सहकारी बँका, सहकारी पतपेढ्या, मेडिकल कॉलेज, मोठ मोठी हॉस्पीटल, मोठ मोठी वृत्तपत्रे व टिव्ही चॅनेल यामध्ये हजार कोटी/ कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा एवढा मोठा पैसा यांच्याकडे कुठून आला, याची कधी चौकशी झाली आहे काय…

जर दलित, आदिवासी, ओबीसी व मुस्लिम समाजातील उमेदवार निवडूण आले तर हेच प्रथम आमची चौकशी करतील. त्या भितीपोटी हे प्रस्थापित पक्ष दलित, आदिवासी, ओबीसी व मुस्लिम समाजात जाती जाती व धर्मा धर्मात भांडण लावुन देत आहेत. त्यामुळे प्रस्थापित पक्ष आम्हाला उमेदवारी देणार नाहीत. काँग्रेस मध्ये आज 25/30 वर्षांपासून जे दलित, मुस्लिम कार्यकर्ते व पदाधिकारी काम करीत आहेत, त्यांना साधी महापालिकेची देखील उमेदवारी दिली जात नाही. आमदारकी व खासदारकी तर दूरच राहिली. त्यामुळे धाडस करून आपल्या समाजातील उमेदवार जर निवडणूकीला उभे राहत असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. तुमचे मत कधीच वाया जात नाही. धर्मनिरपेक्षतेचा आम्हीच ठेका घेतला नाही. आजपर्यंत आम्ही धर्मनिरपेक्ष म्हणून काँग्रेस -राष्ट्रवादीला मतदान केले. पुढे ह्याच पक्षाचे आमदार व खासदार भाजपा व शिवसेनेसोबत गेले हा ताजा इतिहास आहे. हे सर्व वर्षानुवर्षे होत आहे. त्यामुळे दलित मुस्लिम समाजाने आपल्याच उमेदवाराच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे. 

मतदार म्हणून तुम्ही पाठीशी खंबीर उभे रहाल तर कॅन्टोन्मेंट मध्ये ट्रम्पेट करिश्मा करू शकते-
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघामध्ये दलित व मुस्लिमांची संख्या मोठी आहे. ओबीसी व बहुजन समाजाने एकजुट दाखवुन रिपब्लिकन सेना व आरक्षणवादी आघाडीचे उमेदवार युवराज बनसोडे यांना मतदान केल्यास, कॅन्टोन्मेंट मध्ये ट्रम्पेट करिश्मा करू शकतो. खरं तर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये दलित-मुस्लिम-ओबीसी हयातील जाती जमाती एकत्र आल्या तर आपलाच आमदार होवू शकतो. हे सर्व प्रस्थापित पक्षांना माहिती आहे. परंतु काँग्रेस व भाजपा हे आमच्या मनांत भिती निर्माण करून, आमच्या मतांमध्ये फुट पाडण्याचे काम सातत्याने करीत आहे.

युवराज बनसोडे हे तरूण उमेदवार आहेत, लढाऊ उमेदवार आहे. मतदारसंघाची त्यांना खडान्‌‍खडा माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे राहिलो तर कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ट्रम्पेट करिश्मा करून दाखवु शकते. धर्मनिरपेक्षतेचा ठेका आम्ही घेतला नाही. आता आपण आपल्याच उमेदवाराला मतदान करायला शिकले पाहिजे असे आवाहनही रिपब्लिकन सेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.