Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मुंढवा पोलीस स्टेशनवर प्रशासक नेमावा काय… सामाजिक सुरक्षा विभागाचा मुंढव्यातील जुगार अड्डयांवर पुनः छापा- 1 लाख रूपयांच्या मुद्देमालांसह 26 आरोपी अटक

पुणे/दि/ प्रतिनिधी/नॅशनल फोरम/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्डयांवर पुन्हा कारवाई केली आहे. एक लाख रुपयांचा मुद्देमाल व 26 जणांविरूद्ध कारवाई केली आहे. मागील वर्षात तीन/चार वेळेस कारवाई केली होती आता पुनः नव्यावर्षाच्या तिसऱ्या दिवशी मटका जुगार अड्डयांवर कारवाई झाल्याने, मुंढवा पोलीस स्टेशनवर थेट प्रशासकाची नियुक्ती करावी काय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.


सध्या महापालिका व नगरपालिकांच्या निवडणूका वर्षभर लांबणीवर पडलेल्या आहेत. त्यामुळे तिथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंढवा पोलीस स्टेशन बाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मुंढवा पोलीस स्टेशन मधील अधिकारी कर्मचारी कारवाई करण्यास कसुरी करीत असतील तर, पुणे शहर पोलीस आयुक्तांनी मुंढवा पोलीस स्टेशनवर प्रशासकाची नियुक्ती करावी असा अजब सल्ला दिला आहे.

प्रशासकीय राजवट पोलीस खात्यात नसली तरी मार्शल लॉ ची तरतुद कायदयात आहे. त्यामुळे मुंढवा पोलीस स्टेशन मधील कसुरदार अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूद्ध मार्शल लॉ ची मागणी होत असून किमान काही महिने तरी कोंढवा पोलीस स्टेशन प्रमाणे मुंढवा पोलीस स्टेशनचा कारभार पोलीस आयुक्तांच्या थेट निरीक्षणाखाली सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. 
सामाजिक सुरक्षा विभागाने मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील मुंढवा परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशिररित्या जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पुन्हा प्राप्त झाली होती. त्यामुळे या बाबतमीची खात्री करून, मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्डयांवर पुनः कारवाई करून सुमारे  एक लाख रुपयांच्या मुद्देमालासह सुमारे 26 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. मुंढवा पोलीस स्टेशन येथे नवीन वर्षात चौथा गुन्हा दाखल  करून संबंधिताविरूद्ध महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12 (अ) नुसार कारवाई करण्यात आली आहे. 

मुंढवा पोलीस स्टेशन मधील जुगार अड्यावरील कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार, तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार अजय राणे, अण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे व अमित जमदाडे या पथकाने केली आहे. 
तथापी काही सामाजिक कार्यकर्ते यांनी मुंढवा परिसरात दिवरात्र सुरू असलेल्या अनेक पब बाबत तक्रार अर्ज केले असतांना देखील अद्यापपर्यंत कारवाई होत नसल्याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.