
पुणे शहरातील पोलीस सध्या कुठे आहेत…. रस्त्यावर नाहीत, चौकातही दिसत नाहीत, पोलीस चौक्या ओस पडल्या आहेत, पोलीस स्टेशमध्ये देखील वावर नाही… मग सध्या पुण्यातील 10/12 हजार पोलीस गेलेत तरी कुठे….
आलं मनांला… गेले शेणाला… टाकल टोपलं… अन् बसले उन्हाला….
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण-
देशात कुण्याकाळी सांगण्यात आले होते की, नोटबंदी केल्यानंतर दहशतवाद थांबेल, गुन्हेगारी थांबेल आणि ड्रग तस्करी थांबेल. परंतु त्याच्या उलटेच देशात घडत आहे. नोटबंदीनंतर ना दहशतवाद थांबला ना.. ड्रग तस्करी थांबली. पुण्यातही मागील काही महिन्यांपूर्वी पुण्यातील सर्व गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आली. त्यात सर्वांना म्हणे तंबी दिली. गुन्हेगारी कुणी केली तर त्याची गय केली जाणार नाही अशा आणाभाका करण्यात आल्या. परंतु पुणे शहरातील गुन्हेगारी तरी संपली नाही, उलट ती अधिक वेगाने वाढत गेली आहे. झोपडपट्टीपासून चौकाचौकातील अवैध धंदे बंद केल्याचे सांगण्यात येत असले तरी हायप्रोफाईल अवैध धंदे, जुगार अड्डे आजही सुरू आहेत. विदेशी मद्याची तस्करीपासून ते ड्रगची तस्करी अजूनही सुरूच आहे. दोन्ही मध्ये काहीच फरक दिसत नाही. केवळ पब्लिसिटीचा स्टंट असेच आज पुणे शहरात चर्चिले जात आहे. पूर्वी काही पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस अंमलदार रस्त्यावर पेट्रोलिंग करतांना दिसत होते. परंतु आज ते कुठेच दिसत नाहीत. सिनिअर पीआय, एसीपी तर सोडा, फौजदार आणि अंमलदार देखील रस्त्यावर दिसत नाहीत. दरम्यान त्याचा परिणाम आज दिसून येत आहे. पुणे शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी, दरोडा, लुटालुटीचे गुन्हे दाखल होत आहेत. तसेच ऑनलाईन लुटालुटीच्या शेकडो गुन्ह्यांची नोंद होत आहे. परंतु पोलीस तपास कुठे करीत आहेत. नव्हे… पोलीस आहेत तरी कुठे हा प्रश्न पुन्हा अनुत्तरीच राहत आहे.
दि. 19 फेबु्रवारी 2025 अर्थात शिवजयंतीच्या दिवशी पुणे शहरातील काही ठळक गुन्हयांच्या नोंदी येथे देत आहे. त्यात काही पोलीस स्टेशन यांनी आरोपी आणि फिर्यादी यांची नावेच वगळली आहेत, बऱ्याच ठिकाणी आरोपीची नावे जाहीर करीत नाहीत, तर काही ठिकाणी फिर्यादी यांचीही नावे जाहीर केली जात नाहीत. गुन्हे मात्र मोठ मोठे घडले आहेत.
मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत 10 लाख 27 हजाराची फसवणूक-
मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत 3 ते 7 फेब्रुवारी 2025 च्या दरम्यान ऑनलाईन माध्यमाव्दारे 54 वर्षीय फिर्यादी यांना आरोपी असलेल्या इसमाने व्हॉटसॲप गु्रपचे वापरकर्ते यांनी भरघोस नफा मिळवुन देण्याचे आमिष दाखवुन त्यांच्या विविध बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडून फिर्यादी यांची एकुण 10 लाख 27 हजार रुपयाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. मोबाईलधारक आरोपी अटक नाही. त्याच्यावर भा.न्या.सं. 319 (2) 318(4) 316(5) माहिती तंत्रज्ञान 66 ड नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप हे करीत आहेत.
वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत 7 लाख 84 हजाराची फसवणूक-
वाघोली येथील 39 वर्षीय इसमाने फिर्याद दिली आहे की, त्यांचे राहते घरी ऑनलाईन माध्यमातून एक मोबाईलधारक आरोपीने पार्ट टाईम जॉब करीता टास्क मध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने त्यांची एकुण 7 लाख 84 हजार 600 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत वाघोली पोलीस स्टेशन येथे एका मोबाईलधारक आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्रांतवाडीत 2 लाख 88 हजाराची घरफोडी-
दि. 18 फेब्रुवारी 25 रोजी फिर्यादी रवि गालफाडे वय 37 रा. कळस माळवाडी पुणे यांचे राहते घर रात्री 10.30 ते पहाटे 6.00 वाजेपर्यंत कुलूप लावुन बंद असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे घराते घराच्या दाराचा कडी कोंयडा उचकटून घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यातील सोन्याचे व चांदीचे असे एकुण 2 लाख 88 हजार रुपये किंमतीचा ऐवज घरफोडी करून नेला आहे. अज्ञात आरोपी विरूद्ध भा.न्या.सं. कलम 331(4) व 305 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करीत आहेत.
काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत अवघ्या 15 मिनटात 3 लाख 77 हजाराची लबाडीने चोरी-
काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगणे मळा, हडपसर येथील फिर्यादी रोहित तोडकर वय 37 यांनी फिर्याद दिली आहे की, दि. 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रौ सव्वादोन ते पाऊणेतीनच्या दरम्यान त्यांचे फोटो स्टूडिओचे सेप्टी डोअर व मेन डोअरचे लॉक तोडून, त्यातील फोटोशुट करीता लागणारे कॅमेरे व इतर साहित्य असा एकुण 3 लाख 77 हजार रुपयांचे सामान दोन अज्ञात इसमांनी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले आहे. याबाबत दोन अज्ञात इसमाविरूद्ध काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत भा.न्या.स.कलम 331(4) व 305 नुसार गुन्हे दाखल केले असून त्याचा तपास सहा.पोलीस निरीक्षक विलास सुतार करीत आहेत.
आता कुठे आहेत, पोलीस...भर रात्रौ आणि दिवसा ढवळ्या चोऱ्या आणि घरफोड्या होत आहेत. किती आरोपी व गुन्हेगार सापडले आहेत. किती जणांवर गुन्हे दाखल होवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे. पोलीस स्टेशनच्या फळ्यावर आणि कागदांवर निव्वळ गुन्हेविषयक आकडेवारी लिहून गुन्हेगारी संपुष्टात येत नाही. आमच्या काळात एक गोष्ट किंवा म्हण सांगितली जायची, ती अशी की, आलं मनांला... गेले शेणाला... टाकल टोपलं... अन् बसले उन्हाला....