Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

भारती विद्यापीठ पोलीसांवर कारवाई करून, पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणता झेंडा लावला ?

पुणे/दि/ प्रतिनिधी/
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन परिसरात अवैध धंदे सुरू असल्याचे कारण पुढे करून, वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांना नियंत्रण कक्षात पाचारण करण्यात आले आहे. तसेच दोन चार पोलीसांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अशा प्रकारची कारवाई करून पुणे शहर पोलीस आयुक्तांनी नेमका कोणता झेंडा लावला आहे, याचाच प्रश्‍न जनतेत पडलेला आहे.
अवैध धंदे आणि गुन्हेगारी ही संपूर्ण पुणे शहरातील समस्या आहे. भारतीच्याच हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत आणि पुणे शहरात कुठेही काहीच सुरू नाही असा कुणी समज करून घेण्याचे काहीच कारण नाही. भारती विद्यापीठाचा सख्खा शेजारी असलेल्या सगळ्याच पोलीस स्टेशन हद्दीत ते देखील पुणे सातारा रस्त्यावर थांबुन मटका घेतला जात आहे. सोरट खेळले जात आहे, हे सगळ्यांना धडधडीत दिसत आहे. तरी देखील केवळ भारतीच्याच हद्दीत अवैध धंदे आहेत, म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे उचित ठरणार नाही.


भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांना अशा प्रकारे अपमानजनकरित्या नियंत्रण कक्षात बोलावणे योग्य नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. पुणे शहरातील संपूर्ण पेठांमध्ये आज अवैध धंदे वेगात सुरू आहेत. पुण्यातील उपनगरातही अवैध धंद्यासह अंमली पदार्थांची विक्री व साठे आढळुन येत आहेत. देशी विदेशी दारूची तस्करी सुरू आहे. असे असतांना देखील केवळ भारतीवर कारवाई करण्याची आवश्यकता काय होती हा सवालही अनुत्तरीत आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षकांसोबतच दोन पाच पोलीस कर्मचार्‍यांचा बळी देण्यात आलेला आहे. ज्यांचा बळी दिला आहे, त्याच पोलीस कर्मचार्‍यांनी मागील महिन्यात सर्वात मोठ्या गुन्हेगारीचा छडा लावला आहे. भारतीच्या हद्दीत येवून गुन्हेगारी कृत्य करणार्‍यांना जेरबंद करण्यात आले असल्याच्या बातम्या सर्वांनी पाहिल्या आहेत. असे असतांना देखील भारती विद्यापीठ पोलीसांना जेरबंद करणे आश्‍चर्यकारक वाटत आहे.
आम्हाला वरीष्ठ पोलीस निरीक्षक किंवा निलंबित पोलीस कर्मचार्‍यांविषयी लळा आहे असे मुळीच नाही. त्यांच्या वतीने बाजू मांडत आहे असे देखील मुळीच नाही. एव्हाना ओळखही नाही. त्यामुळे त्यांची आम्ही बाजू घेत आहोत असे वाटण्याचे काहीच कारण नाही. परंतु करण्यात आलेली कारवाई ही नियमांपेक्षा सुडाची अधिक वाटत आहे. त्यामुळेच हे चार शब्दांची पेरणी करावी लागली.
झोन दोन आणि पाचच्या हद्दीत इतरही उद्योग सुरू आहेत. एक, तीन, चार मध्ये तर दिवस रात्र दिवाळी आणि देवदिवाळी सुरू आहे. ती पोलीस आयुक्त कार्यायातील कुणाला कशी दिसली नाही याचेही मोठे आश्यर्च आहे. कारवाई करतांना दुबळ्या पोलीस स्टेशनची निवड चुकीची ठरली आहे. यातून पोलीस दलात असंतोष निर्माण होत आहे. बळजबरीने कारवाईचे कुणीही समर्थन करणार नाही. त्यामुळे कारवाई करायचीच असेल तर सरसकट करा. एकावर कारवाई आणि दुसर्‍याचे पोतभरून लाड अशी वृत्ती खात्यात बळावता कामा नये एवढेच खरे.