
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
देशात सत्ता उपभोगलेल्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या स्थानिक निष्ठावंताची अवस्था शहरात उंडरणाऱ्या भटक्या पाळीव प्राण्यासारखी झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे (बीजेपी) मुळचे निष्ठावंत, काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणूकीत आज उमेदवारी मिळेल, उद्या मिळेल म्हणून पक्षाचे काम निष्ठेने करतात. परंतु मागील 20 वर्षात त्यांना उमेदवारी मिळाली नाही. सध्या देशात 2024 च्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणूका होवू घातल्या आहेत. पुणे शहरात देखील काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु काँग्रेसने पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना व मनसे या पक्षातून काँग्रेस मध्ये आलेल्या उपऱ्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे पुणे शहर काँग्रेसमध्ये कमालिची अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपाने मात्र मोहोळांना उमेदवारी दिल्याने, पुण्यातील ब्रह्मवृंद कमालिचे हैराण झाले आहेत. त्यामुळे निष्ठावंताना त्यांच्याच पक्षाने घोडे आकाश-पाताळात उडविले असल्याच्या चर्चांना आज दिवसभर पुणे शहरात उधाण आले आहे.
काँग्रेसकी मजबुरी है- उपरा उमेदवार जरुरी है-
काँग्रेस पक्षात आज घडीला मागील 5/6 वर्षांपासून खंबीरपणे पक्ष बांधणी करणारे व पक्षात फुट पडू देऊ न देणारे तत्कालिन अध्यक्ष श्री. रमेश बागवे आहेत, मोहन जोशी, अरविंद शिंदे, आबा बागुल सारखे लढवय्ये नेते आहेत. यासह अनेक नेते काँग्रेसमध्ये आहेत. परंतु या सर्वांना ठेंगा दाखवत काँग्रेस वर्कींग कमिटीने पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी धंगेकरांना उमेदवारी जाहीर केली आहे. श्री. धंगेकर हे मुळात शिवसैनिक आहेत, त्यानंतर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते. त्या पक्षाचे नगरसेवक म्हणून अनेक वर्ष काम केले आहे. परंतु काळाच्या ओघात ते काँग्रेसवासी झाले. पुणेकरांना भाजपावर राग काढायचा होता, त्यात कसबा पेठ विधानसभेची निवडणूक आली. पुणेकरांच्या भाजपा वरील राग कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत निघाला. त्यात काँग्रेसचे उमेदवार धंगेकर विजय झाले. धंगेकरांचा विजय हा भाजपा वरील राग होता. आता लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजत आहेत. त्यात काँग्रेसमधील सर्व निष्ठावंताना डावलुन धंगेकरांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकी मजबुरी हे धंगेकर जरुरी है असेच काँग्रेसवाल्यांना वाटत आहे की काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
काँग्रेस निष्ठावंताचे हाल बे हाल –
मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे. मी 1977 चा, काँग्रेसचा निष्ठावंत आहे म्हणून अनेक नेते आज मिरवित असतात. प्रत्येक लोकसभा व विधानसभा निवडणूकीत माझी वर्णी लागेल म्हणून तो सतत पुणे, मुंबई, पुणे दिल्ली असे दौरे करत असतो. परंतु ऐन निवडणूकीत मात्र पक्ष निष्ठावंताना डावलत असून, उपऱ्यांना उमेदवारी दिली जात आहे. पुणे शहर काँग्रेसची अवस्था हाल बे हाल झाली आहे. आज तर शरद रणपिसे असते, तर त्यांनी काँग्रेस निष्ठावंताला उमेदवारी ओढुन आणली असती. काँग्रेसने देखील रमेश बागवे सारख्या मातब्बर नेत्याला उमेदवारी देणे अपेक्षित होते. याचे महत्वाचे कारण म्हणून, सर्व पक्षातील नेते, पुढारी हे पक्ष सोडून भाजपात सामिल होत होते. परंतु रमेश बागव हे पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाची बांधणी केली, अनेक सामाजिक उपक्रम राबवुन त्यांनी पक्ष जिवंत ठेवला. श्री. रमेश बागवे हे काँग्रेसचे निष्ठावंत आहेत. कितीही वादळे आली तरी ते डगमगले नाहीत. त्यांच्या सारख्या मातब्बर नेत्याला उमेदवारी देणे अपेक्षित होते. परंतु ते दलित असल्यामुळे त्यांना उमेदवारी डावलली असल्याची चर्चा आहे.
त्यातच पुणे शहर लोकसभेच्या उमेदवारीचे प्रमुख दावेदार मोहन जोशी, अरविंद शिंदे, आबा बागुल या काँग्रेसच्या निष्ठावंत असलेल्या नेत्यांची देखील काँग्रेसने मानहाणी केली असल्याची चर्चा आज पुणे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. भाजपावर पुणेकरांचा राग कसबा पेठेत दिसून आला आहे. परंतु तो पुणे शहरात दिसणार का.... महत्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसचे सुभेदार उपऱ्या असलेल्या धंगेकरांसाठी काम करणार का.... हा देखील कळीचा मुद्दा आहे. की काँग्रेसने मुद्दामहून भाजपाच्या विजयाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून असा उमेदवार दिला आहे हे देखील कळण्याच्या पलिकडे आहे. सध्या राज्यात भाजपा विरूद्ध वंचित, आणि मोदी विरूद्ध आंबेडकर असेच वातावरण आहे. दोघांच्या भांडणात वंचित बाजी मारणार काय... हे निकालानंतरच समजणार आहे.