Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

चौका-चौकात मटक्याचे अड्डे- गल्ली बोळात हातभट्टीचे धंदे – चला पुणेकरांनो, तुम्हाला बातमीतुन पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत फिरवून आणतो – चला मारा किक… …ऽऽ….

  • पर्वती पोलीस स्टेशन कडुन पुणे शहराला गांज्यासोबत गुन्हेगारांची निर्मिती व पुरवठा,
    चौका-चौकात मटक्याचे अड्डे, जनता वसाहतीतील प्रत्येक बोळात हातभट्टीचे धंदे
  • हद्दीत हजारो गुन्हेगार, शेकडो मोक्का, शेकडो एमपीडीए, शेकडो तडीपार

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी गुन्ह्यांमध्ये, पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यातच अर्ध्या पुण्याला दरदिवसाकाठी पुरेल एवढा गांज्याचा मोठा स्टॉक पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत असल्याचे समोर आले आहे. पुणे शहरात कुठेही हातभट्टी भेटत नसली तरी जनता वसाहत आणि पाणमळ्यात हत्तीच्या हत्ती भरून मिळतात… थोडक्यात पर्वती पोलीस स्टेशनने पुण्यातील 30/35 पोलीस ठाण्यांवर अतिक्रमण केले असून, जाईन त्या गुन्हेविषयक क्षेत्रात पर्वती पोलीस स्टेशनचा अव्वल क्रमांक लागत आहे. त्यामुळे सर्वाधिक गुन्हेगार, सर्वाधिक अंमली पदार्थ, सर्वाधिक खाजगी सावकारांचे पटंर या बेकायदेशिर कृत्यात अव्वल दर्जाचा क्रमांक मिळवित आहेत. तरीही पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असल्याचे दाखविण्यात पर्वती पोलीस स्टेशनला जबरदस्त यश मिळाले असल्याचे दिसून येत आहे.

पर्वती पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदावर सध्या श्री. जयराम पायगुडे कार्यरत आहेत. त्यांच्या अधीनस्थ पर्वती पोलीस स्टेशनची लोकसंख्या साडेपाच लाख असून, एकुण चार पोलीस चौक्या त्यांच्या अंतर्गत कार्यरत आहेत. लक्ष्मीनगर, दत्तवाडी व पर्वती दर्शन ह्या तीन जुन्याच पोलीस चौक्या असून त्यात आता जनता वसाहत पोलीस चौकीची भर पडली आहे. चारही पोलीस चौकीच्या बाहेर दिन-रात 24 घंटे  चार आत आणि 40 बाहेर असे दृष्य पहायला मिळते. भांडणे करायला या हद्दीतील नागरीकांना वेळ कुठून मिळतो हा एक संशोधनाचा विषय आहे. दरम्यान मुबलक मटका जुगाराच्या अडडयांवर आकड्यांचे तक्ते घेवून, बरीच मंडळी आकडेमोड करीत बसलेले असतात, त्यातच एखादा पत्ता लागल्यानंतर, लगेच हातभट्टीचा फुगाही सहज मिळतो. जरा थोडे जास्त पैसे असतील तर गांजाची पुडीही तयारच असते. अंगात नशा, डोक्यात नशा असल्यानंतर भांडणे तर होणारच. परंतु ही नशा बेकायदेशिर असतांना देखील आता त्याला स्थानिक पोलीसांच्या बळावर कायदेशिर असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने हे धंदे बिनधास्त सुरू आहेत. पोलीस उपआयुक्त, पोलीस आयुक्त हे थोडच एवढं पहायला येणार आहेत काय.... मग चालु दया मटक्याचे गुऱ्हाळ....

चौका-चौकात मटक्याचे अड्डे- गल्ली बोळात हातभट्टीचे धंदे – चला पुणेकरांनो, तुम्हाला बातमीतुन पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत फिरवून आणतो – उघडा डोळे- बघा निट=
पर्वती पोलीस स्टेशन म्हणजे मटका, जुगार अड्डयांचे माहेरघर झाले आहे. त्यातच हातभट्टी आणि गांजा हे तर, चहा-वडापावाच्या टपरी सारखे झाले आहे. जसा चहा आणि गुटखा कुठेही मिळतो, तसे या भागात गांजा आणि हातभट्टी सहज कुठेही उपलब्ध होते. त्याचे उदाहरण दयायचे तर – दांडेकर पुल मांगीरबाबा चौकातून सुरूवात केल्यानंतर, पुढे पेट्रोल पंपासमोरील झोपडपट्टीचौक, त्याच्या पुढे मटका जुगार कमी की काय म्हणून ऑनलाईन लॉटरीचे धंदेही सुरू आहेत.

पर्वती दर्शन पोलीस चौकी वसाहत ते पुढे झोपडपट्टीपर्यंत मटक्याचे अड्डे, त्याच्याही पुढे लक्ष्मीनगरचा चौकातील मटणाच्या दुकानाच्या लाईनमध्ये मटका खेळण्यासाठी तर रांगाच रांगा लागतात. एवढ्यावर न थांबता जुगाराचाही क्लब सुरू करण्यात आला आहे. आता थोडं माग जावु या. तावरे कॉलनीतही जबरदस्त एक मटका आणि एक जुगाराचा क्लब, आता लक्ष्मीनगरच्याही पुढे चला, सहकारनगर दोन मधील झोपडपट्टीतही एक जुगाराचा क्लब राजरोसपणे सुरू आहे. थांबाऽऽ थांबाऽऽ पुन्हा मागे या.... पुणे सातारा रोडवरील भर चौकात लॉटरी मंडी तर आहेच परंतु मटकाही सुरू आहे. आता जाऊया लक्ष्मीनारायण टॉकिज जवळ... थोड थांबा. तुम्ही पाहत आहात त्या सर्व बेकायदेशिर प्रवासी वाहने थांबविली आहेत. थोडं मान वर करून पहा हे आहे हुक्का पार्लर... नशेबाज हुक्का पार्लर आहे... आता झालं पहा... पर्वती पोलीस स्टेशन हद्द फिरून....थोडक्यात चौक तेथे मटका अड्डा ही पर्वती पोलीस स्टेशनची ओळख निर्माण झाली आहे. 

पुणे शहराला सर्वाधिक गुन्हेगार पुरवठा करणारे पोलीस स्टेशन –
पुणे शहरातील बहुतांश जबरी गुन्ह्यांमध्ये पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. ह्याची लागण जुन्या असलेल्या सहकारनगर पोलीस स्टेशनला झाली आहे.
त्यानंतर भारती विद्यापीठ व सिंहगड रोड पोलीस स्टेशनला देखील येथील गुन्हेगारांचा पुरवठा होतो. यांच्याही हद्दीत पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार आढळुन आले आहेत. त्यातच मध्यवर्ती शहरातील पोलीस स्टेशन हद्दीतही पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार आढळुन येत आहेत. त्यामुळे पर्वती पोलीस स्टेशन हे पुणे शहराला गुन्हेगार पुरवठा करणारे पोलीस स्टेशन ठरत आहे काय असाही प्रश्न निर्माण होत आहे.

हद्दीत हजारो गुन्हेगार, शेकडो मोक्का, शेकडो एमपीडीए, शेकडो तडीपार –
पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत सध्या हजारो गुन्हेगार आहेत. प्रत्येकजण स्वतःला भाई समजतो. त्यामुळे शेकडो जणांवर मोक्काखाली कारवाई केली आहे, शेकडो तडीपार तर शेकडो एमपीडीए धारक आहेत. सर्वांकडे जबरी गुन्हे दाखल असलेले 12/15 गुन्ह्यांचे डिग्रीधारक आहेत. एकाचेही शिक्षण 12 वी पर्यंत नाही, मोजकेच पदवीधर आहेत. सगळे दुसरी, पाचवी पर्यंत शिकलेले आढळुन येतील. परंतु एवढी गुन्हेगारी का वाढली याच्या मुळात कुणालाही जायला नको आहे.

पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील 15 ते 18 व 18 ते 25 वयोगटातील गुन्हेगारांचा अधिक समावेश आहे. गुन्हेगार म्हणून जन्माला आले नाहीत, मग हे गुन्हेगार म्हणून का मरत आहेत. यातील दलित- बहुजन समाजाची लोकसंख्या 100 टक्के आहे. त्यात अनु. जातीचा वरचा क्रमांक आहे. त्यानंतर आदिवासी, ओबीसी समाजाचा नंबर लागतो. थोडक्यात अनु.जातीच्या नवयुवकांनाच गुन्हेगार बनविण्याचे प्रशिक्षण केंद्र सुरू आहे काय अशीही शंका निर्माण होत आहे. 

का होत नाही पोलीस पेट्रोलिंग – अंमलदार कुठे आहेत-
पुणे शहर पोलीस हे गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय, पुणे शहर पोलीस गुन्हेगारीचे उदात्तीकरण करत आहेत काय असाही प्रश्न आम्ही उपस्थित केला आहे. गुन्हेगारी वाढण्यासाठी मटका जुगार अड्डे, हातभट्टीचे धंदे, गुटखा माफिया, देहविक्री, खाजगी सावकारी व कंपन्यांची खाजगी सावकारी, लँड माफिया, बिल्डर हेच गुन्हेगार तयार होण्याचे मुख्य कारण आहे. इजी मनी आणि भरपुर चंगळ अशी या धंदयाच ओळख आहे.

दरम्यान असे असतांनाही त्यावर पोलीस कायदयाच्या दृष्टीकोनातून कारवाई का करीत नाहीत असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या हद्दीत कधीच पोलीस पेट्रोलिंग करतांना आढळुन येणार नाहीत, आठ के बाद तर पोलीसच रस्त्यावरून गायब असतात. ना पोलीस चौकीत, ना पोलीस स्टेशनमध्ये मग सगळे अंमलदार जातात तरी कुठे हा बाळबोध प्रश्न निर्माण होत आहे. ज्या ठिकाणी जास्त गुन्हेगारी वाढली आहे त्या हद्दीत पोलीस मार्च का केला जात नाही. आज मुंबईतील डोंगरी नंतर जनता वसाहतीचा क्रमांक लागत आहे. त्यामुळे यात सुधारणा होणे काळाची गरज आहे. जे समोर आले ते पुणेकरांपुढे आम्ही मांडले आहे, आता पोलीसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून काय करायचे याचे नियोजन होणे आवश्यक ठरत आहे. अन्यथा 2030 पर्यंत पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळख निर्माण व्हायला वेळ लागणार नाही हेच खरे. (पुढील जनजागृती अभियान-पोलीस स्टेशन- सहकारनगर ते भारती विद्यापीठ व्हाया सिंहगडरोड-बिबवेवाडी- मार्केटयार्ड)