Tuesday, January 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पवारांनी दुबईतील दाऊदसोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा; बाळासाहेब आंबेडकरांची मागणी

सन 1988 ते 1991, शरद पवार – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भेट … कशासाठी?

नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुती, महाविकास आघाडी आणि इतर छोट्या पक्षांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होतानाही दिसत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार यांनी दुबईतील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम सोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, 1988 ते 1991 साली शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात ते एका दौऱ्यासाठी परदेशात गेले होते. शरद पवार भारतातून लंडनला गेले होते आणि तिथून कॅलिफोर्नियाला जाऊन 2 दिवस थांबले. कॅलिफोर्नियात शरद पवार यांनी एक बैठक घेतली. ही बैठक कुणासोबत झाली याचा खुलासा त्यांनी करावा. कारण या बैठकीनंतर ते परत लंडनला आले आणि दोन दिवसांनी दुबईला गेले. दुबई एअरपोर्टवर त्यांची कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत भेट झाली, असा खळबळजनक दावा आंबेडकर यांनी केला आहे.

बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, दुबई एअरपोर्टवरील भेटीवेळी दाऊद इब्राहिमने शरद पवारांना सोन्याचा हार भेट म्हणून दिला. यानंतर संध्याकाळच्या विमानाने शरद पवार पुन्हा लंडनला आले. दोन दिवस तिथे थांबले आणि भारतात परतले. परंतु केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय मुख्यमंत्री या नात्याने कुणीही परदेशात दौरा करू शकत नाही. त्यामुळे तत्कालीन सरकारने शरद पवारांच्या दौऱ्याला मान्यता दिली होती का? कॅलिफोर्नियातील बैठक आणि दाऊदसोबतच्या भेटीसाठी केंद्राने परवानगी दिली होती का? जर केंद्राने परवानगी दिली होती, तर त्या भेटीचा अहवाल केंद्राला सुपूर्द केला होता का? अशा प्रश्नांचा भडीमार करत बाळासाहेब आंबेडकर यांनी यासंदर्भात आताच्या केंद्र सरकारने खुलासा केला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

पवार आणि दाऊद भेटीचा खुलासा होणं गरजेचं-
दरम्यान, बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, सध्या पॅलेस्टाईन आणि इस्त्रायलचा संघर्ष सुरू आहे. अशावेळी आपले केंद्र सरकार आतून इस्त्रायलसोबत आणि बाहेरून पॅलेस्टाईनसोबत आहे. पण मी ज्या काळाचं सांगतोय, तेव्हाही इराण, पॅलेस्टाईन चर्चेत होतं. आज इस्त्रायलचा मुद्दा असल्याने काही भारतीय प्रतिक्रिया देऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. परंतु पॅलेस्टाईन आणि इस्त्रायलचा संघर्ष रोखायचा असेल तर शरद पवार आणि दाऊद इब्राहिम भेटीचा खुलासा होणं गरजेचं आहे.

कारण महाराष्ट्रात पुन्हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगची मालिका सुरू झाली आहे. दुसरी गोष्टी म्हणजे कॅनडा, यूएस आणि इंडियाचं जो काही वाद सुरू आहे, त्यामुळे मुंबई, महाराष्ट्र हॉटसीटवर आहे. त्यामुळे कॅलिफोर्निया बैठक आणि दाऊदच्या भेटीची शरद पवारांना परवानगी होती का? जर नसेल तर ते का भेटले होते? याचा खुलासा मतदारांसमोर आला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसनं याबाबत खुलासा करावा, अशी मागणी बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. त्यामुळे आता शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाकडून बाळासाहेब आंबेडकर यांच्या खळबळजनक दाव्यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल.