Thursday, December 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सामाजिक सुरक्षा विभागाची विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत अर्धवट कारवाई? खडकी अणि विमानतळ यांना सवलतीच्या दरात जुगार अड्डयांना परवानगी?

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत सध्या मटका, जुगार अड्डे, सोरट, पणती पाकोळी सारखे धंदे सुरू असून, त्याच बरोबरीने हातभट्टी, देशी विदेशी दारूची भर रस्त्यावर खुलेआम विक्री केली जात असल्याची बातमी नॅशनल फोरम मध्ये प्रकाशित केली होती. तसेच विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीक अतिशय गरीब व मध्यमवर्गीय समाजघटकातील आहेत. विशेषतः बौद्ध व वडार समाज संख्येने जास्त असून इतर समाज त्यांच्या खोलोखाल आहे. शांतीनगर, राजीव गांधी नगर, एकता नगर, भिमनगर, वडारवाडी, फुले नगर, पंचशिल नगर या मोठ्या घनतेच्या लोकसंख्या असलेल्या स्लम विभागात अवैध धंदे सुरू असतांना, सामाजिक सुरक्षा विभाग कारवाई करीत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने 17 फेब्रुवारी रोजी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील वडार वस्ती येथील जुगार अड्डयावर कारवाई करून सुमारे 16 इसमांना अटक करण्यात आली आहे. तसेच 26 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे 63/2023 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान गुंड्याच्या धंदयावर कारवाई केली असली तरी बबलु नायर, अक्रम सिद्धीकी, बंटी मिश्रासह दिपू नावाच्या सिंधीच्या धंदयावर मात्र आजपर्यंत कुणीही कारवाई केली नसल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे. बब्लुने तर खडकी सह विश्रांतवाडीमध्ये स्वतःचे बस्तान बसवला असला तरी अक्रम आणि बंटीचा उच्छाद वाढला असल्याचे कळविण्यात आले आहे. विश्रांतवाडीतील बहुजन समाजाला लुटण्यासाठी ह्या टोळ्यांनी त्यांच्याकडील गुन्हेगारांची संख्या अधिक वाढविली असल्याचे ऐकण्यात आले आहे.

 तसेच बौध्द, वडार समाजातील तरूणांना गुन्हेगारी क्षेत्रात ओढुन आणले जात असल्याचेही ऐकण्यात आले आहे. त्यातच आता धानोरी रोडवर उच्छाद मांडला आहे. त्यात वडार समाजातील तरूणांना  भाई बनविले जात असल्याचे समोर आले आहे. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन कारवाई करणार नसतील तर निदान गुन्हे शाखांनी नवीन तयार होणाऱ्या गुन्हेगारांना वेळीच आळा घालुन, हद्दीत गरीबांना लुटून गुन्हेगारांना पोसणाऱ्या टोळधाडीला वेळीच लगाम घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत अशी स्थिती असतांना, खडकी पोलीस स्टेशन व विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत देखील उच्छाद मांडला गेला आहे. खडकी पोलीस स्टेशन हददीत बबल्याने रेल्वे स्टेशनच्या अलिकडे आणि पलिकडे स्वतःचे साम्राज्य पुन्हा उभे केले असून, बोपोडी सह खडकी बाजारातील दिपक पुराणेचा भाचाही मैदानात उतरलाआहे. भाजी मंडई, पाण्याची टाकी सगळीकडे अवैध धंदे सुरू असतांना, सामाजिक सुरक्षा विभाग पुण्यातील पेठांमध्ये अडकुन पडला असल्याचे दिसून येत आहे. मटका, जुगार अड्डे, देशी विदेशी दारूच्या माध्यमातून लाखो कोटींचे व्यवहार या तीन पोलीस स्टेशन हद्दीत होत असल्याचे एका मोठ्या कारवाईवरून दिसत असतांना सामाजिक सुरक्षा विभाग व इतर गुन्हे शाखा अतिशय शांत आहेत हे विशेष. यापूर्वी विश्रांतवाडी पोलीस हद्दीत गुंड्या नामक जुगार अड्डा चालविणाऱ्यांवर तत्कालिन पोलीस अधिकारी श्री. राजेश पुराणिक यांनी कारवाई केली होती. त्यावेळस ह्या सर्व बाबी समोर आल्या होत्या. 

विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतही कारवाई –
दरम्यान सामाजिक सुरक्षा विभाग यांनी दि. 24 फेब्रुवारी रोजी विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील खराडी बायपास जवळील जुगार अड्डयांवर कारवाई करून सुमारे 16 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 34 हजार 710 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विश्रांतवाडीतही अर्धवट कारवाई आणि विमानतळ परिसरातही अर्धवट कारवाई केली असल्याचे दिसून आले आहे. तसेच खडकी पोलीस हद्दीत तर कारवाईचे नावही घेतले जात नाही.
दरम्यान विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील अर्धशतकी स्पा मध्ये 24 तासातील 18 तास बाजार भरलेला असल्याच्या स्थानिक नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा तक्रार अर्ज दिलेले आहेत. शिवाय गुन्हे शाखेकडील संजुभाऊंच्या पार्टनरशिप मध्ये पठारावर एक क्लब सुरू झाला असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी नमूद केले आहे. त्यासाठी जवळच्या काही पोलीस स्टेशन हद्दीतील धंदे चालविणाऱ्यांवर कागदोपत्री कुठेही नोंद नसलेली कारवाई करून त्यांना हद्दपार करून, विमानतळातील जुगार शर्यतीच्या घोड्याच्या वेगात सुरू असल्याचे रामवाडी व परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील उपआयुक्त गुन्हे व अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणत्या गुन्हेगाराने कोणत्या पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्डे चालवायचे याचाही निर्णय होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीनही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वातावरण वरून पोकळ दिसत असले तरी लाखो कोटींचे व्यवहार करून मोठ मोठे झेंडे लावले जात असल्याचे अनेकांचे मत आहे. कदाचित यामुळेच सासुने कारवाई करतांना या तीन पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करतांना सौम्य धोरण अंगिकारले आहे काय अशीही शंका बळावत आहे. 
नॅशनल फोरमकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सदरील बातमी मागील अंकात प्रसिद्ध केली होती. सामाजिक सुरक्षा विभागाने देखील विश्रांतवाडी आणि विमानतळ मध्ये कारवाई केली असली तरी अर्धवट असल्याचे दिसून येत आहे. ज्या गुन्हेगार आरोपींची नावे समोर आली आहेत, त्यांच्या धंदयावर मात्र कारवाई होत नसल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे. 
गुन्हेगारी वाढविणाऱ्या व पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. तथापी संबंधितांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.