Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पाजा, पाजा… आंबेडकरी बहुजन समाजाला गावठी हातभट्टी पाजा,कष्टकरी, वंचित, पीडित बहुजन समाजाच्या तिसऱ्या पिढीला देखील देशी दारू आणि गावठी हातभट्टीपासून ठार करा, मारा, उध्वस्त करा,

वाडी ते बिबवेवाडी व्हाया 32 परगणा…
बेकायदा धंदेवाल्यांना खूप पैसा कमवायचा आहे, पोलिसांना हप्ता घ्यायचाय, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पक्षांचे नेते पुढारी आणि तथाकथित पत्रकारांना ब्लॅकमेलचा धंदा करून खंडणी उकळायची आहे, चौघेही मिळून आंबेडकरी बहुजन समाजाची तिरडी उचलत आहेत

नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस आयुक्तातील सामाजिक सुरक्षा गुन्हे विभाग यांनी लोणी काळभोर व विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीत गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या ठिकाणांवर छापेमारी करून सुमारे 8लाख 28 हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशन व विमानतळ पोलिस स्टेशन येथे संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
लोणी काळभोर व विमानतळ पोलिस स्टेशन ही दोन पोलीस स्टेशन नाममात्र आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशन ते बिबेवाडी पोलीस स्टेशन व्हाया 32 परगाणा अर्थात संपूर्ण पुणे शहरात गावठी हातभट्टी निर्मिती करणे व विक्री करण्याचे अनेक ठिकाणे सुरू आहेत. तथापी अद्याप पर्यंत त्यांच्या कारवाई केली जात नाही. अनेकदा यासंदर्भात नॅशनल फोरम मधुन बातम्या प्रसारित करून देखील पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची बाब दिसून आलेली आहे.

आंबेडकरी बहुजन समाजाला देशी दारू, हातभट्टी पाजून ठार करा, मारा, उध्वस्त करा-
पुणे शहर व पुण्याच्या ग्रामीण भागात मागील अनेक वर्षांपासून देशी दारू सह गावठी हातभट्टी याच्या विक्रीची ठिकाणे वाढलेली आहेत. देशी दारूची दुकाने आणि गावठी हातभट्टी विक्रीची ठिकाणे ही बहुतांशपणे ज्या ठिकाणी अनु. जाती व जमाती अर्थात बौद्ध, वडार, मातंग, पारधी या समाजाच्या ज्या ठिकाणी जास्त लोकवस्ती आहे त्याच ठिकाणी विक्री केली जात आहे असे आजमितीस माझे आकलन आहे. पुणे शरहातील 588 झोपडपट्ट्यांसह गावठाणांमध्ये या समाजाची लोकसंख्या अधिक आहे. दरम्यान फुले शाहू आंबेडकरी विचारांचा पाईक असणाऱ्या बहुजन समाजाच्या मोठ्या लोकसंख्येच्या वसाहतींमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये गावठी हातभट्टीची विक्रीची ठिकाणे अधिक संख्येने आहेत.

गावठी हातभट्टीबाबत 32 परगणा पोलीसांना माहिती नाहीये काय –
अर्थात पोलीसांना ह्याबाबी पूर्णपणे माहिती असतातच. याचे कारण असे की, 32 परगण्यातील विविध ठिकाणचे मंदिर, मस्जिद, दर्गा, देवी देवतांचा सार्वजनिक उत्सव, उरूस, राष्ट्रीय सामाजिक सणउत्सव व नाना तऱ्हेच्या सामाजिक म्हणवुन घेणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात याच गावठी दारू विक्री करणाऱ्यांचा, देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्यांचा मोठा आर्थिक सहभाग असतो. सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पुढाऱ्यांना हेच गावठी हातभट्टी विक्री करणारे देवापेक्षाही मोठे असल्याचे ते मानतात. कधी कधी त्या हातभट्टीवाल्याचा फोटो देखील फ्लेक्स बॅनरवल लावण्याचे शहरातील काही भागात दिसून येते. त्यामुळे राजकीय पक्षाचे नेते, पुढारी, कार्यकर्ते, तथाकथित पत्रकारांना यांचा फायनान्सर म्हणजे वाईन शॉप आणि हातभट्टीवालेच असतात. त्यामुळे ही बाब पोलीसांना अधिक माहिती असतेच.

विश्रांतवाडी ते बिबवेवाडी, येरवडा ते सहकारनगर व्हाया 32 परगणा – येरवड्याची कसर भरून काढली =
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून भिमनगरचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर, राजीव गांधी नगर, शांतीनगर, पंचशील नगर, वडारवाडी या ठिकाणी वडार, बौद्ध, मांतग या समाजाची मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे याच भागात सर्वाधिक गावठी हातभट्टी विक्री होत आहे. सर्व प्रकारच्या निवडणूका, गणपती उत्सवासह, जयंती-पुण्यतिथी, नेत्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र सगळीकडे लाल पिवळ्या रंगाच्या विदेशी दारूची रेलचेल सुरू असते. त्यातही गावठी हातभट्टीचा तडका हा असतोच. कँडच्या कँड भरून मग्गा/जार रिकामा होत असतो.
विश्रांतवाडी नंतर पुढे बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतही गावठ्ठी हातभट्टीचा पुर वाहत असतो. पूर्वीच्या जनता वसाहत म्हणून बहुतांश नागरीकांना अपर इंदिरानगर या ठिकाणी वसविण्यात आले आहे. अप्परची पंचशील झोपडपट्टी ते विश्वकर्मा इन्स्टिट्युट, पुढे सरगम चाळ ते कोंढव्यापर्यंतच्या गल्ली बोळात कँड, मग्गा आणि चकण्याचा धुरळा उठलेला असतो. थोडक्यात येरवड्याची संपूर्ण कसर वाडी ते बिबवेवाडी यांनी भरून काढली आहे.

विश्रांतवाडी, बिबवेवाडीच्याही पुढे  येरवडा आहे. जगात ड्राय डे असला तरी येरवड्यात ड्राय डे कधीच नसतो. पुण्यात ड्राय डे असल्यानंतर, देशी विदेशी दारू पासून ते गावठ्ठी हातभट्टीसाठी दारूचे चाहते पूर्वी येरवड्यात यायचे. परंतु येरवड्याची ही कसर वाडी, बिबवेवाडी पासून सर्व पोलीस स्टेशनने भरून काढली आहे. येरवडयात तर सर्व कामगार, कष्टकरी, वंचित, शोषित समाजाच्या वसाहती आहेत,  मागील तीन पिढ्यांपासून याच बहुजन समाजाच्या तरूणांना हा विषाचा प्याला दिला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे आणि शहर पोलीसांच्या मानवतावादी भूमिकेमुळे सर्वत्र हा विषाचा प्याला दिला जात आहे. त्यात राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पुढारी, नेते यांच्यासह जर्नालिझम म्हणजे काय हे माहिती नसलेले शेकडो तथाकथित पत्रकार मंडळी वरील प्रकरणांचा कांगावा करून, कांगावा नव्हे तर भांडवल करून खंडणी वसुलीचा धंदा वेगात सुरू ठेवत आहेत. जिकडे तिकडे एकच प्याला जोरात सुरू आहे. पुणे शहर पोलीस मात्र गप्प आहेत. 

सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन आणि विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत दि. 8 जुन रोजी कारवाई केली असली तरी आज सोमवारी दुपार पर्यंत ज्या ठिकाणी कारवाई केली त्याच ठिकाणी कँड मध्ये हातभट्टी विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बोलाचा भात आणि बोलाची कडी... कारवाई मात्र कुठेच नाही अशी आजच्या पुणे शहराची सद्यःस्थिती आहे. 
आमची तरूण पिढी बर्बाद होत आहे. अंधःश्रद्धा आणि दारू किती वाईट आहे यावर प्रबोधन केले तरी त्यांचा पहिला हात गुटख्यावर आणि दुसरा हात दारूवर जात आहे. ज्यांच्या खिशात पैसे त्यांना लाल पिवळी दारू, ज्यांच्याकडे कडकी त्यांचे पाय आपोआप देशी आणि हातभट्टीकडे वळत आहेत. मुळात सहजपणे व बिनधोक राजरोसपणे ह्या सुविधा मिळत असल्यामुळे हातभट्टी वाढली आहे. त्यामुळे आता प्रबोधनाने नव्हे तर प्रामाणिकपणे कायदयाने प्रतिबंध येणे आवश्यक आहे. 
आता पुण्यात देशी विदेशी दारूची किती विक्री वाढली आहे, पुणेकर बिअर किती रिचवितात यावर मला काहीच बोलायचे नाही. सरकारी आकडेवाडी प्रसिद्ध करून हातभट्टीवरील लक्ष विचलित करायचे नाहीये.