
नॅशनल फोरम/ सांगली/दि/ प्रतिनिधी/
पंतप्रधान अमेरिकेला जाऊन आल्यापासून शेअर मार्केट पूर्णपणे कोसळत गेलं. धर्माच्या राजकारणाने देशाला आता धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचवलं आहे. आज विरोधी पक्ष लकवा मारलेल्या परिस्थितीत असून त्यातून त्यांनी स्वतःला सावरत दुरुस्त करावे आणि हिटलरशाहीच्या सरकारचा विरोध करावा, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. आंबेडकर यांनी आज सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकारसह महाराष्ट्रातील सरकार आणि विरोधी पक्षावर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळावरूनही आंबेडकर यांनी मृत्यूच्या आकड्यावरून गंभीर आरोप सरकारवर केला.
कुंभमेळाव्यात 1 हजारांवर लोक चेंगराचेंगरीत मयत-
ॲड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, कुंभमेळा हा लोकांचा भावनिक, वैयक्तिक प्रश्न आहे. या कुंभमेळाव्याची उत्तर प्रदेश सरकारने सोय केली, पण ज्या पद्धतीने कुंभमेळ्याचे मार्केटिग चाललं आहे त्याचा निषेध आहे. कुंभमेळाव्यात 1 हजारांवर चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडले हे दुर्दैवी आहे. शासनाने फक्त 38 लोक मयत झाले म्हणून जाहीर केले. हिंदू संघटनांना आवाहन आहे, या लोकांचे अंत्यविधी कसे केले हे जाहीर करावं, असे त्यांनी सांगितले. या सगळ्या घटना पाहता धर्माचे राजकारण हे देशाला आता धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचलं असल्याचे ते म्हणाले. आज विरोधी पक्ष लकवा मारलेल्या परिस्थितीत गेला आहे. त्यातून त्यांनी स्वतःला सावरत दुरुस्त करावे आणि हिटलरशाहीच्या सरकारचा विरोध करावा असेही बाळासाहेब आंबेडकर म्हणाले.
शेअर मार्केट पूर्णपणे कोसळतय-
यावेळी बाळासाहेब म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, पण पंतप्रधान अमेरिकेला जाऊन आल्यापासून ते आजपर्यंत शेअर मार्केट पूर्णपणे कोसळत आहे. दुसरीकडे अमेरिकन डॉलर महाग होत चालला आहे. शासनाकडे येणारा जीएसटीचा ओघ कमी होत चालला आहे. अर्थव्यवस्थेवरचं हे मोठं संकट आहे. विरोधी पक्षांने दुर्दैवाने या घसरत चाललेल्या आर्थिक परिस्थितीवर मौन पाळलेले दिसते. अमेरिका आणि अदानीचे काय होईल ते होईल, पण याचा बागलबुलवा म्हणून वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

छावा चित्रपटावरून मराठा समाजाला आवाहन-
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन्ही राजांनी इतिहास निर्माण केला तो प्रेरणादायी आहे. त्यामध्ये अडकून राहण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घेत आपण नवा इतिहास निर्माण केला पाहिजे ही मनस्थिती मराठा समाजाने केली पाहिजे असं मत ॲड. आंबेडकर व्यक्त केले.