Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

दहशत निर्माण करून पोलिस कारवाई टाळण्यासाठी पलायन करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, खडक मध्ये 54 वी तर शिवाजीनगरात 55 वी मोक्का कारवाई

नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांकडून अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्व व नागरीकांमध्ये दहशत कायम ठेवण्यासाठी सातत्याने गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. दरम्यान या गुन्हेगारी टोळ्यांवर संघटीत गुन्हेगारी कायदयासह एमपीडीए व तडीपारीचे शस्त्र पुणे पोलीसांकडून उगारण्यात आले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार व सहपोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णि यांनी काल खडक पोलीस स्टेशन हद्दीतील शेडगे टोळीवर 54 वी कारवाई केली तर आज शिवाजीनगरात यल्ल्या कोळानट्टी टोळीविरूद्ध 55 वी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारी नियंत्रणांवर बारकाईने लक्ष देवून शरीराविरूद्ध व मालमत्तेविरूद्ध गुन्हे करणारे व पुणेकर नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पुणे शहरातून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार व सहपोलीस आयुक्त श्री. संदीपक कर्णिक यांनी कठोर पावले उचलली आहेत.

खडक पोलीस स्टेशन हद्दीतील शेडगे टोळीविरूद्ध मोक्काची धडक कारवाई –
खडक पोलीस स्टेशनचा पदभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुनिल माने यांनी स्वीकारल्यापासून हद्दीतील गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर बारकाईन लक्ष ठेवण्यात आले आहे. अचानकपणे गुन्हेगार चेक करणे, कोंम्बिग ऑपरेशन करून हद्दीतील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात आला आहे. भावाला मारहाण केल्याचा राग मनांत धरून दोघांवर धारदार शस्त्राने वार करुन खडक पोलीस स्टेशन हद्दीतील टिंबर मार्केट परिसरात दहशत पसरवणाऱ्या राहुल शेंडगे व त्याच्या 10 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. टोळी प्रमुख राहुल शेडगे व त्याच्या इतर 9 साथीदारांनी भावाला मारहाण का केली अशी विचारणा करून फिर्यादी व मित्राला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन धारदार शस्त्राने वार केले. परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवला. याबाबत खडक पोलीस ठाण्यात भादवी 307,323,504,143,147,148,149 आर्म ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस ॲक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट नुसार दि. 5 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने खडक पोलीसांनी राहुल दत्तु शेंडगे (वय-21), करण ऊर्फ ठोंब्या भानुदास आगलावे (वय-21), लखन भानुदास आगलावे (वय-22), शंकर आण्णा कोंगाडी (वय-25), रोहन दत्तु शेंडगे (वय-24 सर्व रा. सी.पी. लोहीयानगर, पुणे), महेश इंद्रजित आगलावे (वय-24 रा. मार्केट यार्ड, पुणे), विशाल उर्फ लाल्या उर्फ लक्ष्मण भारत पारधे (वय-21 रा. गंजपेठ, पुणे) यांना अटक केली आहे. तर एक अल्पवयीन मुलगा व तीन आरोपी फरार होते.

टोळी प्रमुख राहुल शेंडगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार, टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी जबरी चोरी करणे, दरोडा, धमकी, खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केले आहेत. दरम्यान खडक पोलीसांच्या तपासामध्ये शेडगे याने संघटीतरित्या गुन्हा केल्याचे निदर्शनास आल्याने खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने यांनी परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील यांच्याकडे सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संदीपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने,पोलीस निरिक्षक गुन्हे संपतराव राऊत, सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे, अतुल बनकर, पोलीस अंमलदार महेश पवार, नितीन जाधव, स्वप्नील बांदल यांच्या पथकाने केली.

शिवाजीनगर पोलीस स्टेशन 55 वी मोक्का कारवाई –

बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार सागर उर्फ यल्ल्या कोळानट्टी व त्याच्या 19 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हददीतील गुन्हेगारी कारवाया प्रकरणी पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी आज 55 वी मोक्का कारवाई केली आहे. 

मंगला टॉकिज येथुन चित्रपट पाहून घरी जात असताना नितीन म्हस्के आणि त्याच्या मित्रावर सागर उर्फ यल्ल्या कोळानट्टी टोळीने हल्ला करुन नितीन म्हस्केचा खून केला होता. आरोपींनी नितीन म्हस्के याच्या मानेवर तलवार, पालघन, लोखंडी गज, काठ्या व फरशीचे तुकडे मारुन खून केला होता हा प्रकार 16 ऑगस्ट रोजी घडला होता. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भादवी 302, 141, 142, 143, 144, 145, 147, 148, 149, 120(ब) सह आर्म ॲक्ट , महाराष्ट्र पोलीस कायदा , अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गुन्ह्याच्या संयुक्त तपासादरम्यान टोळी प्रमुख सागर उर्फ यल्ल्या इराप्पा कोळानट्टी (वय-35 रा. ताडीवाला रोड, पुणे), सुशील अच्युतराव सुर्यवंशी (वय-27), मल्लेश शिवराज कोळी (वय-24), मनोज विकास हावळे (वय-23), रोहन मल्लेश तुपधर (वय-23), शशांक उर्फ ऋषभ संतोष बेंगळे (वय-21), गुडगप्पा फकीराप्पा भागराई (वय-28), किशोर संभाजी पात्रे (वय-20), साहील उर्फ सल्ल्या मनोहर कांबळे (वय-20), गणेश उर्फ गमपत शिवाजी चौधरी (वय-24), रोहीत उर्फ मच्छी बालाजी बंडगर (वय-20), विकी उर्फ नेप्या काशीनाथ कांबळे (वय-22), इम्रान हमीद शेख (वय-31) लॉरेन्स राजू पिल्ले (वय-36), आकाश सुनिल गायकवाड उर्फ चड्डी (वय-22), विवेक भोलेनाथ नवघरे (वय-25), अक्षय उर्फ बंटी विजय साबळे (वय-25), विनायक गणेश कापडे (वय-21), प्रदिप संतोष पवार (वय-21), सौरभ बाळु ससाणे (वय-20) यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी टोळी प्रमुख सागर उर्फ यल्ल्या इराप्पा कोळानट्टी याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन बेकायदेशीर मार्गाने फायदा करुन घेण्यासाठी गुन्हे केले आहेत. आरोपींनी टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरीता खुन, गंभीर दुखापत, शस्त्र बाळगणे, दंगा करणे, मालमत्तेचे नुकसान, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, नागरिकांना मारहाण करुन जखमी करणे, शस्त्राचा धाक दाखवून दहशत पसरविणे, असे गंभीर गुन्हे केले आहेत. 

दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड यांनी सहायक पोलीस आयुक्त वसंत

कुंवर यांच्या मार्फत परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल व अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील यांच्याकडे सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
संघटीत गुन्हेगारांवर कारवाईची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संदीपसिंह गिल,
सहायक पोलीस आयुक्त वसंत कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे
, पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड, सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस अंमलदार मेमाणे, दिलीप नागर, रोहित झांबरे यांच्या पथकाने केली.

पुणेकरांनी बघ्याची भूमिका न घेता पुढे आले पाहिजे –

पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहरातील गुन्हेगार व संघटीत गुन्हेगारांचे वाढलेले मनोधर्ये मोडून काढले आहे. गुन्हेगार नागरीकांमध्ये दहशत निर्माण करून, जबरी गुन्हे करून पसार होत आहेत, तरी देखील खडक पोलीस स्टेशन व शिवाजीनगर पोलीसांसह गुन्हे शाखा युनिट क्र. 1 सह इतर गुन्हे शाखांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी तातडीने पावले उचलुन संघटीत गुन्हेगारांवर मोक्का व एमपीडीएची धडक कारवाई सुरू आहे. पुणेकर नागरीकांनी देखील गुन्हेगारी कृत्यांकडे केवळ बघ्याची भूमिका न घेता, स्थानिक पोलीस स्टेशनसह पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्यास गुन्हेगारीवर सहज नियंत्रण मिळविता येऊ शकते.