Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राज्यात लाखो पदे रिक्त, सरकार नोकर भरती कधी करणार?, नाना पटोलेंचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई/दि/
राज्यात सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक महत्वाचे प्रश्‍न मांडण्यात येत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्याकडून विविध मुद्दे उपस्थित केले जात आहेत. यातच शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मंगळवारी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातल्या नोकर भरतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. राज्यात विविध विभागात लाखो पदे रिक्त असून मागील पाच सहा वर्षात सरकारी नोकर भरती झालेली नाही. महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा प्रश्‍न पटोलेंनी सरकारला विचारला आहे.


विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, दरवर्षी ९ टक्के कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असतात. आता जो रिक्त पदांचा आकडा सांगितलेला आहे तो कमी आहे. रिक्त पदांची संख्या यापेक्षा जास्त आहे. गेल्या पाच-सहा वर्षात एकही नोकर भरती झालेली नाही. विधानसभेतही कर्मचार्यांचा मोठा बॅकलॉग आहे. कर्मचार्यांची संख्या पुरेशी नसेल तर आपण जनतेला सेवा कशी देणार?,
मागील सरकारच्या काळातही नोकर भरती केली गेली नाही. ह्या रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे. विविध विभागात रिक्त असलेल्या लाखो पदांची भरती करण्यासंदर्भात राज्य सरकारची काय योजना आहे? आणि किती दिवसात नोकर भऱती करणार, असा प्रश्‍न पटोले यांनी उपस्थित केला.
राज्यात दोन लाख ३ हजार ३०२ पदे रिक्त आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षात पदभरती झालेली नाही. शासन ही पदभरती करण्याबाबत सकारात्मक असून लवकर ह्या पदांची भरती केली जाईल, असे मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. तर अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. अनेकांचे व्यवसाय कोरनामुळे देशोधडीला लागले आहेत. असातच नोकरभरती रखडल्याने अनेकांसमोर रोजगाराचा सवाल उपस्थित झाला आहे.
लवकरात लवकर नोकरभरती झाल्यास अनेकांच्या हाताला काम मिळून अनेकांचे जीवन पुन्हा उजळू शकते. त्यासाठी लवकरात लवकर नोकरभरती होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.