Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शिवाजीनगरात पुनः सुरू झाला पोलीस भागीदारीतील मटका जुगारीचा अड्डा

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, पुणे शहरातील संपूर्ण पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. सर्वत्र कोंम्बिग ऑपरेशन सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजुला पोलीस उप आयुक्त संदीपसिंह गिल हे स्वतः रस्त्यावर उतरून, वाहन परवाने तपासणे, दुचाकी वाहनावरील ट्रीपल सिट असणाऱ्यांवर स्वतः कारवाई करीत आहेत, तसेच काही पोलीस स्टेशन हद्दीतील स्लम एरियात जाऊन तेथील मुले व त्यांच्या पालकांचे प्रबोधन करून व्यसनमुक्ती सारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. लहान मुलांचा गुन्हेगार कसे वापर करीत आहेत, मुले व्यसन कशी करीत आहेत याबाबत पालकांनी कसे जागृत असले पहिजे याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करीत आहेत. मात्र शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये मात्र भलताच कारभार सुरू असल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भैय्यावाडी येथे पोलीस भागीदारीतील मटका जुगार अड्डा सुरू झाला असून, यात मटका जुगार, पणती पाकोळी सोरट, अंदर बाहर, पत्त्याचा क्लब आदि सर्व जुगारीचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.

शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कृषी भवन व साखर संकुलच्या दरम्यान नाल्यात एक लहान वसाहत आहे. लगतच पुणे महापालिकेचा दळवी दवाखाना आहे. तसेच एलआयसीसह मोठ्या कंपनीची कार्यालये आहेत. अशा प्रतिष्ठीत व गजबजलेल्या ठिकाणी हा मटका अड्डा सुरू झाला असल्याचे समोर आले आहे. मटका जुगार अड्डा हा एका मोठ्या गुन्हेगाराचा असल्याचे समोर आले आहे. कारागृहातून सुटल्यानंतर पोलीसाच्या भागीदारीत हा धंदा सुरू असल्याचे सांगण्यात येते. 

भैय्यावाडी येथे मुंबई-कल्याण,मिलन सारखा मटका बाजार, पणती पाकोळी सोरट त्याच्या बरोबर अंदर बाहर पत्ता क्लब सुरू असून, या ठिकाणी सुमारे 18 ते 20 पंटर काम करीत असून सकाळी 7 पासून मध्यरात्री, पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत हा धंदा सुरू असल्याचे नागरीकांनी सांगितले आहे. दिवस-रात्र दारूड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याशिवाय या संपूर्ण भागात गुटखा खाऊन पचापच थुंकल्याने सर्व घाणीचे साम्राज्य तर पसरले आहे याशिवाय सर्व भिंती रंगल्या गेल्या आहेत. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हेगारांच्या मागावर असतांना, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत असतांना, काही कर्मचारी मात्र पान टपऱ्या, हॉटेल्स सांभाळत आहेत, तर काही कर्मचारी मटका जुगार अड्ड्यात भागीदारी करण्यात मग्न आहेत. याबाबत वरीष्ठ स्तरावरून चौकशी करून दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीच्या धंद्यात पाठवुन पोलीस दलातील जागा रिक्त करून घेण्यासाठी पावले उचलणे आवश्यक ठरत आहे.