Friday, February 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली रिपब्लिकन कार्यकर्त्यांची घरे खाली करण्याचा मार्केटयार्ड पोलिसांचा डाव

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
रिपब्लिकन मातंग सेनेचे अध्यक्ष अमोल तुजारे यांचे मार्केटयार्ड येथील घरावर मागील पंधरा दिवसांपासून काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमानी कब्जा करण्याचा प्रयत्न करीत असल्याबाबतचा तक्रार अर्ज मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर यांना देण्यात आलेला आहे. तथापि मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हे रिपब्लिकन नेते अमोल तुजारे यांचे काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. श्री.अमोल तुजारे हे मागील 25 वर्षांपासून मार्केटयार्ड येथील न्यू. स्नेह नगर सोसायटीत राहत आहेत. याच ठिकाणावरून सामाजिक व राजकीय संघटनांचे कामकाज चालवले जाते ही बाब पुणे शहरातील पोलिसांना माहिती असताना देखील जाणीवपूर्वक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना पोलीस पाठबळ देऊन अमोल तुजारे यांना राहत्या घरातून निष्कासित करण्याचे डाव आखले जात आहेत. पुणे शहरातील पोलीस आता जमीनीचे सौदे, फ्लॅट/ घरे खरेदी विक्री करणे, जमिन/ फ्लॅट रिकामी करून देणे अशा प्रकारच्या उद्योगात साईट बिजनेस म्हणून खाकीचा व पदाचा वापर करीत आहेत काय असाही सवाल श्री. तुजारे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान काल 19 फेब्रुवारी रोजी श्री अमोल तुजारे हे शिवजयंतीच्या कार्यक्रमात व्यस्त असताना काही अज्ञात इसमाने त्यांच्या घरातील सामानांची नासधूस करून ते बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी सहाय्य पोलीस आयुक्त वानवडी विभाग व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांना कळविले असता , त्यांनी अतिशय अरेराविपणे उत्तरे दिलेली आहेत. वास्तविक पाहता घरांचे ताबे देणे, घर खाली करणे हे काम पोलिसांचे नसताना देखील दिवाणी दाव्या यामध्ये पोलीस नाहकपणे हस्तक्षेप करून रिपब्लिकन नेते  अमोल तुजारे यांना राहत्या घरातून निष्कासित करण्याचा चंग बांधला आहे. 

मध्यंतरी संघटनेच्या कामकाजासाठी फिरत असताना त्यांच्या दुचाकी वाहनाला कोणीतरी अज्ञात इसमाने धडक देऊन त्यांना पाडले.  त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले,  तेव्हापासून ते त्यांच्या नातेवाईकांकडे बैठ्या घरात राहत आहेत . त्याचाच गैरफायदा घेऊन काही इसम पोलिसांना हाताशी धरून त्यांना घरातून निष्कासित करत असल्याचे माहिती श्री अमोल तुजारे यांनी दिली आहे.

दरम्यान दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी श्री. तुजारे यांनी राज्याचे अपर गृहसचिव श्री. चहल यांना मंत्रालयात दिलेल्या तक्रार अर्जात सर्व हकीकत  नमूद केली आहे. त्यात त्यांनी नमूद केले की, 
माझे ताबे वहिवाटेतील मिळकतीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांनी  सदनिका बळकवण्याच्या उद्देशाने माझे घराचे कुलूप तोडून, त्याजागी त्यांचे कुलूप लावण्यात आल्याची तक्रार पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे दिल्यानंतर देखील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता उलट माझ्यावर भारतीय न्याय संहिता कलम 168 अंतर्गत नोटीस बजावून पोलीस व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांनी माझे ताबे वहिवाटीतील मिळकतीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस आयुक्त पुणे शहर व पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्रमांक 05 यांचेकडे वारंवार तक्रार अर्ज देऊन देखील यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. तसेच मला माझे ताबे वहिवाटीतील मिळकती मधून दहशतीच्या बळावर काढून टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे.

सदनिकेची खरेदी/विक्री, भाड्याने देणे/घेणे करण्याचे अधिकार नाहीत-
मार्केटयार्ड येथील न्यू स्नेहनगर या सोसायटीचे जागेवर यापूर्वी छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड झोपडपट्टी तसेच ख्रिश्चन वाडी म्हणून ओळखली जात होती. सदर मार्केटयार्ड झोपडपट्टीला पुणे महानगरपालिकेने गलिच्छ वस्ती म्हणून घोषित करण्यात आलेले होते. दरम्यान माहे 1991 रोजी या भागातील सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिकांनी छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड यांचेशी भाडेकरारनामा करून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प करून त्या ठिकाणी आम्हा सर्वांना सदनिका देण्यात आल्या. सदर जागेची मालकी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांचीच आहे. सदरील जागेवर झोपडपट्टी असल्याने व ती घोषित झोपडपट्टी असल्याने पुणे मनपा गवनीचे सर्व लाभ या झोपडपट्टीस मिळत होते. तथापी जागेची मालकी ही आजही कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांचेकडे असल्याने सदनिकेची खरेदी/विक्री, भाड्याने देणे/घेणे करण्यास आजही अधिकार नाहीत.

अमेरिकेत स्थायिक होणार असल्याने सदनिकेची विक्री-
आज त्याच झोपडपट्टीच्या जागेवर न्यू स्नेहनगर सोसायटीची स्थापना करण्यात आली. या इमारतीमधील बिल्डिंग एफ मधील सदनिका क्रमांक 101 आम्हाला अलॉट करण्यात आला. दरम्यान आमचे कुटुंब मोठे असल्याने याच इमारतीमधील सदनिका क्रमांक 105 मध्ये राहणारे श्री. सुरेश जगदाळे हे त्यांच्या कुटुंबासह परदेशात अर्थात अमेरिकेमध्ये राहणेसाठी जाणार असल्याचे समजले. तसेच ते कायमस्वरूपी भारत सोडून परदेशात स्थायिक होणार असल्याने, ते ही सदनिकेची विक्री करणार असल्याचे समजले. त्यामुळे सदरील सदनिका मला विकत देणेविषयी चर्चा सुरू केली. मला लहानपणापासून श्री. सुरेश जगदाळे यांनी पाहिले होते. त्यामुळे त्यांनी मला ही सदनिका विक्री करण्याचा व त्याबाबतची अंतिम बोलणी झाली. अंतिम बोलणीमध्ये माहे 2006 मध्ये ही सदनिका त्यावेळचे बाजारभावाप्रमाणे मला सुमारे 5.00 लाख रुपयांना विक्री करण्यात आली आहे.

2013 ला जागा मालक मयत, 2025 ला लहान भावाकडून त्रास –
दरम्यान झोपडपट्टी पुनर्वसन योजना असल्याकारणामुळे सदरील खरेदी /विक्री व भाड्याने देण्याबाबत करारनामे करण्यात येत नव्हते. त्यामुळे त्यांनी या सदनिकेची खरेदीखत मा. दुय्यम निबंधक पुणे शहर यांचेकडे होत नसल्यामुळे वकीलांकरवी नोटरी करण्यात आले. माहे 2005 ते 2025 ते आजपावेतो ही सदनिका माझे ताबे वहिवाटीत आहे. सुरेश जगदाळे हे 2 मुले व पत्नीसह अमेरिकेत स्थायिक झाले होते. तथापी माहे 2013 रोजी त्यांचे अमेरिकेत निधन झाले. सुरेश जगदाळे व माझेमध्ये सदर सदनिकेचे खरेदी विक्री झाली असल्याची बाब त्यांची दोन मुले श्री. विनय जगदाळे व श्री. विनित जगदाळे यांना माहिती आहे. तरी देखील त्यांच चुलते रमेश जगदाळे मला त्रास देऊ लागले. तसेच विनय जगदाळे याने तर, वडीलांनी काय व्यवहार केला हे मला माहिती नाही असे खोटे सांगुन मला आणखी 5.00 लाख रुपयांची मागणी केली. सातत्याने मला ब्लॅकमेल करणे सुरू केले. दरम्यान मागील 20 वर्ष मी सदरील जागेचा पुणे महापालिकेचा टॅक्स व वीज देयक भरत आहे हे सर्वांना ज्ञात आहे. तरी देखील आणखी 5.00 लाख रुपयांची मागणी केली. मी नाईलाजास्तव, माझेकडे आता 5.00 लाख रुपये नाहीत, त्यामुळे मी थोडे थोडे पैसे देतो म्हणून त्यांनी समजुत काढली. तथापी त्यांना देखील काहीच अडचण नव्हती.

गुंडाकरवी सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न-
दरम्यान माहे जानेवारी 2025 मध्ये माझे ताबे वहीवाटीतील सदनिका सुरेश जगदाळे यांचे बंधु रमेश जगदाळे यांनी माझे परस्पर त्रयस्थ इसमांला भाडेकरार करून दिली असल्याचे समजले. तेंव्हापासून रमेश जगदाळे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसमांना माझे अंगावर पाठवित आहेत, तसेच माझे सदनिका जबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.सदर दि. 01/02/2025 रोजी 1. रमेश जगदाळे (रा. वानवडी पुणे), 2. अरविंद गायकवाड (रा. गोकुळनगर, कोंढवा) व 3. अक्षय आल्हाट (रा. आंबेडकर नगर मार्केटयार्ड) यांनी उपरोक्त नमूद माझे मिळकतीवर लावण्यात आलेले कुलूप तोडून त्या जागी त्यांचे कुलूप परस्पर लावले असल्याची बाब मला समजली. त्यामुळे मी नमूद दिनांकास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर यांचेकडे तोंडी व लेखी तक्रार दिली. तसेच माझे घरातील चिजवस्तुंविषयी लेखी तक्रारीमध्ये सर्व सविस्तर बाबी नमूद केल्या आहेत. तथापी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या सहा. पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांनी मला दि. 2/2/2025 रोजी त्यांचे जावक क्र. 538/ 2025 रोजी भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 168 प्रमाणे नोटीस दिली आहे.

माकेटयार्ड पोलीसांनी बेकायदेशिर नोटीस-
सदर नोटीशी मध्ये नमूद केले आहे की, आपण दि. 1/2/2025 रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाणे येथे समक्ष येवून कळविले की, आपले ताब्यातील फ्लॅट नं. एफ 105 न्यु स्नेहनगर सोसायटी बस डेपो शेजारी मार्केटयार्ड चे कुलूप कोणीतरी काढुन त्याजागी स्वतःचे कुलूप लावुन बेकायदेशिरपणे अतिक्रमण केले असेलबाबत सविस्तर हकीकत सांगितली. सदर तक्रारीचे अनुषंगाने आपणाकडे चौकशी सुरू असतांना, इसम नामे श्री. रमेश ताब्यात जगदाळे यांनी देखील पोलीस ठाणे समक्ष येवून फ्लॅट नं. 105 हा त्यांचे मालकी हक्काचा व ताबे वहीवाटीतील असल्याची हकीकत सांगितली.
त्याअर्थी मला भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 168 प्रमाणे प्राप्त अधिकाराने आपणांस सुचित करते की, आपण स्वतः अथवा हस्तक यांचेकरवी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये, आपल्या अशा कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपणांस व आपल्या सोबतचे सहकारी यांना जबाबदार धरून आपल्या विरूद्ध प्रचलित कायदयानुसार कायदेशिर कारवाई करण्यात येईल व सदरीची नोटीस आपणांविरूद्ध पुरावा म्हणून सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे नमूद करून त्यावर अश्विनी पाटील, सहा. पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर यांची स्वाक्षरी आहे.

गुन्हेगार धारदार शस्त्रे घेवून फिरतात-
सदर मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी ही नोटीस दिल्यानंतर, लगेच दि. 4/2/2025 व 5/2/2025 रोजी इसम नामे आल्हाट व इतर 7/8 इसम हे त्यांचे हातात शस्त्रे घेवून माझे ताबे वहीवाटीतील मिळकतीमध्ये घुसून साहित्य घेवून रिक्षा मध्ये भरून घेवून जात असल्याचे मला समजले. याच ठिकाणी राहणारे माझे जवळचे श्री. विल्सन पाखरे, छाया पाखरे व शैलेंद्र वडागळे यांनी सांगितले की, 7/ 8 इसम हातात शस्त्रे घेवून आले होते व रिक्षा क्र. 9191 मध्ये टाकुन घेवून गेले आहेत. मी अतिशय तत्परतेने पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्ष व मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांना संपर्क करून, वरील घडलेली हकीकत त्यांना सांगितली. तथापी मला कुठलिही दाद देण्यात आली नाही.

सदर मी उपरोक्त नमूद पत्यावर माझे कुटूंबियांसह राहणेस आहे. तथापी माहे ऑगस्ट 2024 रोजी माझे दुचाकीवरून जात असतांना दुचाकी घसरून माझा अपघात झाला आहे. त्या अपघातात माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्याला जबरी व गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने व मी हाडांच्या डॉक्टरांकडून वैदयकीय उपचार घेत असल्याने, मला डॉक्टरांनी पायऱ्या चढ-उतार करण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे मी माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे माझे जवळचे नातेवाईक राहत असलेल्या मौजे उंड्री पुणे शहर येथील बैठ्या घरात राहत आहे. त्याचाच गैरफायदा घेवून, इसम नामे 1. रमेश जगदाळे 2. अरविंद गायकवाड व 3. अक्षय आल्हाट यांनी 31 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी माझे राहते घराचे कुलूप तोडून त्या जागी स्वतःचे कुलूप लावले आहे. याबाबतचा तक्रार अर्ज देखील संदर्भ क्र. 1 ते 3 मध्ये नमूद केलेला आहे. 

पोलीसांचे गुन्हेगारांना पाठबळ आहे काय-
सदर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे, छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड हेच या जागेचे मुळ मालक आहेत. तसेच माहे सन 1991 रोजी केलेल्या भाडेपट्टा करारा मध्ये अनुक्रमांक 19 वर सुरेश जगदाळे यांची आई श्रीमती एलेनबाई तात्याबा जगदाळे यांचे नाव आहे. ही मुळ सदनिका सुरेश जगदाळे यांचे आईचे नावे आहे. तसेच अनुक्रमांक 18 वर बबनबाई श्रीपती मंडलिक, अनु. क्र. 31 वर बबन बन्सी साळवे अनु. क्र. 32 वर विजय प्रभाकर वडगळे, अनु क्र. 37, 40, 50 व 51वर माझे व माझे नातेवाईकांची नावे व सही आहे. तसेच अनु.क्र. 77 वर सोसायटीचे प्रवर्तक डेमेन बोर्डे यांचे नाव व स्वाक्षरी आहे. हा सर्व रेकॉर्ड छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड पुणे, व सोसायटीतील प्रत्येक सदनिकाधारकांकडे आहे. असे असतांना देखील मार्केटयार्ड पोलीसांनी कायदयाचा दुरूपयोग करून मला वेठीस धरले आहे. तसेच कायदयाचा वापर कायदेशिर हत्यार म्हणून करीत आहेत. सदर आज रोजी माझे राहते घरातील कोण कोणते वस्तु व साहित्य घेवून गेले आहेत, याची मला माहिती नाही. परंतु घरातील महत्वाचे साहित्य उपरोक्त नमूद इसम घेवून गेले आहेत अशी मला माहिती मिळाली आहे. दरम्यान सदरील श्री. रमेश जगदाळे ह्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसमांना माझे अंगावर पाठविले आहे. माझे मिळकतीवर येत असतांना, त्यांचे हतात हत्यारे असतात. ही बाब मार्केटयार्ड पोलीसांना सांगितल्यानंतर देखील पोलीस सोसायटी मधील सीसीटीव्ही फुटेल पाहुन त्यांचेवर कारवाई करीत नाहीत. याचा अर्थ मार्केटयार्ड पोलीस गुन्हेगारांच्या पाठीशी आहेत असा माझा समज झाला आहे.

माझ्यावर अन्याय व अत्याचार करण्याच्या उद्देशाने रमेश जगदाळे हे गैरउद्देशाने, अविवेकी प्रयत्न करून माझेवर दबाव आणून एका मर्यादेपलिकडे जाणिवपूर्वक मझा शारिरीक व मानसिक छळ करीत आहेत. माझेकडून आणखी 5.00 लाख रुपये जबरी काढणेसाठी माझा छळ करीत आहेत. रमेश जगदाळे हे स्वार्थी व त्रासदायक प्रवृत्तीचे असून माझा छळ करण्यात त्यांना अधिक समाधान मिळत आहे.आजपर्यंत मी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेकडे लेखी व तोंडी तक्रार अर्ज दिले आहेत. तथापी त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. उलट मलाच माझे घरात/ सदनिकेमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. तरी याबाबत तातडीने आदेश देणेत यावेत अशी विनंती करण्यात आली आहे.