Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

ओशो रजनिश आश्रम आंदोलकांवर कोरेगाव पार्क पोलीसांच्या लाठीमाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी,
कोरेगाव पार्क मध्ये देशविदेशातील महिलांकरवी सुरू असलेला देहव्यापार

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum
देशातील पुणे शहरात एकमेव असलेल्या ओशो रजनिश आश्रमावर कोरेगाव पार्क पोलीसांनी बेछुट केलेल्या लाठीमारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी झाल्याची प्रतिक्रिया अनेक आंदोलकांनी दिली आहे. ओशो रजनिश आश्रमावर विदेशी नागरीकांचा कब्जा, ओशो जमिन विक्री प्रकरण आणि त्यावरील आंदोलनामुळे हा विषय चर्चेत आलेला आहे. दरम्यान कोरेगाव पार्क हा संपूर्ण परिसर जिल्हाधिकारी पुणे यांच्या अधिनस्थ असतांना, आंदोलनकांवर लाठीमार करण्याची परवानगी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून घेतली होती किंवा कसे याबाबत देखील आता विचारणा होत आहे. दरम्यान कोरेगाव पार्क परिसरात देशी विदेशी महिलांकरवी मोठ्या प्रमाणात देहव्यापाराचे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेक्स टुरिझम व महिलांच्या अपव्यापाराचे केंद्र झाल्याने, ही परिस्थिती हाताळण्यात कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक वेताळ यांना अपयश आल्याने त्यांच्या बदलीची मागणी होत आहे.

ओशो आश्रम आंदोलन –
संबोधी दिनानिमित्त हार घालण्याचा वाद निर्माण झाला होता. तसेच ओशो आश्रमाची जमिन विक्री करीत असल्याचे प्रकरण देखील बाहेर आल्याने, कोरेगाव पार्क परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच ओशो रजनिश आश्रमावर विदेशी नागरीकांनी कब्जा करून प्रवेश कुणाला दयायचा याचा देखील तेच निर्णय घेत होते. कालपरवाना बहुजन समाज पार्टीने आंदोलन देखील केले होते. प्रकरण अतिशय नाजुक स्वरूपाचे होते. अशावेळी अतिशय शांततेने हे प्रकरण हाताळणे आवश्यक असतांना, पोलीसांनी दलित कार्यकर्त्यांवर लाठीमार करावा अशा पद्धतीने लाठीमार करून आंदोलन अधिक चिघळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. कोरेगाव पार्क पोलीसांच्या अशा प्रकारच्या वर्तनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन झाल्याची बाब अनेक आंदोलकांनी बोलून दाखविली आहे. वास्तविक पाहता, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक वेताळ यांनाच ही नाजुक परिस्थिती हाताळता आली नसल्यामुळे बदनामीला सामोरे जावे लागत आहे.

कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत आंतरराष्ट्रीय सेक्स टुरिझमसह देशी विदेशी महिलांच्या अपव्यापाराचे केंद्र बनले –
कोरेगाव पार्क आणि ओशो रजनिशी आश्रम हे एक समिकरण आहे. ओशो रजनिशी आश्रम म्हटले की कोरेगाव पार्क समोर येते. आज त्याच कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभागाने अलिकडच्या दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे 8/10 ठिकाणी हॉटेल आणि स्पा, मसाज पार्लरवर कारवाई करून दोषींविरूद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे.

कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी श्री. क्षीरसागर हे गैरमहसुली अंमलदार म्हणून कार्यरत असल्याचे समजते. ते यापूर्वी येरवडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असल्याने, कोरेगाव पार्क म्हणजे येरवडा पोलीस स्टेशन असल्याचे आजही समजत असल्याचे अनेक बातमीदारांनी आमच्याकडे बोलून दाखविले आहे. श्री. क्षीरसागर यांच्यामुळेच कोरेगाव पार्क परिसरात स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात देशी विदेशी महिलांकरवी देह व्यापाराची वाढ झाली असल्याचे, तसेच या सर्व प्रकारास वरीष्ठ पोलीस निरीक्षकांचे दुर्लक्ष हे देखील कारणीभुत ठरत आहे. तसेच वर्षानुवर्षे स्पा केंद्र चालविणाऱ्या नागरीकांनी सांगितले की, कोरेगाव पार्क परिसरात कधी नव्हे असे प्रकार सुरू आहेत. ज्यात स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू आहे. देश विदेशातील महिलांचा अपव्यापार सुरू असतांना पोलीस कारवाई करीत नाहीत. 
ज्यांच्या स्पा किंवा मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय चालत नाही, किंवा फॅमिलीसाठी असलेल्या स्पा वर पोलीस विनाकारण कारवाई करीत असल्याचे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकारास श्री. क्षीरसागर हे पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. 
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. पोलीसांनी लाठीमार करून प्रकरण अधिक चिघळविले असून, भविष्यात ओशो रजनिश आश्रम आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मध्ये नवीन कारभाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे. 

काय झाले कोरेगाव पार्क मध्ये –
पुणे शहर पोलीसांकडून प्रसिद्ध झालेल्या वृत्तात नमूद केले आहे की, कोरेगाव पार्क परिसरातील ओशो आश्रमाच्या गेटवर मॅनेजमेंटच्या विरोधात घोषणाबाजी करून आश्रमात एन्ट्री करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी सुमारे 130 अनुयायांच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच्याविरूध्द दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
ओशो आश्रमाच्या वतीने धनेशकुमार रामकुमार जोशी उर्फ स्वामी ध्यानेश भारती (65, रा. बंगला नं. 17, ओशो आश्रम ग नं. 1, कोरेगाव पार्क, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद त्रिपाठी उर्फ प्रेम पारस, सुनिल मिरपुरी उर्फ स्वामी चैतन्य किर्ती, गोपाल दत्त भारती उर्फ स्वामी गोपाल भारती, राजेध वाधवा उर्फ स्वामी ध्यान अनुग्रह, किशोर लाभशंकर रावल उर्फ स्वामी प्रेम अनादी, जगदीश शर्मा उर्फ स्वामी अमन विस्मय, आरी राजदान उर्फ कुनिका भट्टी, न्यु इंडिया न्युजचा प्रतिनिधी वैभवकुमार पाठक यांच्यासह इतर 100 ते 120 अनुयायांविरूध्द भादंवि 143, 147, 452, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलिस नाईक गोकुळ कन्हैयालाल परदेशी (50) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरूण विनीत रावल (27, रा. भिलाई वेस्ट, दुर्ग, छत्तीसगड) याच्याविरूध्द भादंवि 353, 332, 504 सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ओशो आश्रमाचे मॅनेजमेंट आणि अनुयायांच्यात मोठे वाद सुरू आहेत. दि. 22 मार्च रोजी मोठ-मोठयाने घोषणाबाजी केली तसेच आश्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान न्यू इंडिया न्यूजचे प्रतिनिधी वैभवकुमार पाठक यांनी पत्रकार असल्याचे सांगत आश्रमात एन्टी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनुयायांनी जोशी यांना धक्काबुक्की केल्याचा आरोपी करण्यात आला आहे. वरूण विनती रावलने घोषणाबाजी करत धनेशकुमार जोशी यांच्याशी वाद घातल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान या सर्व नाजुक परिस्थितीत वरिष्ठ पोलीसांनी संयमाने प्रकरण हाताळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून कोरेगाव पार्क मधील वेश्या व्यवसाय व महिलांचा देहव्यापार बंद करण्याची मागणी होत आहे.