जो जास्त भ्रष्टाचार करणार, त्यालाच मोठ्या पदावर पदस्थापना मिळणार,
मेरिट/गुणवत्तेच्या निव्वळ बाताच मारणार, प्रत्यक्षात थैली किती वजनदार आहे, त्यावरच सर्व अवलंबुन असते.
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण
पुणे महापालिकेत पैशांचा बाजार भरलाय… जो उठतो तो प्रभारी पदभार घेवून त्याच्या सध्याच्या पदापेक्षा मोठ्या पदांवर पदस्थापना घेतल्याचे दिसते. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात तर ज्या अभियंत्याला पहिल्या टप्प्यातील पदोन्नती देखील मिळाली नाही, त्याला थेटच प्रभारी उपअभियंता म्हणून पदस्थापना दिली, कालपर्यंत अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका सेवकाला थेटच प्रशासन अधिकारी या पदाचा अनुभव डिलिट मारून त्याला थेट सहायक आयुक्त पदावर बसविले. मागील आठवड्यात उपआयुक्त पदांचा तपशील जाहीर केला, त्यात संदीप कदम, सोमनाथ बनकर, चेतना केरूरे,आशा राऊत यांना थेट महत्वाच्या व मोठ्या पदांवर नियुक्ती दिल्याचे दिसून येत आहे. त्यातच सोमनाथ बनकर यांना देखील अतिक्रमण व सुरक्षा विभाग सनियंण विभागाचा पदभार दिला आहे. त्यामुळे तर पुणे महापालिकेत तथाकथित मेरिटचा नव्हे तर थैलीशाहीचा वापर करून मोठ मोठ्या पदांचे टेंडर जाहीर करून त्यांना पदवाटप केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जो कर्मचारी प्रामाणिकपणे एक विश्वस्त म्हणून पुणे महापालिकेत कर्तव्य बजावित आहे, त्याला मात्र आहे त्याच पदावर कुजवून टाकले जात आहे, त्याच्या अनुभवाचा उपयोग पुणेकरांना करून देण्यापेक्षा त्याची बुद्धी नको त्या पदांवर कुजवून नष्ट केली जात आहे. त्यामुळे प्रशासकीय राजवटीत आणखी काय काय पहायला मिळणार हे दैवच जाणो.
पुणे महापालिकेत उपआयुक्त पदांचा बाजार-
पुणे महापालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी दि. 6 ऑगस्ट रोजी उपआयुक्त पदांचे अधिकारांमध्ये बदल केले आहेत. एकाच खात्यात 8 वर्षापेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेले माधव जगताप यांच्याकडून अतिक्रमण व सुरक्षा सनिंयत्रक हे पद काढुन घेण्यात आले आहे. माधव जगताप यांच्याकडे पुणे महापालिकेला सार्वाधिक उत्पन्न मिळवुन देणाऱ्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपआयुक्त पदाचा पदभार देण्यात आलेला आहे. माधव जगताप यांना या खात्याचा काहीच अभ्यास नसतांना, त्यांना ह्या पदावर पदस्थापना देण्यात आली आहे. तर माधव जगताप यांच्याकडील अतिक्रमण व सुरक्षा सनियंत्रक ह्या पदावर ॲन्टी करप्शन विभागाकडून कारवाईमध्ये नाव असलेले सोमनाथ बनकर यांच्याकडे हा विभाग सोपविण्यात आलेला आहे. राज्य शासनाच्या अ गट संवर्गातील आशा राऊत व चेतना केरूरे यांना देखील महत्वाच्या पदांवर बसविण्यात आले आहे. श्रीमती चेतना केरूरे व श्रीमती आशा राऊत यांनी पुणे महापालिकेत 3 वर्षांची सेवा बजाविल्यानंतर, त्यांची बदली झाली होती. त्यामुळे पुनः त्याना प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचा शासन निर्णय नाही. एकदा प्रतिनियुक्तीवर काम केल्यानंतर, त्यांना मूळच्या खात्यात रिव्हर्ट केले जाते. परंतु श्रीमती चेतना केरूरे व श्रीमती आशा राऊत यांना पुनः प्रतिनियुक्तीवर पुणे महापालिकेत पाठविण्यात आले आहे.
श्रीमती चेतना केरूरे यांच्याकडे उपआयुक्त परिमंडळ 5 चा पदभार देण्यात आलेला आहे. तसेच श्रीमती आशा राऊत यांच्याकडे पुनः परिमंडळ क्र. 3 चा पदभार देण्यात आलेला आहे. यापूर्वी देखील श्रीमती आशा राऊत यांनी परिमंडळ क्र. 3 मध्ये काम केलेले आहे. परंतु पुनः त्यांना ह्या पदाचा पदभार देण्यात आलेला आहे. 26 मार्च रोजी बदली झाली झाल्यानंतर 29 मार्च पर्यंत परिमंडळ 3 चा पदभार कुणालाही देण्यात आलेला नव्हता. दरम्यान 29 मार्च पर्यंत ठेकेदारांच्या बीलांवर श्रीमती आशा राऊत यांच्या बदलीनंतर देखील सह्या आहेत. त्यामुळे धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयातील काही निविदा कामे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहेत. त्याचा निपटारा करण्यासाठीच श्रीमती आशा राऊत यांची पुनः नियुक्ती मिळविली असल्याची पुणे महापालिकेत चर्चा आहे.
श्रीमती आशा राऊत यांच्याकडे उपआयुक्त परिमंडळ क्र. 3 चा पदभार आहेच, याशिवाय प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक व तांत्रिक विभाग सनियंत्रण अधिकारी म्हणून देखील त्यांच्याकडे पदभार देण्यात आलेला आहे. दि. 6 ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या आदेशात एकुण 17 उपआयुक्तांच्या अधिकारांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. परंतु त्याच त्याच पदांवर त्याच त्याच लोकसेवकांची बदली व नियुक्ती का देण्यात आली आहे याचे उत्तर पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. भोसले देणार आहेत काय असाही सवाल व्यक्त होत आहे.
सोमनाथ बनकर यांच्याकडे अतिक्रमण व सुरक्षा सनियंत्रकाचा पदभार-
पुणे महापालिकेतील अतिशय महत्वाचा विभाग असलेल्या अतिक्रमण व सुरक्षा विभागाचा पदभार सोमनाथ बनकर यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. श्री. सोमनाथ बनकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे रेक्टर पदावर कार्यरत असतांना, केलेला गैरव्यवहार तसेच सोमनाथ बनकर यांनी स्वतःची शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी सिक्कमी मणिपाल विद्यापीठाची बोगस एम.बी.ए.ची डिग्री प्राप्त केली असून त्याबाबत त्यांचे सेवापुस्तकात नोंद घेतली आहे. ॲन्टी करप्शन ब्युरोच्या अहवालाचे अनुषंगाने त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्याची शिफारस तत्कालिन उपआयुक्त/ पोलीस अधीक्षक श्री. संदीप दिवाण ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे यांनी केली आहे. याच अहवालात तत्कालिन शिक्षण प्रमुख श्री. शिवाजी दौंडकर, श्री. सोमनाथ बनकर, तत्कालिन रेक्टर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह पुणे यांनी गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन केल्याने त्यांच्या विरूद्ध भारतीय दंड विधानानुसार कारवाई करण्याची शिफारस केली आहे.
ॲन्टी करप्शन ब्युरो यांच्या 21/3/2028 रोजीच्या गोपनिय अहवालातील मुद्दा क्र. 4 वर नमूद केले आहे की, चौकशी अहवालात निष्पन्न झाल्याप्रमाणे, गैरअर्जदार श्री. शिवाजी दौंडकर व सोमनाथ बनकर यांनी बँकॉक, पटाया व फुकेत या देशांचा खाजगी दौरा केलेला असून दौऱ्यावर जातांना पुणे महापालिकेची कायदेशिर परवानगी घेतली नव्हती त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती.
श्री. सोमनाथ बनकर यांनी भ्रष्टाचार गैरव्यवहार केलेले आहेत, त्यांची खातेनिहाय/ विभागीय चौकशी झालेली आहे. त्यात ते दोषी आढळुन आलेले आहेत. असे असतांना देखील श्री. बनकर यांच्याकडे अतिक्रमण व सुरक्षा विभागाचा पदभार देण्यात आलेला आहे. दरम्यान सोमनाथ बनकर यांच्याकडे हे दोन्ही विभाग का सोपविण्यात आले, किंवा त्या पदांसाठी श्री. बनकर यांनी मोठी लॉबींग केली होती काय... हा विषय अतिशय समजुन घेण्यासारखा आहे. पुढील अंकात याचा मोठा खुलासा समोर येईलच. परंतु पुणे महापालिकेत पैशांचा बाजार भरलाय काय, जिसकी जितनी थैली भारी... उसको उतना पदभार असे सुत्र ठरविण्यात आले आहे काय असाही सवाल व्यक्त होतांना दिसत आहे.