Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यात पोलीसांपेक्षा गुन्हेगारांची संख्या दुप्पट… 29 हजार 218 गुन्हेगारांचे आर्थिक सोर्स काय?

पुणे शहरात 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई…
12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका.. तरीही… मध्यरात्रीच्या 6 तासात पुनः 521 गुन्हेगार मिळून आले…

  1. पुणे शहरात गुन्हेगारांची संख्या नेमकी किती आहे..
  2. गुन्हेगारी टोळ्या किती कार्यरत आहेत.
  3. गुन्हेगारी टोळ्यांमध्ये प्रत्येकी किती गुन्हेगार आहेत…
    पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी
  4. ऑल आऊट व कोम्बिंग ऑपरेशन
  5. गुन्हेगार चेकींग
  6. गुन्हेगार आदान – प्रदान
  7. दत्तक गुन्हेगार
    या योजना राबवुन 1. गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करणे 2. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, 3. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणे अशी सर्व उपाय योजना केली तरी प्रत्येक चेकींग वेळी गुन्हेगारांची संख्या नेमकी कशामुळे वाढत आहे….

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
50 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात एकुण किती गुन्हेगार आहेत… किती गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत… त्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये किती गुन्हेगार सक्रिय आहेत… याची माहिती पुणे शहर पोलीसांनी जाहीर केली असून शरिराविरूद्धचे 22 हजार 607 व मालमत्तेविरूद्धचे 6 हजार 611 आरोपींची यादी तयार केली आहे. यातील 10 हजार 973 सराईत गुन्हेगारांवर कारवाई करून 12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. दरम्यान महाशिवरात्री, शिवजयंती, संभाव्य व्ही.व्ही.आय.पी. दौरे, पोट निवडणूका या अनुषंगाने बुधावारची मध्यरात्र ते गुरूवार पहाटेपर्यंत 6 तासाचे कोंम्बिंग ऑपरेशन मध्ये सुमारे 3707 गुन्हेगार चेक करून त्यात 521 गुन्हेगार मिळून आले आहेत. त्यामुळे पुणे शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत असून, कायदा आणि सुव्यवस्थेला अधिक आव्हान वाढले असल्याचे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान गुन्हेगारी क्षेत्रातील आरोपी कारागृहात व तडीपार किती आहेत… तसेच तडीपार असलेले गुन्हेगार प्रत्येक कोम्बिंग ऑपरेशनवेळी आढळुन येतात तरी कसे हा देखील चिंतेचा विषय ठरत आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, पुणे शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच सराईत गुन्हेगार यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी ऑल ऑऊट व कोम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगार चेकींग, गुन्हेगार आदान-प्रदान, दत्तक गुन्हेगार अशा योजना राबवुन अशा गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे तसेच त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. त्यासाठी मागील 7 वर्षातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आलेली आहे. यात शरिराविरूद्धचे एकुण 22 हजार 607 व मालमत्तेविरूद्धचे 6 हजार 611 आरोपींची यादी तयार करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या गुन्हेगारी हालचालींवर लक्ष ठेवून रेकॉर्डनुसार कठोर व परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त पदाचा पदभार श्री. रितेश कुमार यांनी स्वीकारल्यापासून आजपर्यंत सुमारे 10 हजार 973 सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असल्याचे नमूद केले आहे. 
दरम्यान पुणे शहरातील पोटनिवडणूका तसेच महाशिवरात्री, शिवजयंतीसह संभाव्य व्हीआयपी व्यक्तींचे दौरे या अनुषंगाने बुधावार रात्री ते गुरूवार पहाटेपर्यंत ऑल ऑऊट ऑपरेशन राबविण्यात आले. या सहा तासांच्या गुन्हेगार चेकींग मध्ये सुमारे 3 हजार 707 गुन्हेगार चेक करण्यात आले. त्यात 521 गुन्हेगार मिळून आले आहेत. यामध्ये 

1) आर्म ॲक्ट गुन्हे शाखेने दोन केसेस व पोलीस स्टेशनने 3 केसेस केल्या आहेत.
2) युनिट क्र. 5,
3) अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 व 2 यांनी अनुक्रमे कोकेन व हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला आहे.
4) पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 2 यांनी बंडगार्डन, भारती विद्यापीठ एकुण 2 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.
5) पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 4 यांनी खडकी, चंदननगर पोलीस स्टेशन येथे कारवाया केल्या आहेत.
6) पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 5 यांनी मुंएवा, – 2, कोंढडवा, वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत कारवाया केल्या आहेत.
7) तसेच मुंबई प्रोव्हीबीशन ॲक्ट प्रमाणे गुन्हे शाखेने 6 केसेस तरे पोलीस स्टेशनने 45 केसेस केल्या आहेत.
8) महा. जुगार ॲक्ट प्रमाणे गुन्हे शाखेने 6 तर पोलीस स्टेशनने 11 केसेस करून 36 आरोपींना अटक केली आहे.
9) सीआरपीसी प्रमाणे 538 आरोपिंविरूद्ध कारवाई केली तर महाराष्ट्र पोलीस कायदा 142 प्रमाणे गुन्हेशाखेने 4 तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.
10) पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील एकुण 544 हॉटेल, ढाबे व लॉजेस तसेच 134 एसटी स्टँड, रेल्वे स्टँड, निर्जन ठिकाणे चेक करण्यात आले आहेत. तसेच पोलीस नाकाबंदी व वाहतुक शाखा यांच्याकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हेगारांची भलीमोठी यादी –
शरिराविरूद्धचे एकुण 22 हजार 607 व मालमत्तेविरूद्धचे 6 हजार 611 असे एकुण 29 हजार 218/- गुन्हेगारांपैकी 10 हजार 973 गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. दरम्यान पुनः कोंम्बिग ऑपरेशन मध्ये 3 हजार 707 गुन्हेगार चेक करण्यात आले. त्यात 521 गुन्हेगार मिळून आले आहेत. थोडक्यात 29 हजार 218 पैकी 10 हजार 973 अधिक 3 हजार 707 असे एकुण 14 हजार 680 गुन्हेगारांवर कारवाई केली असल्याचे दिसून येत आहे.
पुणे शहरात एकुण 29 हजार 218 गुन्हेगार असल्याचे पोलीस आयुक्तालयाने जाहीर केले आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पोलीसांपेक्षा गुन्हेगारांची संख्या दुप्पट असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस आयुक्तालाच्या प्रसिद्धी पत्रकातच नमूद केल्यानुसार दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाईचे धोरण अवलंबविले असल्याचे नमूद आहे. परंतु ह्या गुन्हेगारी वाढण्यामागे नेमके काय कारण आहे. 29 हजार 218 पैकी किती गुन्हेगार कारागृहात आहेत व किती गुन्हेगार तडीपार आहेत… तसेच तडीपारापैकी किती गुन्हेगार आजही पुणे शहरात वास्तव्य करीत आहेत ही बाब चिंतेची असल्याचे दिसून येत आहे.
गुन्हेगारांची संख्या एवढी वाढली कशी… त्यांचा आर्थिक सोर्स काय आहे –
कोणतंही कष्ट न करता एैषोआराम जीवन जगणे आणि साऊथ सह बॉलिवुड – हॉलिऊट मधील चित्रपटातील खलनायकासारखे जीवन व्यतित करण्याच्या हव्यासापोटी गुन्हेगारांची संख्या वाढत आहे काय हे पाहण्याची गरज आहे. रिअल इस्टेट, मनी लाँड्रींग च्या माध्यमातून यापूर्वीची गुन्हेगारी वाढत गेल्याचे चित्र आहे. परंतु आता गुटखा, ड्रग्ज हे देखील फुकटचे आणि बक्कळ पैसे मिळवुन देणारे क्षेत्र ठरत आहे. अंमली पदार्थ विभागाने ज्या ज्या ठिकाणी धाडी टाकल्या आहेत, त्या त्या ठिकाणी तरूण मुलांव्दारे विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. कोथरूड येथे मागील आठवड्यात टाकलेल्या छाप्यात 22/23 वर्षाचे तरूण एमआयटी जवळ ड्रग्ज विक्री करतांना छाप्यात आढळुन आले आहेत. याचाच अर्थ गुटखा आणि ड्रग्ज हे रिस्क असली तरी बक्कळ पैसे मिळवुन देणारे क्षेत्र ठरत आहे. नुतन पोलीस आयुक्त श्री.रितेश कुमार यांनी गुटखा आणि ड्रग्जवर हातोडा मारला आहेच. शिवाय अंमली पदार्थ विभागाचे विनायक गायकवाड यांनी बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग वाढवुन ड्रग्ज माफीयांवर कारवाई करीत आहेत. परंतु गुटखा आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची देखील संख्या वाढत आहे एवढ मात्र निश्चित.
यानंतर पुणे शहरातील खाजगी सावकारी आणि फायनांशिअल कंपन्यांची वसुली करण्यासाठी ठेवलेले बहुतांश इसम ह्यांचे वर्तन गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे दिसून आले आहे. त्यातच बांधकाम व्यावसायिक, लँड माफिया, रिअल इस्टेट ह्या बेकायदेशिर धंदयात देखील शेकडो- हजारोंची संख्या आहे. त्यामुळेच गुन्हेगारी अधिक वाढत असल्याचे अनुमान असू शकते. कारण हा धंदा विना कष्टाचा परंतु बक्कळ पैसा मिळवुन देणार असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर पुणे येथे प्रसिद्ध खटल्यांची माहिती घेत असतांना, नवीन इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुन्हेगारांचे जथ्येच्या जथ्ये धरून आणलेल्या पाहिल्या आहेत. तसेच न्यायालयाच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील डक मध्ये अनेक जणांच्या ह्या विषयावरच अधिक चर्चा असल्याचे दिसून आले आहे.
यातही महत्वाचे म्हणजे खाजगी सुरक्षा रक्षक हा नवीन भाग यात जोडला गेला आहे. यामध्ये पोलीसांच्याच नातेवाईकांच्या नावे खाजगी सेक्युरिटी गार्ड च्या संस्था कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच राजकीय क्षेत्रातील काही मंडळींच्या नावे देखील सेक्युरिटी एजन्सी आहेत. यात देखील या गुन्हेगार इसमांना ठेवले असल्याचे मार्केटयार्ड पुणे येथील काही प्रकरणांवरून निदर्शनास येते. फायनांशिअल कंपन्यांनी ज्या नागरीकांना दुचाकी,तीनचाकी व चारचाकी वाहन हप्त्यांवर विक्री केले आहे किंवा गृहपयोगी साहित्यासाठी कर्ज दिले आहे, त्याच्या वसुलसाठी देखील पोलीसांच्या नातेवाई व मुलांच्या नावे असलेल्या संस्थेला वसुलीचे काम दिले असल्याचे कात्रज व बाणेर येथील काही प्रकरणांवरून निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनेवर जेवढे पोलीस कर्मचारी नाहीत त्याच्यापेक्षा दुप्पट – तिप्पट गुन्हेगारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पोलीसांनी या प्रकरणी देखील अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे दिसते.