Sunday, January 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत 100 ट्रक भरेल इतका गुटखा,
गांजा आणि मेफेड्रॉनची मोठी बाजार पेठ कोंढव्यात….

गांजा आणि मेफेड्रॉनची मोठी बाजार पेठ कोंढव्यात

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील कोंढवा पोलीस स्टेशन आणि पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत गुटख्याचे आगार झाले असल्याची चर्चा दोन्ही शहरात आहे. एकट्या कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत आठ व 12 चाकांच्या 100 ट्रक मध्ये भरेल इतका मोठा साठा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नक्की परिस्थिती काय आहे हे कोंढवा पोलीस स्टेशनच्या पोलीसांना नक्की माहिती असू शकेल. त्यामुळे वरीष्ठ कार्यालयाकडून कोंढवा पोलीस स्टेशनची झाडाझडती घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.


कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील मिठानगर, शिवराज नगर ते खडी मशिन, उंड्री पर्यंत केवळ गुटख्याची गोडावुन असल्याचे सांगितले जात आहे. पुणे शहराला 15 दिवस पुरेल इतका मोठा साठा केवळ एकट्या कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये असल्याची शहरात मोठी चर्चा आहे. दिवाळीच्या काळात तर या साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
गुटख्यासोबतच हुक्का पार्लर आणि आता तर गांजा आणि मेफेड्रॉन सारख्या अंमली पदार्थांची खरेदी विक्रीची मोठी बाजार पेठ म्हणून कोंढवा पोलीस स्टेशनने मोठे नाव लौकिक प्राप्त केले आहे. कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत गांजा, एम.डी. सारखे अंमली पदार्थांची मोठी बाजारपेठ निर्माण झाल्याने, अंमली पदार्थ विभागाने देखील दर दोन महिन्यांत कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत 10 ग्रॅम, 15 ग्रॅम, 25 ग्रॅम एम.डी. वर कारवाई केल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत एम.डी आणि गांजाचा नेमका किती साठा आहे याचा आकडा बाहेर आलेला नाही.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्वच गुन्हे शाखेंची कारवाई धिम्या गतीने सुरू आहे. एकच आरोपी चार पोलीस स्टेशन आणि दोन गुन्हे युनिट मध्ये फिरविला जात असल्याचे देखील समोर आले आहे. एका गुन्ह्याच्या शोधात चार / पाच पोलीस स्टेशन किंवा गुन्हे युनिट, खंडणी, अंमली पदार्थ विभागांच्या रेकॉर्डवर एक सारखी नावे आढळुन येत आहेत. दरम्यान गुटखा आणि गांजा हे तर आता पुणे शहरातील कोणत्याही पान टपरीवर उपलब्ध होत आहेत. तर एम.डी. सारखे अंमली पदार्थ हे कोंढव्यातून पुढे 32 पोलीस स्टेशन हद्दीतील ठिकाणांवर पोहोचत असल्याची माहिती आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील 32 पोलीस स्टेशन हद्दीतील महत्वांच्या पॉईंटवर एम.डी. 24 बाय 7 उपलब्ध आहेत. दारूड्यांना दारूगुत्ता, बार दिसतो, गुटखा खाणाऱ्यांना पान टपरी आणि काही किराणा मालाची दुकाने दिसतात. तसे गांजा आणि एम.डी. घेणाऱ्यांना त्यांचे त्यांची ठिकाणे चांगलीच माहिती आहेत. परंतु ही गुन्ह्याची ठिकाणे पुणे पोलीसांना माहिती नाहीत या सारखे दुर्देव की सुदैव म्हणावे हेच समजत नाहीये.