Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेतील उपकामगार अधिकारी पदाच्या भरतीचे गौडबंगाल

कार्यरत प्रभारी, भ्रष्टाचारी उपकामगार अधिकाऱ्यांना पदोन्नतीची खिरापत

पुणे/दि/ प्रतिनिधी/ नॅशनल फोरम/
पुणे महानगरपालिकेतील उपकामगार अधिकारी या प्रशासकीय सेवा श्रेणी 3 मधील पदाच्या भरतीचे गौडबंगाल समोर आले असून, सध्या मुख्य कामगार अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या खात्यामधील प्रभारी उपकामगार अधिकारी यांना कायमस्वरूपी उपकामगार अधिकारी या पदावर पदस्थापना करण्याच्या उद्देशाने दि. 28 ऑगस्ट रोजीची जाहीरात काढली असल्याची चर्चा सध्या पुणे महापालिकेच्या वर्तूळात सुरू आहे. उपकामगार अधिकारी वर्ग 3 या पदावर तदर्थ पदोन्नतीने नियुक्ती देणेकामी अर्ज मागविण्यात आले आहेत.


उपकामगार अधिकारी हे पद नामनिर्देशनाने 50 टक्के व पदोन्नतीने 50 टक्के भरण्याचे नवीन सुधारित आकृतीबंधामध्ये तरतुद आहे. तथापी आता करण्यात येणारी भरती प्रक्रिया ही पदोन्नतीने करण्यात येणार आहे. दरम्यान उपकामगार अधिकारी यामधील अर्हतेनुसार सेवापुस्तकातील नोंदीनुसार अनुभवाचा दाखला अशी अट ठेवण्यात आली आहे. तथापी उपकामगार अधिकारी यांच्या सेवापुस्तकात मागील काही महिन्यांत नोंदी करून ठेवण्यात आलेल्या आहेत. याचा अर्थ हाच निघतो की, भरतीमध्ये पुणे महापालिकेतील कोणत्याही उमेदवाराला कामगार खात्यामध्ये प्रवेश करू दयायचा नाही म्हणून पात्रता व अर्हतेमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे ही पदोन्नती व पदस्थापनेची प्रक्रिया पूर्णपणे मॅनेज झाली असल्याची पुणे महापालिकेत चर्चा आहे.
या मध्ये सध्या उपकामगार अधिकारी या प्रभारी पदावर सध्या 10/11 कर्मचारी कार्यरत आहेत त्यांनाच पदोन्नती देण्यासाठी पुणे महापालिकेची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पुणे महापालिकेतील उपकामगार अधिकारी या प्रभारी पदावर 1) श्री. प्रविण गायकवाड 2) श्री. बुगप्पा कोळी 3) श्री. अमित चव्हाण 4) श्रीमती सुमेधा सुपेकर 5) श्री. अभिषेक जाधव 6) श्री. सुरेश दिघे 7) श्रीमती चंद्रलेखा गडाळे 8) श्री. आदर्श गायकवाड 9) श्रीमती माधवी ताठे 10) श्री. लोकेश लोहोट यांचीच निवड होणार व पदोन्नत होणार हे नक्की झाले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील कार्यरत इतर सेवकांनी अर्ज भरण्यास नापसंती व्यक्त केली आहे. सगळे पूर्वीच मॅनेज झाले आहे तर मग या प्रक्रियेत आपण काय सहभागी व्हायचे असाही प्रश्न उपस्थित केला आहे. यांचीच निवड झाल्यास त्याचे आश्चर्य वाटायला नको.
मुख्य कामगार अधिकारी हे भ्रष्टाचारी पद्धतीने पदस्थापित झाले असल्याने ते इतरांनाही त्याच मार्गाने पदस्थापना देणार –
पुणे महापालिकेमध्ये कामगार कल्याण विभाग, हा कामगार आणि महापालिकेचा दुवा म्हणून काम करतो. या मध्ये कामगारांचे ही जपले जाणे महत्वाचे असतांना, केवळ कामगारांचे नुकसान कसे होईल हेच केवळ कामगार कल्याण विभाग पाहत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कामगार कल्याण खात्यातील खातेप्रमुख श्री. शिवाजी दौंडकर हे 1988 साली पुणे महापालिकेत नोकरीस रुजु झाले. त्यानंतर 2003 मध्ये दौंडकर कामगार कल्याण अधिकारी म्हणून काम पाहू लागले. त्यानंतर 2013 साली मुख्य कामगार अधिकारी या पदाचे कामकाज पाहू लागले. परंतु या ज्या पदोन्नती मिळालेल्या आहेत, त्या सर्व संशयास्पद असून यामध्ये भ्रष्टाचारी मार्गाने दौंडकर यांनी या पदोन्नती मिळविल्याचे त्यांच्या पदस्थापनेच्या प्रवासावरून दिसून येत आहे.


श्री. दौंडकरांचा धावता आढावा –
मुख्य कामगार अधिकारी हे सल्लागार कामगार हे या खात्याचे पूर्वीचे नाव आहे. आजचे खात्याचे नाव मुख्य कामगार अधिकारी आहे. सल्लागार कामगार भरतीच्या वेळी माहे 2009 मध्ये सेवक वर्ग विभाग अधिकारी हे दौंडकर हेच या पदावर कार्यरत होते. तसेच उपआयुक्त सेवकवर्ग म्हणून श्री. कुंडलिक कारकर उर्फ के.सी. कारकर हे कार्यरत होते. या सल्लागार कामगार भरतीवेळी 35 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये 30 अर्ज अपात्र ठरवुन 5 अर्जदारांना पात्र ठरविण्यात आले होते. हे सर्व काम सल्लागार कामगार कार्यालयाने म्हणजेच कामगार कल्याण अधिकारी श्री. दौंडकर यांनी हे काम केलेले आहे.
एकीकडून अर्ज छाननीसाठी पाठवायचे आणि स्वतःच छाननी करून ते अर्ज पात्र करून घ्यायचे. हे सर्वस्वी चुकीचे आहे. यामध्ये तत्कालिन अतिरिक्त आयुक्त श्री. उमाकांत दांगट व तत्कालिन महापालिका आयुक्त श्री. महेश झगडे यांचीही वेळोवेळी मान्यता घेतली आहे. यात सल्लागार कामगार भरतीवेळी पात्र झालेल्या अर्जांमध्ये श्री. अरून भगवान खिलारी हे आज रोजी कामगार कल्याण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. श्री. उमेश रामचंद्र माळी हे उपआयुक्त म्हणून सेवानिवृत्त झालेले सेवक आहेत. श्री. संजय पांडूरंग मोरे हे तहहयात जनता संपर्क अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सौ. मंजुषा सतिश इधाटे हया मुख्य विधी अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झालेल्या आहेत. आणि श्री. शिवाजी भिकाजी दौंडकर हे त्यावेळी 2009/10 रोजी कामगार कल्याण अधिकारी, सेवक वर्ग अधिकारी म्हणून काम पाहत होते. व आज रोजी मुख्य कामगार अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.


सल्लागार कामगार भरतीच्या अटी – व प्रत्यक्षातील परिस्थिती –
यावेळी जाहीरात देतांना, जाहीरातीमध्ये सल्लागार कामगार या पदाची पात्रता कायदयाचा पदविधर, कायदयानुसार प्रस्थापित झालेला विद्यापीठाकडे कामगार कल्याण विषयक पदविका किंवा संबंधित संस्थांनी दिलेली आणि राज्य शासनाने मान्यता दिलेली कामगार विषयक पदविका, धारण केलेली असली पाहिजे व अनुभव विषयक पात्रता अ) मनपा सेवकांसाठी सरलेखनिक किंवा त्यावरील वेतनश्रेणीतील जागेवरील कामाचा 5 वर्षांचा अनुभव ब) बाहेरील उमेदवारांसाठी औदयोगीक संस्थेतील आस्थापनेतील कामगार विषयक प्रश्न अथवा कामे याबाबतचे 5 वर्षांचा अनुभव अशा अटी ठेवण्यात आल्या होत्या. वय – बाहेरील उमेदवारांसाठी 35 वर्षांपेक्षा कमी नसावे अशी अनुभवाची व शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली होती.
यानुसार सर्व उमेदवारांना मुलाखतींसाठी बोलाविण्यात आले होते. तसेच या सर्वांचे काम कामगार कल्याण अधिकारी तसेच प्रभारी सल्लागार कामगार म्हणून श्री. दौंडकर यांनी कामगार कल्याण विभागाकडून कामकाज पाहिले. व सेवक वर्ग विभाग अधिकारी म्हणून सेवकवर्ग विभागाकडून कामकाज पाहिले. म्हणजेच स्वतःचीच नेमणूक स्वतःच करून घेतली. ही बाब अतिशय गंभिर असून सर्वथा चुकीची आहे. जो उमेदवार भरतीमध्ये उमेदवार म्हणून असतो, याच उमेदवारांने भरतीमध्ये सहभाग घ्यावयाचा नसतो. ही बाब सर्वस्वी जाहीर आहे. तसेच वेगवेगळी कारणे देवून लहान लहान कारणांवरून अर्ज अपात्र केल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामध्ये अपात्रतेचे कारण अनुभवाचे हे स्पष्टपणे दिसत आहे.
त्यामुळे श्री. शिवाजी भिकाजी दौंडकर यांची मूळ महापालिकेतील नेमणूक तसेच लघुटंकलेखक या पदावरील नेमणूक तसेच कामगार कल्याण अधिकारी या पदावरील नेमणूक तसेच सेवक वर्ग अधिकारी या पदावरील नेमणूक तसेच सल्लागार कामगार या पदावरील नेमणूक या संशयास्पद असून त्या भ्रष्टाचारी पद्धतीने भरल्याचे दिसत आहे.


दौंडकरांकडे पुणे महापालिकेतील पदांची खिरापत-
दौंडकरांची पुणे महापालिकेतील मलिद्यासह खिरीवर झडप –


आज रोजी श्री. शिवाजी दौंडकर यांच्याकडे मुख्य कामगार अधिकारी, सुरक्षा सहनियंत्रक, शिक्षण प्रमुख, प्रभारी नगरसचिव, या पदांचा पदभार होता व आहे. यामध्ये या नेमणूकाही अतिशय वादातित असून यामध्ये श्री. दौंडकर यांनी काम केलेल्या प्रत्येक खात्यामध्ये श्री. दौंडकर यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. यामध्ये सुरक्षा सहनिंयत्रक व शिक्षण प्रमुख ही दोन पदे भ्रष्टाचारांच्या कृत्य व आरोपांमुळे ही पदे काढुन घेण्यात आलेली आहेत. पदभार काढुन घेतला आहे.
तसेच यामध्ये नगरसचिव या खात्यामध्ये सुनिल पारखी निवृत्त झाल्याने नगरसचिव हे पद रिक्त होते. यामध्ये प्रशासनाने हे पद भरण्यासाठी अर्ज मागविले होते. परंतु यामधील कुणीही उमेदवार पात्र नसल्याने तत्कालिन अतिरिक्त आयुक्त श्रीमती रूबल आगरवाल यांनी ही भरती रद्द करण्यात आली होती. तरीही नगरसचिव पदाच्या 30 उमेदवारांमध्ये श्री. दौंडकर हे यांनी सुद्धा अर्ज भरलेला होता. परंतु प्रशासन व दौंडकर यांची तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांची लागेबांधे असल्यामुळे दौंडकर यांना अनुभव नसल्याने व अपात्र असुनही केवळ अतिरिक्त आयुक्त व आयुक्त यांच्याशी घरोब्याच संबंध असल्यामुळे श्री. दौंडकर यांना मागील दीड वर्षांपासून प्रभारी नगरसचिव म्हणून कामकाज देण्यात आलेले असून आज रोजी ते पात्र व अनुभव नसतांनाही आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या कृपेमुळे कामकाज पाहत असल्याचे अनेकांचे मत आहे.
कामगार सल्लागार भरतीचे गौडबंगाल –
मुख्य कामगार अधिकारी व कामगार कल्याण अधिकारी,उपकामगार अधिकारी या सर्व पदभरतीत या बोगस पद्धतीने झालेल्या असून यामध्ये उपकामगार अधिकारी या भरतीमध्ये प्रभारी पदभार देण्यासाठी व 15 उपकामगार अधिकारी नेमणूकीसाठी 12/2/2016 रोजी कार्यालयीन परिपत्रक काढण्यात आले होते. त्याअगोदर श्री. राजेंद्र जगताप – तत्कालिन अतिरिक्त महापालिका आयुक्त इस्टेट, श्री. मंगेश जोशी उपआयुक्त सामान्य प्रशासन यांची समिती नेमण्यात आली होती. यामध्ये मानधन तत्वावर 281 कर्मचारी, कंत्राटी पद्धतीने 4495 कर्मचारी, व रोजंदारीवर 57 कर्मचारी अशा सर्व कर्मचाऱ्यांचा अहवाल या समितीने घेतला होता. यामध्ये ईएसआय व ईपीएफ कामगार कल्याण निधी, ओळखपत्र किंमान वेतन, सुरक्षा प्रावरणे, बिटसची संख्या, यामध्ये प्रचंड तफावत असून संबंधित प्राधिकरणाकडे भरणा केल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे 15 उपकामगार अधिकारी नेमणूक त्यांच्यामार्फत काम करून घेण्यात यावे अशी शिफारस तत्कालिन अतिरिक्त आयुक्त श्री. राजेंद्र जगताप, उपआयुक्त श्री. मंगेश जोशी, यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडून प्रस्तावावर मान्यता घेण्यात आली.
त्यानंतर श्री. शाम तारू प्रशासन अधिकारी आस्थापना, श्री. मंगेश जोशी उपायुक्त साप्रवी यांनी कार्यालयीन परिपत्रक प्रस्तुत केले. या कार्यालयीन परिपत्रकामध्ये शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, किंवा समकक्ष अर्हता आणि डिप्लोमा इन लेबर लॉ किंवा विधी शाखेच्या पदवीधरास प्राधान्य अशी अर्हता होती. यानुसार 37 अर्ज आले होते. त्यामध्ये 34 अर्ज पात्र व 3 अर्ज अपात्र ठरत असून यामध्ये पदवीधर, डीएलएल, ॲन्ड एलडब्ल्यु, एलएलबी, यांना प्राधान्य देण्यात आले होते.
दि. 2/4/2016 रोजी पत्र दिले होते. त्यानुसार कुठलेही उपकामगार अधिकारी यांची भरती करण्यात आलेली नसून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता न पाहता फक्त आर्थिक संबंध असणाऱ्यांनाच श्री. दौंडकर व श्री. नितीन केंजळे यांनी प्रभारी स्वरूपात असलेली ही भरती केलेली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ही प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांची भरती बोगस असून भ्रष्टाचारी पद्धतीने झालेली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेमध्ये भरती होण्यापूर्वी कामगारांच्या ज्या अडचणी होत्या, त्या अडचणी अजुन वाढलेल्या दिसत आहेत. या उपकामगार अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी अनेक आंदोलने उपोषणे व तक्रारी झालेल्या आहेत. परंतु आयुक्त व अति. आयुक्त यांना वेळोवेळी त्यांचा हिस्सा पोहोचत असल्याने कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. यामध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. शासन आदेशाचा भंग केला जात आहे. म्हणून आप या पक्षाचे मारे यांनी 200 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
प्रभारी उपकामगार अधिकारी असलेल्या 1) श्री. प्रविण गायकवाड 2) श्री. बुगप्पा कोळी 3) श्री. अमित चव्हाण 4) श्रीमती सुमेधा सुपेकर 5) श्री. अभिषेक जाधव 6) श्री. सुरेश दिघे 7) श्रीमती चंद्रलेखा गडाळे 8) श्री. आदर्श गायकवाड 9) श्रीमती माधवी ताठे 10) श्री. लोकेश लोहोट या 10 जणांना या पदावर पदोन्नती दयावयाची असल्याने मुख्य कामगार अधिकारी श्री. दौंडकर ,कामगार कल्याण अधिकारी श्री. नितीन केंजळे अति आयुक्त रविंद्र बिनवडे, आयुक्त विक्रम कुमार, यांनी रचलेले हे षडयंत्र असल्याची पुणे महापालिकेत जोरदार चर्चा आहे. याच प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांना पदोन्नतीने कायम करायचे असल्याने लाखदीडलाख पगार दयावयाचा असल्यानेच पदोन्नतीचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेची तपासणी करून ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी होत आहे.