
आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे महापालिकेच्या दळवी हॉस्पीटल मागे भैय्यावाडी येथे मटका जुगार अड्डे चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली असून, संबंधितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) प्रमाणे कारवाई करून आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवल्याची माहिती विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री. वसंत कुवर यांनी नॅशनल फोरम यांना लेखी पत्राव्दारे कळविले आहे.

शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे महापालिकेच्या दळवी हॉस्पीटल पाठीमागे भैय्यावाडी येथे मटका जुगार अड्डा व क्लब सुरू असल्याची बातमी ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये नॅशनल फोरम मध्ये प्रसारित केली होती. बातमीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पुणे शहर व सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग यांना अवगत करण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग श्री वसंत कुवर यांनी भैय्यवाडी येथील मटका जुगार अड्डयांवर कारवाई करून तो बंद करण्यात आलेला आहे. तसेच सध्या जागेवर मटका जुगार अड्डे चालु नसल्याचे निदर्शनास आल्याचे दि. 13 ऑक्टोंबर 2023 रोजीच्या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीमधील भैय्यावाडी येथील मटका जुगार अड्डयावर कारवाई करण्यात आलेली असून दाखल गुन्ह्यांचा तपास चालु आहे. आरोपींविरूद्ध गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्याची तपास अधिकारी यांनी तजवीज ठेवलेली असल्याचेही पत्रात नमूद केले आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील जुगाराबाबतची बातमी प्रसारित केलेली होती. त्याबाबतचा कोणताही तक्रार अर्ज नव्हता. तथापी दिलेल्या पत्रात अर्ज असल्याचे नमूद केले आहे. तथापी काहीही असले तरी जुगार अड्डा कायमचा बंद केल्याने स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.