Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

गरीबांना लुटायचे आणि गुन्हेगारांना पोसायचे… रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत आर्थिक पुर्नवसन

इन्फॉरर्मेशन टेक्नोलॉजीचा भंग करून तथाकथित सरकारमान्य लॉटऱ्यांचा धुमाकूळ

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुणे शहरात 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुमारे 12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका दाखल करण्यात आला आहे. तसेच 4 गुन्हेगार स्थानबद्ध केले असून 43 सराईत गुन्हेगारांना तडीपार करून पुणे शहरात दशहत निर्माण करणाऱ्या व सक्रिय गुन्हेगारांवर कडक प्रतिबंध कारवाई करण्याचे धोरण पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी अवलंबविले असतांना, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका सराईत गुन्हेगाराचे आर्थिक पुर्नवसन केले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात मटका जुगार अड्डयांवर कारवाया होत असल्याच्या बातम्या नियमित येत असतांना, ज्यांच्यावर कारवाई झाले ते धंदे देखील पुनः तासा/दोन तासात सुरू होत आहेत. तर नवीन पोलीस आयुक्तांच्या भीतीने बंद पडलेले अवैध मटका जुगार अड्डे देखील पुनः नव्याने सुरू झाले आहेत. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत पुणे शहर पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं आर्थिक पुर्नवसन करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. पुणे महापालिकेच्या दवाखान्याच्या जागेसह सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार अड्डे सुरू केल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. त्यातच ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली देखील इन्फॉरर्मेशन टेक्नोलॉजीचा भंग करून तथाकथित सरकारमान्य लॉटऱ्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. 

पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका सराईत गुन्हेगाराचे आर्थिक पुर्नवसन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्याजवळील जागा, भोसले जलतरण तलाव, रिक्षा, दळणी दवाखान्याच्या नाल्यातील व झोपडपट्टीत सुमारे 10 ते 12 बुकी बसवुन मटका जुगार अड्डा सुरू झाला असल्याचे समोर आले आहे. यात स्थानिक महिलांनी याबाबतची ओरड केली आहे.  भोसले तलतरण तलावाच्या आत जावुन मटका जुगार रायटर बसत असल्याची ओरड होत आहे. तर बाहेर रिक्षा मध्ये बसुन देखील मटका चिठ्ठया घेण्यासाठी गर्दी झाल्याने महिलांनी याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. 

दरम्यान पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ ऑनलाईन सरकारमान्य लॉटरीच्या नावाखाली एक आकडी मटका सुरू झाला आहे. या अवैध धंदयावर तत्कालिन सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी कठोर कारवाई करून सुमारे 155 मालक, चालक, जागा मालक, यांच्यासह खेळणारे व खेळविणाऱ्यांवर कारवाई केली होती. काही काळ बंद ठेवून हा धंदा पुनः नव्याने सुरू झाला आहे. धंदे सुरू होऊन 15/20 दिवस झाले असल्याची माहिती समोर आली आहे. 
दरम्यान या सर्व अवैध धंदयातून केवळ गरीबांना लुटून हा पैसा गुन्हेगारांना पोसण्यासाठी वापरला जात आहे असे अनेकांनी नमूद केले आहे. तसेच हेच अवैध धंदे या गुन्हेगारांना चालविण्यासाठी देण्यात आले असल्याने, पुणे शहर पोलीसांनी गुन्हेगारांवर कारवाईचा सपाटा सुरू केला असतांना, दुसरीकडे मात्र शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांचे आर्थिक पुर्नवसन केले असल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. (अधिक वृत्त नॅशनल फोरमच्या सोमवारच्या अंकात...)