Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यात भारतीच्या पोलीसांना अपयश, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांचा राडा, तुला खल्लासच करणार म्हणत डोक्यावर घातक हत्यारांनी वार केले

भारती मधील गांजा आणि हुक्क्याचा धुर, वेश्याव्यसायावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तो पर्यंत राडा थांबण्याचे नाव घेत नाहीये
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश सुपर मार्केट चालकास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करण्यात आली. तथापी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून गुन्हेगारांनी राडा घातला आहे. गुन्हेगारी टोळ्यांनी हत्यारानिशी सज्ज होवून तसेच बेकायदेशिर जमाव जमवुन, फिर्यादीस शिवीगाळ करून, तु आता गेलास, तुला खल्लासच करणार असे म्हणून त्याच्या डोक्यावर घातक शस्त्राने वार करून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजा व खिडक्यांवर लाथा व दगड मारून, पार्क करून ठेवलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यावरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत किती पराकोटीची गुन्हेगारी वाढली आहे, हे दिसून येत आहे. याला प्रामुख्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीतील गैरकायदयाचे धंदे जबाबदार असल्याचे दिसत आहे. तसेच हुक्का पार्लर व गांजाची जबरी नशा केल्यामुळे गुन्हेगारी बेभान होत आहेत. तसेच देशी विदेशी दारूसह हातभट्टीची विक्री देखील याला नशेत भर टाकत आहे. त्यामुळे या सर्व अवैध व बेकायदेशिर धंदयावर कारवाई करणे आवश्यक असतांना देखील, त्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पराकोटीची गुन्हेगारी वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.

दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद सोमवंशी व गोविंद लोखंडे गुन्हा करून फरार झाले होते. त्यांचे अस्तित्व लपवुन ठेवत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडून प्रसारित वृत्तामध्ये नमूद केले आहे. भारती मधील डिटेक्टीव्ह ब्रॅंचला देखील थांगपत्ता लागत नसल्याने, शेवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक  श्री. विनायकड गायकवाड यांनी पोलीसांच्या वेगवेगळ्या टिम तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सांगितले.  कसुन शोध घेतल्यानंतर पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना पाहिजे आरोपी 1. विनोद सोमवशं वय 20 वर्ष, रा. कात्रज, 2. गोविंद लोखंडे वय 18 वर्ष रा. कात्रज हे कोंढवा रोडवरील दांडीयाच्या कार्यक्रमाला आले असल्याची माहिती मिळाल्याने, त्यांना अटक केली आहे. 
दरम्यान भारती विद्यापीठासह संपूर्ण पुणे शहरात आजमितीस वय वर्ष 15 ते 25 वयोगटातील तरूण मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना अवैध धंदेवाल्यांकडून सहजपणे पैसे मिळत असल्यानेच गुन्हेगारी क्षेत्राकडे अधिक वळत असल्याने बेकायदेशिर धंदयावर कारवाई होणे आवश्यक ठरत आहे. परंतु भारती विद्यापीठ पोलीस अवैध धंदयावर कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. 

पुणे शहरात ड्रग माफियांवर धडाधड कारवाई करणाऱ्या विनायक गायकवाडांना, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील गांजाचा धुर, जुगाराचे अड्डे आणि वेश्याव्यवसायवर नियंत्रणही ठेवता येईना?
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील गांजा आणि अंमली पदार्थांच्या धुराचे लोट उठत आहेत. स्थानिक नागरीकांनी शेकडोंनी तक्रारी केल्या तरी मसाज पार्लरच्या माध्यमातून सुरू असलेला वेश्याव्यवसाय बंद केला जात नाहीये. त्यातच मटका अड्डे, ऑनलाईन लॉटरी जुगारासह हातभट्टी व देशी विदेशी दारूने संपूर्ण भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला विळखा घातला आहे. असे असतांना देखील सध्या कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड यांना नियंत्रण आणता आलेले नाही. त्यांच्या नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी स्थानिक मंडळ पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यानी त्यांची भेट घेवून हद्दीतील अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय व हातभट्टीवर दारूवर कठोर कारवाईची मागणी केली होती. परंतु आजही त्यावर कारवाई होत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

क्राईम युनिट मधुन बदली झाल्यानंतर, पोलीस अधिकाऱ्यांची कार्यक्षमता संपुष्टात येते काय –
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार यांनी त्यांच्या कालावधीत पुणे शहरात मोठ्या नसल्या, तरी बऱ्यापैकी कारवाया करून मटका जुगार अड्डे, वेश्याव्यवसायवर धाडी टाकुन त्यांच्यावर कारवाया केल्या होत्या. अवघ्या तीनच महिन्यात त्यांची बदली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे झाली. तथापी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वरील समस्या ह्या कायमच होत्या. परंतु विजय कुंभार यांना मात्र अवैध धंद्यावर नियंत्रण ठेवण्यात म्हणावे तेवढे यश आले नाही. त्यावेळी देखील आम्ही हाच प्रश्न विजय कुंभार यांना विचारला होता. सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत असतांना, धडाधड कारवाया करण्यात येत होत्या. परंतु पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर, त्या कारवाया व ती कार्यक्षमता कुठे नष्ट झाली असाही प्रश्न विचारला होता. आता देखील हाच कित्ता पुनः भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत गिरविला जात आहे.

विनायक गायकवाड आता का कारवाई करीत नाहीत-
विजय कुंभार यांच्या प्रमाणेच विनायक गायकवाड यांची स्थिती झाली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 मध्ये कार्यरत असतांना, मागील 10 नव्हे, तर 20 वर्षात अंमली पदार्थांवर जेवढ्या कारवाया झाल्या नव्हत्या, तेवढ्या कारवाया एकट्या विनायक गायकवाड यांनी केल्या आहेत. त्यांच्या कालावधीत एक इतिहासच घडला आहे. विनायक गायकवाड यांच्याच कालावधीत अंमली पदार्थांचे तस्कर असलेल्या नायजेरीन इसमांवर कठोर कारवाया एकट्या विनायक गायकवाड यांनी केल्या आहेत.

पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 या पदावर कार्यरत असतांना विनायक गायकवाड यांनी कोट्यवधी रुपयांच्या मेफेड्रॉन, चर्रस, गांजा यासारख्या अंमली पदार्थांवर कठोर कारवाया केल्या आहेत, त्यांच्या प्रत्येक धडक कारवाईंना आम्ही प्रसिद्धी दिली आहे. तसेच अंमली पदार्थांबाबत विनायक गायकवाड यांच्या मनांतही मोठी चिड असल्याचे दिसून आले आहे. त्याच बरोबर नवीन पिढी अंमली पदार्थाने कशी बर्बाद होत आहे हे देखील त्यांच्या अनेक मुलाखतीवरून दिसून आले आहे. एवढे उत्तुंग कार्य करणाऱ्या एका धाडसी अधिकाऱ्याची एवढ्या लवकर बदली झाल्यामुळे आम्ही देखील त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. 

आता त्यांची बदली पुण्याच्या एका कोपऱ्यातील परंतु गुन्हेगारीच्या विळख्यात असलेल्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये पदस्थापना झाली आहे. 70 लाख लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणाऱ्या किंवा बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील सहा लाख लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येत नाही असेच दुर्देवाने नमुद करावे लागत आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांची पदस्थापना झाली आहे, त्या त्या अधिकाऱ्यांना अवैध व बेकादेशिर व गैर कायदयाच्या कृत्यावर नियंत्रण मिळविण्यात नेमके अपयश का येत आहे त्याचे उत्तर शोधणे आवश्यक ठरत आहे. 

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारीवर पोलीसांना नियंत्रण का ठेवता येत नाही –
पुणे शहरातील दक्षिण भागातील शेवटचे पोलीस स्टेशन म्हणून भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचा क्रमांक लागतो. तसेच कोकणासह, सातारा, सांगली, कोल्हापुर या जिल्ह्यातून पुण्यात येणाऱ्यांचे भारती विद्यापीठ हे पुणे शहराचे प्रवेशव्दार आहे. असे असतांना, त्यावर नियंत्रण ठेवण्यात वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना अपयश का येते याचे गुढ अधिक वाढत चालले आहे.

यातून काही प्रश्न समोर येत आहेत-
1) अंमली पदार्थांसह गांजाचा धुर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनपर्यंत आला तरी कारवाई का होत नाहीये,
2) हातभट्टी आणि बेकायदेशीर देशी विदेशी दारूचा महापुर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या दारापर्यंत पोहचला तरी बेकायदेशीर ढाबे व हॉटेल मधुन अवैधरित्या विक्री करणाऱ्या दारूवर कारवाई का केली जात नाही,
3) मसाज पार्लरच्या नावाखाली, संपूर्ण भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीचा रेडलाईट एरिया करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई का केली जात नाहीये. तसेच स्थानिक व देशी विदेशी मुली व महिलांकरवी वेश्याव्यवसाय चालतो याची स्थानिक मंडळ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या तरी कारवाई का केली जात नाहीये.
4) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या समोरच चौकात ऑनलाईन लॉटरी मटका जुगार अड्डे सुरू असतांना, कारवाई का केली जात नाहीये.

असे अनेक प्रश्न आहेत. परंतु त्याचे उत्तर दिले जात नाहीये. केवळ गुन्हेगारी वाढली म्हणून मोक्का आणि स्थानबद्धतेच्या कारवाया करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांना प्रस्ताव पाठविला म्हणजे गुन्हेगारी नियंत्रणात आली असे म्हणता येणार नाही. आज बहुतांश मोक्का व स्थानबद्धतेच्या कारवाईविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात दावे दाखल होवून, संबंधित आरोपी सहिसलामत बाहेर येत आहेत. त्यामुळे आरोप निश्चिती व पुरावे यात अनेक त्रुटी राहत आहेत असा अंदाज बांधण्यात येत आहे. 

हुक्का पार्लर आणि वेश्याव्यसायावर प्रतिबंधात्मक कारवाई का नाही-
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत भारती विद्यापीठ हे शैक्षणिक संकुल आहे. तसेच इतरही लहान मोठी शैक्षणिक संकुल आहेत.शाळा महाविद्यालये आहेत. पुण्यासह देशाच्या व राज्याच्या विविध भागातून विद्यार्थी आलेले आहेत. तसेच देश विदेशातील शेकडो विद्यार्थी आहेत. त्यामुळे या भागात हुक्का पार्लर, गांजासह अंमली पदार्थाचे सेवन हे उच्च दर्जाचे समजले जात आहे. त्यात भरीस भर म्हणून मसाज पार्लरच्या नावाखाली शेकडो वेश्याव्यवसाय सेंटर चालविले जात आहेत. म्हणजे हुक्का पार्लर, गांजासह अंमली पदार्थांचे सेवन आणि त्याच बरोबरीने वेश्याव्यवसायाने या भागात जम बसविला असल्याचे दिसून येत आहे. यात काही राजकारणी देखील असू शकतात. परंतु हे सर्व बेकायदेशिर व गैरकायदयाचे व्यवसाय गुन्हेगारांकडून चालविले जात असतील यात शंकाच नाही. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरत आहे.

मोक्का, एमपीडीए, तडीपारीच्या कारवाईचा रोज आलेख वाढत असला तरी हायकोर्टातूनही तेवढेच आरोपी पुनः बाहेर येत आहेत. त्यामुळे मागील आठ महिन्यांपासून आवाज उठवित आहोत की, पुणे शहर पोलीस हे गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना झाला आहे काय तसेच पुणे शहर पोलीस गुन्हेगारीचे उदात्तिकरण करत आहेत काय असाही सवाल निर्माण होत आहे. 

श्री. विनायक गायकवाड हे अतिशय सक्षम पोलीस अधिकारी असल्याचे सर्व मिडीयाने पाहिले आहे. गुन्हेगारीचे लांगुन चालुन करणाऱ्यांपैकी ते नाहीत असेही सर्वांना ज्ञात आहे. कोंढवा येथे असतांना देखील त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे आमच्यासह सर्व मिडीया श्री. विनायक गायकवाड यांच्या पाठीशी उभा होता. एवढी मोठी उंची असतांना, त्यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत नियंत्रण ठेवता येत नाही असे म्हटल्यास, त्याचे आश्चर्य वाटण्यापेक्षा गुढ अधिक वाढत आहे. त्यामुळे योग्य ती कठोर व्हावी अशीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे.