Saturday, January 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेत अतिरिक्त व प्रभारी पदावर कार्यरत असणारे, नितीन केंजळे व राकेश विटकर यांना पोलीस अधिकाऱ्यांसारखी वर्दी व ओळखचिन्ह वापरण्याचा अधिकार आहे काय?

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेत ज्या खात्यातून पैसे मिळतील, त्या खात्यातील सेवकांच्या पात्रतेनुसार आकृतीबंधामध्ये बदल करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले जात आहेत. ज्या खात्यातुन टेंडर सिस्टिम कार्यरत आहे, त्याच खात्यात केवळ जवळच्या सेवकांच्या बदल्या व नियुक्त्या केल्या जात आहेत. पैसे देणाऱ्या सेवकांनाच अतिरिक्त पदभार व प्रभारी पदभारावर नियुक्त्या दिल्या जात आहेत. असा सर्व प्रकार आज पुणे महापालिकेच्या प्रशासकीय राजवटी सुरू असल्याची ओरड आहे. दरम्यान माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी तर उघडपणे किती पैसे घेतात याचे तक्रार अर्ज शासन दरबारी पाठविले आहेत. तसेच ज्या सेवकांना अतिरिक्त व प्रभारी पदभार दिला आहे, आज तेच सेवक कोणताही अधिकार नसतांना, तसेच भारतीय दंड विधान संहितेतील कलम 171 चा भंग करीत असतांना देखील पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार व अति. आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे त्यावर प्रतिबंध आणू शकले नाहीत. उलट पुणे महापालिकेच्या सुरक्षेशी निगडीत असलेल्या विषयांवर देखील खाऊजा धोरण ठेवून, सुरक्षा सेवा आकृतीबंधामध्ये बदल करून ते बदल शासनाच्या मंजुरीसाठी पाठविले आहेत. त्यावर डीपीसीही झाली आहे, यावरून या सर्व प्रकरणांत आयुक्त व अति. आयुक्त व संबंधित खातेप्रमुख दोषी असल्याचे आढळुन येत आहे.

नितीन केंजळे व राकेश विटकर –
पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा सेवा विभागात मुख्य सुरक्षा अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार नितीन केंजळे यांच्याकडे असून, सुरक्षा अधिकारी पदाचा प्रभारी पदभार राकेश विटकर यांचेकडे सोपविण्यात आलेला आहे. नितीन केंजळे व राकेश विटकर यांच्या पात्रता व अर्हतेनुसार, सुरक्षा सेवा विभागात आकृतीबंधात काय दुरूस्त्या पाठविल्या आहेत व पुणे महापालिकेने शासनाकडे कोणता पत्रव्यवहार केला आहे हे मागील अंक व लेखात आपण पाहिले आहेच. त्यामुळे ते इथे पुन्हा उधृत करण्याची आवश्यकता नाही. दरम्यान पुणे महापालिकेच्या आकृतीबंधातील सुरक्षा सेवा मध्ये सुरक्षा अधिकारी पदाची अर्हता नेमकी काय आहे हे पाहणे आवश्यक ठरते.

पुणे महापालिका आकृतीबंधातील सुरक्षा सेवेमधील तरतुदी –
पुणे महापालिकेच्या आकृतीबंधातील वर्ग चार मधील सुरक्षा रक्षक अर्थात सुरक्षा मदतनीस यासाठी इयत्ता 8 वी पास, मराठी लिहता व बोलता येणे आवश्यक यासह शारिरीक पात्रतेमध्ये उंची 165 से.मी. वजन 50 कि.ग्रॅम, छाती 81 से.मी व फुगवुन 86 से.मी व दृष्टी चांगली अशी पात्रतेची अट व निकष आहे.
वर्ग 3 मध्ये सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदासाठी कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर, लष्कर, निमलष्करी दलातील ज्युनिअर कमिशन अधिकारी अथवा पोलीस दलातील उपनिरीक्षक पदावरील किमान 5 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच शारिरीक पात्रते मध्ये उंची 165 से.मी. वजन 50 कि.ग्रॅम, छाती 81 से.मी व फुगवुन 86 से.मी व दृष्टी चांगली अशी पात्रतेची अट व निकष आहे.

सुरक्षा अधिकारी व मुख्य सुरक्षा अधिकारी पदासाठी सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे तसेच सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदावरील किमान 3 वर्षांचा अनुभव असणे ह्या अटी आहेत. तथापी सध्या कार्यरत असणारे नितीन केंजळे व राकेश विटकर हे लष्कर, निमलष्करी दलातील ज्युनिअर कमिशन अधिकारी अथवा पोलीस दलातील उपनिरीक्षक या पदावर काम केल्याचा कोणताही अनुभव नसतांना देखील त्यांना मुख्य सुरक्षा अधिकारी व सुरक्षा अधिकारी या पदावर पदभार देण्यात आलेला आहे. असे असतांना देखील नितीन केंजळे व राकेश विटकर हे पोलीस दलातील उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा गणवेश (वर्दी) परिधान करीत आहेत. ते कायदयाने आहेत किंवा कसे हे भारतीय दंड विधान संहितेतील खालील कलमानुसार पाहणे आवश्यक ठरते. 

दरम्यान माहितीच्या अधिकारात नितीन केंजळे व राकेश विटकर यांच्या वर्दी (गणवेश) याबाबत माहिती विचारली होती. तसेच संबंधित दोन्ही सेवक परिधान करीत असलेल्या वर्दीला शासनाकडून मंजुरी घेण्यात आली आहे किंवा कसे याबाबत देखील विचारणा केली होती. तथापी मुख्य सुरक्षा अधिकारी नितीन केंजळे यांनी काहीच उत्तर दिले नाही. माहिती अधिकाराला केराची टोपली दाखविण्याचे काम केंजळे यांनी केले आहे. 

काय आहे भादवीचे 171 कलम –
लोकसेवक वापरतो तशी वर्दी (गणवेष) किंवा तसे ओळखचिन्ह कपटी उद्देशाने परिधान करणे किंवा जवळ बाळगणे बाबत तरतुदी आहेत. यामध्ये स्वतः लोकसेवकांच्या (पोलीस, लष्कर) विवक्षित वर्गापैकी नसतांना, आपण त्या (पोलीस, लष्कर) वर्गापैकी आहोत असा समज व्हावा, या उद्देशाने किंवा तसे संभवनीय आहे याची जाणीव असते, त्या परिस्थितीत जो कोणी त्या (पोलीस, लष्कर) वर्गातील लोकसेवक वापरतात तशा सारखी वर्दी (गणवेष) परिधान करील, किंवा तशा सारखे ओळखचिन्ह जवळ बाळगील तर त्याला, तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही प्रकारची कारावासाची किंवा दोनशे रूपयापर्यंतच्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील असे नमूद आहे.

आता सांगा, नितीन केंजळे व राकेश विटकर हे लष्कर व पोलीस दलातील आहेत काय –
निजीन केंजळे हे पुणे महापालिकेत शिपाई या पदावर रुजु झाले. ( रुजु झाल्यापासूनचा सर्व इतिहास यापूर्वीच प्रसिद्ध झालेला आहे त्यामुळे पुन्हा इथे उधृत करीत नाही) राकेश विटकर हे देखील शिपाई ते उपअधीक्षक पदापर्यंत आले आहेत. त्यामुळे या दोन्ही सेवकांनी लष्कर किंवा पोलीस दलात काम केलेले नाही. असे असतांना देखील पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार व अति. आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी नितीन केंजळे यांना मुख्य सुरक्षा अधिकारी व राकेश विटकर यांना सुरक्षा अधिकारी या पदांचा अतिरिक्त व प्रभारी पदभार दिलेला आहे. तसेच बंदुका देखील दिलेल्या आहेत.
पुणे महापालिकेकडे एकुण 18 बंदुका असल्याचे समजते. परंतु बंदुका चालविण्याचे केंजळे व विटकर यांनी प्रशिक्षण घेतल्याचे कोणतेही पुरावे आजपर्यंत समोर आलेले नाहीत, मग पुणे महापालिकेच्या मालकीच्या ह्या बंदुका ह्यांना देण्याचे कारण काय आहे…. दरम्यान पुणे महापालिकेत अतिरिक्त व प्रभारी पदभार कसे देतात याबाबत पुणे महापालिकेचे तत्कालिन आयुक्त श्री. महेश झगडे यांचा नवीन व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे किती पैशांची डिलिंग होते हे नव्याने पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही.

पुणे महापालिकेतील सुरक्षा विभाग म्हणजे काळु-बाळूच्या तमाशाचा फड वाटला काय-
आपल्या पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील गाढवाच लग्न या वगनाट्याचे कर्ते व निर्माते शाहीर दादु इंदोरीकरांच्या एका वगनाट्यावर तसेच सांगली जिल्ह्याचे सुपूत्र लहु व अंकुश उर्फ काळु-बाळू यांच्या वगनाट्यावर आधारीत पुढे मराठी मध्ये दादा कोंडके यांनी पांडू हवालदार हा चित्रपट तयार केला. पांडू हवालदार हा चित्रपट त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाला. पोलीसाची कलाकृती प्रेक्षकांना एवढी आवडली की पुढे पुढे तर दादु इंदोरीकर, काळु बाळू यांच्यासह, विठाबाई भाऊराव नारायणगावकर तमाशा मंडळ, रघुविर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा मंडळ व त्या काळातील बहुतांश तमाशाच्या फडात एकतरी पोलीसांवर आधारित वगनाट्य लिहले व साकारले गेले आहे. दरम्यान आयुष्याच्या अखेरपर्यंत पोलीसांच्या वेशातील काळु-बाळूंचा फोटो हीच त्यांची ओळख झाली होती.

पुणे महापालिकेतील सुरक्षा विभागातील मुख्य सुरक्षा अधिकारी व सुरक्षा अधिकारी यांच्या गणवेशाकडे व त्यांच्या शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या कागदपत्रांवरून एक नजर मारल्यास, सहजपणे पांडू हवालदार आणि त्याही पेक्षा काळु-बाळू या जोडगोळीच्या वगनाट्याची व त्यांच्या अभिनयाची आठवण होते. पुण्यातही त्यांचे तंबुमध्ये अनेक खेळ होत होते. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. अगदी हुबेहूब ती नक्कल पुणे महापालिकेत होत आहे हे पुणेकरांचे दुर्देव म्हणावे लागेल. तसेच पुणे महापालिकेतील सुरक्षा विभाग म्हणजे काळु बाळूच्या तमाशाचा फड किंवा एखादे वगनाट्य वाटले आहे काय असाही प्रश्न निर्माण होत आहे. कोणतीही पात्रता नसतांना देखील केवळ अतिरिक्त व प्रभारी पदभाराच्या बळावर ते पोलीस अधिकाऱ्यांचा गणवेष परिधान करून मागील काही वर्ष फिरत आहेत हे विशेष.

35 चा काळ गेला, आता 50 असतील तर माझ्याकडे या, अन्यथा परत येऊ नका-
पुणे महापालिकेतील काही सेवक खातेबदलीसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या त्या कारभारी सेवकाला भेटण्यासाठी गेले होते. सुमारे सात/आठ महिन्यांपूर्वी त्या पदासाठी 35 सांगण्यात आले होते. तथापी आज त्याच पदासाठी सुमारे 50 सांगण्यात आले आहे. पन्नास असतील तरच माझ्याकडे या. नाहीतर पुन्हा माझ्याकडे येऊ नका असे त्यांना सांगण्यात आल्याचे कानावर आले आहे. त्यामुळे पदांचा बाजार किती तेजित चालला आहे हे यावरून दिसून येत आहे. महापालिका सहायक आयुक्त व उपआयुक्त पदांच्या पदोन्नतीचे व पदस्थापने दरम्यान तसेच काल परवाना पदोन्नती समिती अर्थात डीपीसी झाली आहे, त्यातही ज्यांच्यावर अनेक आरोप होते त्यांना पदोन्नती देवून पदस्थापना झाली आहे. त्यामुळे ह्या पदोन्नत्या कोणत्या गुणवत्तेच्या आधारावर झालेल्या आहेत हे पुणेकरांनी योग्य ते आकलन करून आवश्यक ठरत आहे.

यामध्ये मरण फक्त प्रामाणिकपणे सरळ काम करणाऱ्या सेवकांचे होत आहे. 1999 ते 2023 या 24 वर्षात केवळ दोनवेळा पदोन्नती मिळाली, आता वरच्या पदांवर बसण्याची वेळ आली तरी पदोन्नती दिली जात नाहीये. पाठीमागुन नोकरीत लागलेले आज वरच्या पदांवर गेले आहेत, बहुतांश कर्मचारी आज आहे त्याच पदांवर कार्यरत आहेत. 15 ते 18 वर्ष पदोन्नती नाही. थोडक्यात काय, पुणेकरांना व पुणे महापालिकेला लुटायचे आणि वरच्यांच्या पदरात नेऊन टाकायचे एवढे केल्यावरच पदोन्नती हल्ली मिळते असा अनुभवन प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पदरात पडत आहे. त्यामुळे पुणेकरांना चांगल्या सुविधा हव्या असतील तर चांगले अधिकारी असणे देखील आवश्यक आहे. आता पुणेकरांमधुनच आवाज उठणे आवश्यक ठरत आहे.