Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

गुन्हेगार आणि भांडवलदारांचा बंडगार्डन पोलीस स्टेशनवर कब्जा,
कोणत्याही क्राईम ब्रॅंचची बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारची कारवाई नाहीच…

bandgardenpolicepune

ज्यांच्या हद्दीत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा न्यायाधिश असतांना देखील पोलीस स्टेशनवर नेमका कब्जा कोणी केला आहे….

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/
पोलीस स्टेशनवर ग्रेनेडचा हल्ला… शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले आहे…शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आतंकवादयांनी निर्दयीपणे गोळीबार केला… इत्यादी.. इत्यादी बातम्या जम्मु व काश्मिरबाबत कुण्या ऐकेकाळात येत होत्या. आता मात्र सुसंस्कृत पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस स्टेशनवर गुन्हेगारांसह भांडवलदारांनी कब्जा केला आहे असे म्हटले तर आश्यर्च वाटायला नको… ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान बंडगार्डन पोलीस स्टेशनची अशी स्थिती असली तरी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात वेगवेगळ्या प्रकारच्या 25/30 गुन्हे शाखा कार्यरत असतांना, त्या क्राईम ब्रॅंचने देखील बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत घुसून कारवाई केल्याचे कधीच ऐकीवात येत नाही. त्यामुळे गुन्हेगार आणि भांडवलदरांनी पोलीस शासकीय यंत्रणेवर देखील कब्जा केला आहे की काय अशी आजची स्थिती दिसून येत आहे. खरी वस्तुस्थिती काय आहे….

जागतिक मान्यतेचे ससून हॉस्पिटल, रुबी व जहांगीर सारखे मोठी हॉस्पिटल्स, पुणे रेल्वे स्टेशन -एसटी स्टँड, जीपीओ, शासकीय मध्यवर्ती कार्यालयासह केंद्र व राज्य शासनाची महत्वाची कार्यालये, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतात त्याच बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दी सुरक्षित आहेत का असा सहज प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूला प्रचंड श्रीमंती तर दुसऱ्या बाजूला अति टोकाची गरिबी. एका बाजूला भांडवलदारांच्या उंच उंच अलिशान इमारती, टुमदार बंगले आणि दुसऱ्या बाजूला बकाल, कंगाल झोपडपट्ट्यांचा परिसर. अशा प्रकारे बंडगार्डन पोलीस स्टेशनची हद्द व कार्यक्षेत्र आहे.
 ज्यांच्या हद्दीत पुणे शहर पोलीस आयुक्त, जिल्हा न्यायाधीशांसह सर्व न्यायाधीशांची निवासस्थाने आहेत, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची निवासस्थान आहेत, त्या हद्दीत पराकोटीचा गैरकारभार सुरू असेल यावर कुणाचा सहजासहजी विश्वास बसणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, विभागीय आयुक्त पुणे विभाग, पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या उच्चतम प्रशासनिक कारभाराचा जागतिक स्तरावर उल्लेख केला जातो, त्या कार्यालयांना बदनाम करण्याचे काम बंडगार्डन पोलीस स्टेशन यांच्याकडून होत असताना, पुणे शहर पोलीस एवढे शांत कसे आहेत, असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.
बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील भांडवलदार व गुन्हेगार अशी गैरकायद्याच्या मंडळींना एकत्र करून त्याद्वारे गैरकायद्याचे कृत्य बंडगार्डन पोलीस स्टेशन यांच्याकडून होत असल्यास त्यावर सनियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक दोन, यांच्यासह सर्वच वरिष्ठ कार्यालयाची आहे. दरम्यान 24 तासातील 24 तासही... हद्दीत बेकायदेशिर व गैरकायद्याचे कृत्य होत आहे, हे माहिती असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करून आपला भाग साध्य करण्याकडे बंडगार्डन पोलिसांचा हेतू स्पष्टपणे दिसून येत आहे.
 पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत, सकाळी 11 ते दोन वाजेपर्यंत, सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशिर व गैरकारभार करण्यास पोलिसांकडून मुभा देण्यात आल्याची बाब नुकतीच उघड झालेली आहे.  एसटी स्टँड, शिंदे वाहनतळ, ससुनरस्ता, ताडीवाला रोड, पोर्टर चाळ, मोबोज, आदि भागांमध्ये अतिशय बेकायदेशीर कामे होत असल्याचे आढळून आले आहे. 
वैकुंठ व आरटीओ रस्त्यावरील धांगडधिंगा अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता 10 वी 12 वीच्या परीक्षा संपल्या आहेत. पहिली ते नववीच्या परीक्षा सुरू असतांना देखील सोमवार ते रविवार असे सातही दिवस 24 तास हैदोस सुरू असतो. नियंत्रण कक्षाला फोन केला तरी पोलीस येत नाहीत. कसे येणार... बडे घरके, बिगडयांचा पैशाचा पाऊस पडतो... त्यांना हॉटेल म्हणून परवाना आहे काय... माहिती नाही... त्यांना रेस्टोबार म्हणून मान्यता आहे काय... माहिती नाही... तो पब आहे काय... माहित नाही... त्या ठिकाणाला मान्यता तरी कोणती आहे हे एकदा बंडगार्डन पोलीसांंसह पोलीस आयुक्तांनीच जाहीर करावे असे आवाहन स्थानिक नागरीक करीत आहेत. 
थोडक्यात पुणे रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टँडवर पाकीटमारी, चोऱ्या होतात, त्यांची चौकशी कधीच होत नाही, चोर- पोलीसांच्या साठमारीत सर्वसामान्य नागरीकांचे मात्र हाल होत आहेत. वरील सर्व ठिकाणी 10 ते 12 मटक्यांचे व जुगाराचे अड्डे दरदिवशी लाखोची उड्डाणे घेत धडाधड सुरू आहेत, सोरट, पणती पाकोळी... दणादण लाखोंची लुट करून पळत आहे, लाल काळा, लाल काळा असा दरदिवशी 20 लाखांचा बाजार भरवून लुटीचा उच्चांक गाठला आहे. तरी देखील पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखांची कारवाई होत नाहीये.  हॉटेल विशेषतः लॉजेसमधुन देहविक्री जोरात सुरू आहे, तरी देखील सामाजिक सुरक्षा विभाग बंडगार्डन पोलीस स्टेशनकडे पहायला देखील तयार नाहीये. त्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला आहे की, बंडगार्डन पोलीस स्टेशनवर गुन्हेगार आणि भांडवलदारांनी कब्जा केला आहे  काय... जेणेकरून त्या दहशतीखाली असल्यामुळे पुणे शहर पोलीसांना आव्हान देणारी शेकडो प्रकरणे होत असतांना देखील बंडगार्डन पोलीस तर सोडाच परंतु गुन्हे शाखेच्या एकाही युनिट कडून कारवाई का होत नाही असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. 
लाल काळा... लाल काळा... पणती पाकोळी तातडीने बंद करण्यासह दिवसरात्र सम्राटच्या गल्लीसह वेगवेगळ्या भागात- गांजा, पन्नी व अंमली पदार्थांचे सेवन करून पडणाऱ्यांसह विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई होणे आवश्यक झाले आहे. रमाई व पंचशील चौकात सुरू असलेला पराकोटीचा घोडाबाजार पोलीसांना बंद करता आला नाही तर निदान सनियंत्रण तरी ठेवणे आवश्यक झाले आहे. 

सगळीच प्रकरणे उघडपणे मांडलेली नाहीयेत. अन्यथा नॅशनल फोरम मध्ये प्रसारित झालेली बातमी हातात घेवून अनेक पुण्या मुंबईतील टगे धंदेवाईकपणे बाजार करीत सुटतात असा अनुभव आहे. त्यामुळे बंडगार्डन पोलीसांनी कर्तव्यात कसुरी करीत असल्याबाबत वरीष्ठ व मुंबईतील अतिवरिष्ठांकडे दाद मागायला लावु नये असा सविनय दंडवत...(क्रमशः)