Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील आंबिल ओढा झोपडपट्टीच्या विकसकावर ॲट्रॉसिटी कायदयाखाली गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

पुण्यातील आंबिल ओढा national forum

पुणे/दि/ प्रतिनिधी/
भारतातील अनुसूचिज जाती आणि अनुसूचित जमाती ह्या मूळनिवासी जमाती म्हणून ओळखल्या जातात. परंतु वर्षानुवर्षे त्यांचे नैसर्गिक व न्यायिक हक्क हिरावून घेवून इथली भांडवलदारी यंत्रणा त्यांना जीवन जगु देत नाहीत. राज्यातील ग्रामीण भागात होणारा जातीय अत्याचार आणि शहरासारख्या ठिकाणी देखील पोहोचला आहे. त्यामुळे न्यायिक हक्कासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांविरूद्ध खोट्या केसेस करणे, त्यांना कायदयाव्दारे अटकाव करून त्यांच्या कर्तव्यापासून त्यांना परावृत्त करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. तथापी न्यायालयाने अनु. जाती व जमाती यांची न्यायिक बाजू लक्षात घेवून, पुण्यातील आंबिल ओढा झोपडपट्टीचे विकसक, केदार असोसिएटचे साथीदार दिलीप देशमुख व बांधकाम व्यावसायिक श्री. सूर्यकांत निकम व प्रताप निकम यांवर अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे पुणे न्यायालयाने नुकतेच आदेश दिले असल्याची माहिती उच्च न्यायालयालयीन वकील श्री. अंबादास बनसोडे यांनी येथे दिली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांविरूद्ध खोट्या केसेस करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.


याबाबतची हकीकत अशी की, मागील तीन चार वर्षांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण आंबिल ओढा परिसर पाण्याखाली गेला होता. सगळीकडे हाहाःकार माजला होता. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा गंभिर प्रश्न प्रलंबित असतांनाच, आंबिलओढा झोपडपट्टीचे विकसकाने ओढ्याचे वळण बदलुन त्याचे सरळीकरण करणे सुरू केले होते. त्यामुळेच आंबेडकर चळवळीतीळ कार्यकर्ते किशोर मनोहर कांबळे हे गेले वर्षभरापासून आंबील ओढा सरळीकरण विषयात मुंबई उच्च न्यायालय, आणि दिल्ली सर्वोच्च न्यायालयात लढत आहेत . तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील उर्वरित गरीब , दलित नागरिकांस न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
तथापी आंबील ओढा झोपडपट्टी चे विकसक केदार असोसिएट्स चे सहकारी दिलीप देशमुख यांनी किशोर कांबळे यांच्या विरोधात पैसे मागणे , कामात अडथळा आणणे , धमक्या देणे अश्या खोट्या तक्रारी दत्तवाडी पोलीस ठाण्यात केल्या होत्या . त्या विरोधात किशोर कांबळे यांनी 27 डिसेंबर 2021 रोजी दत्तवाडी पोलीस ठाणे आणि पुणे पोलीस आयुक्त अशा दोन्हीकडे दिलीप देशमुख व बिल्डर केदार असोसिएट्स चे निकम पिता पुत्र यांच्या तक्रारी करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता किशोर कांबळे यांचे अर्ज जाणिवपूर्वक दप्तरी दाखल केले.
त्यामुळे श्री. कांबळे यांनी न्यायालयात खाजगी तक्रार केल्याने दिनांक 18 जुलै 2022 रोजी जिल्हा न्यायाधीश व अप्पर सत्र न्यायाधीश पुणे श्री रामटेके कोर्ट यांनी 156(3) अन्वये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अधिनियम 2015 भारतीय दंड संहिता अन्वये दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिलीप देशमुख व बिल्डर सूर्यकांत निकम, प्रताप निकम यांच्यावर तपास करून गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले असल्याची माहिती याचिकाकर्ते श्री. किशोर कांबळे यांनी सांगितले. श्री. कांबळे यांच्या वतीने त्यांचे न्यायालयीन कामकाज ॲड. अंबादास बनसोडे आणि ॲड. आकाश साबळे यांनी पाहिले
ॲड. अंबादास बनसोडे यांनी मागील 10/12 वर्षांपासून पुण्यासह राज्यातील अनु. जाती व अनु. जमाती यांच्यावरील अत्याचारासंदर्भात अनेक न्यायालयामध्ये न्यायालयीन लढे दिले आहेत. अभ्यासपूर्ण युक्तीवादामुळे अनेक जातीयवाद्यांना कारागृहापर्यंत पोहोचविले आहे. तसेच श्री.बनसोडे यांनी या वर्गामध्ये जनजागृती होण्यासाठी कारवा या संस्थेची निर्मिती केली आहे. तसेच गुन्हा व गुन्ह्याचे स्वरूप याबाबत एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – 9975265007