Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

दिल्लतील महाराष्ट्र सदनातून सावरकर जयंतीसाठी सावित्रीमाई फुले, अहित्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविले, छगन भुजबळांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा – बाळासाहेब आंबेडकर

दिल्लतील महाराष्ट्र सदनातून सावरकर जयंतीसाठी सावित्रीमाई फुले, अहित्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविले, छगन भुजबळांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा – बाळासाहेब आंबेडकर

मुंबई/दि/ प्रतिनिधी/
छगन भुजबळ स्वतःला ओबीसीचे नेते म्हणवितात, दिल्लीतील महाराष्ट्र सदन त्यांच्याच कार्यकाळात बांधण्यात आले आहे. आज त्याच महाराष्ट्र सदनातून क्रांतिज्योति सावित्रीमाई फुले व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटविले गेले याचा निषेध म्हणून छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. 

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 29 मे रोजी पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक खासदारांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तसेंच केंद्रातल्या अनेक नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. परंतु या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र सदनातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवले होते.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात घडलेल्या त्या घटनेमुळे देशभरातून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. शिवसेने ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांनी यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर शरसंधान केले आहे. 
दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले,  राष्ट्रपतीपदावर असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना हे सरकार डावलतं.  देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला हे लोक डावलू शकतात. तिथे आहिल्याबाई होळकर किंवा सावित्रीबाई फुले यांच्यासारखी हयात नसलेली माणसं या आरएसएस  आणि भाजपाच्या खिजगणतीतच नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र सदनात घडलेला प्रकार काही नवीन नाही.

या घटनेचा निषेध म्हणून छगन भुजबळ यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. कारण महाराष्ट्र सदनात जे घडलं तो ओबीसींचा अपमान आहे. भुजबळ स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात. तसेच ज्या महाराष्ट्र सदनात हा प्रकार घडला ते सदन छगन भुजबळ यांनी बांधलं आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी भुजबळ यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा असे मत बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.