Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पोलीस आयुक्तांचे पक्षपाती धोरण…

पोलीस स्टेशन मधील शिस्तभंग करणाऱ्या वरीष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात दुजाभाव!
विशिष्ठ पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यातही पक्षपात…?

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/नॅशनल फोरम/
पुणे शहराचे सध्या कार्यरत असलेले पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता हे 1992 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते प्रतिष्ठीत अशा आयआयटी कानपूरचे विद्यार्थी आहेत. या शिवाय ते मागील 29 वर्षांपासून पोलीस सेवेत असल्याने त्यांनी आज पर्यंत गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर आजपर्यंत मोक्काच्या 86 व एमपीडीए खाली 72 गुन्हेगारांना स्थानद्ध केले आहे. तसेच गुन्हे रोखणे, प्रतिबंध करणे आणि ते उघडकीस आणण्यासाठी फ्रंटलाईन पोलिसिंग, कम्युनिटी एगेजमेंट, सर्वसमावेश तपास आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करून गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचे काम केले असले तरी शहर पोलीस दलात सध्या कारवाई बाबत दुजाभाव असल्याचे दिसून आले आहे. पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 व 5 मधील पोलीस स्टेशन मधील गुन्हेगारी, अवैध व बेकायदेशिर कृत्यांकडे डोळेझाक करण्यात आली. परिमंडळ 2 व 4 मधील पोलीस स्टेशन मधील हद्दीत अंशतः कारवाई तर परिमंडळ क्रमांक 1 मधील पोलीस स्टेशन हद्दीत कारवाईचा भडीमार केला असला तरी कारवाईच्या प्रस्तावावर कार्यवाही लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. त्यामुळे हा पक्षापात नजरेत भरण्यासारखा असल्याचे दिसून येत आहे.

पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 3 व 5 यांचे लाड कशासाठी …
कायदयापुढे सर्व नागरीक समान असल्याचे आपले भारतीय संविधान सांगते. तसेच शासकीय सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकार व कर्तव्यानुसार समान वागणूक देणे नागरी सेवा नियमानुसार बंधनकारक आहे. असे असतांना देखील काही पोलीस अधिकाऱ्यांना सवलतचे धोरण असल्याचे दिसून येते. उदाहरणच दयायचे तर पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा यांच्याकडील सहाय्यक पोलस आयुक्त गुन्हे 1 यांच्याकडील युनिट क्र. 1, 2 व 3 व सपोआ दोन कडील गुन्हे युनिट 4 व 5 तसेच सामाजिक सुरक्षा विभाग, अंमली पदार्थ यांच्याकडून काही विशिष्ठ पोलीस उपआयुक्तांच्या कार्यक्षेत्रात रट्टावून कारवाई केली जात असून, काही ठिकाणी मात्र काहीच कारवाई होत नसल्याचे दिसते.
सहायक पोलीस आयुक्त 1 व 2 यांच्याकडील युनिट्सनी परिमंडळ क्र 3 व 5 मध्ये मागील दोन वर्षात गुन्हेगार व बेकायदा कृत्य करणारे जुगार अड्डे, क्लब, अंमली पदार्थ, देशी विदेशी दारूची तस्करी, आर्म ॲक्ट नुसार केलेल्या कारवाया अगदीच नगण्य असून इतर पोलीस उपायुक्तांच्या हद्दीत मात्र जबरीने कारवाया केल्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 3 व क्र. 5 यांच्या हद्दीतील पोलीस स्टेशवर एवढी मेहेरबानी कशासाठी केली आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 3 व 5 यांनी गुन्हेगारांवर कारवाईसाठी व इतर प्रकारच्या टपाल प्रस्तांवर तातडीने कार्यवाही होत असल्याचे समजते. मग हा नियम इतर पोलीसांना का नाही होत हे कोडेच आहे.
पोलस उपआयुक्त परिमंडळ क्र. 2 व 4 हद्दीत अंशतः कारवाई
पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 2 मधील सहकारनगर व कोरेगाव पार्क तर पोलीस परिमंडळ क्र. 4 मधील विश्रांतवाडी, चंदननगर, विमानतळ येथे अंशतः कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडील प्रसारित वृत्तांवरून दिसून येते. पोलीस परिमंडळ 2 व 4 मधील पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी आणि पोलीस अधिकारी किती गुणवंत आहेत हे आता याच बातमीच नमूद करणं शक्य नसलं तरी त्यांच्या गुणांचा पाढा आणि पोवाडा गायल्यास सत्य समोर येईल. पोलीस स्टेशनकडून गुन्हेगारांवर कारवाई किती होते हा संशोधनाचा भाग असला तरी गुन्हे युनिटस, सामाजिक सुरक्षा विभाग, अंमली पदार्थ विभागाच्या कारवाया देखील संशयास्पद असल्याचे जाणवते. दरम्यान महामहिम, हुजूरांच्या सेवेसी, ऑनरेबल, मायलॉर्ड, अशा प्रकारचे आमच्या काळात वापरण्यात येणारे आदरयुक्त शब्दप्रयोग सर्वोच्च न्यायालयाच्या निदेशानुसार आता कालबाह्य झाले असले तरी याच्यापेक्षा अधिक आदरयुक्त कोणते शब्द आहेत त्याच्या शोधात सध्या मीच आहे. म्हणजे, त्या आदरयुक्त शब्दांव्दारे वाचकांसमोर यांच्या कार्यांचा आणि कृत्याचा पाढा सादर करता आला असता.
पोलीस परिमंडळ 1 वर कारवाईचा भडीमार पण कारवाईविना कित्येक फाईल्स प्रतिक्षाधीन….
पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 चे कार्यालय मध्यवर्ती पुणे शहरात आहे. घनदाट लोकवस्ती व पेशवेकालीन वाड्यांचा परिसर. अगदी जुन्या जिल्हापरिषद चौकापासून चालत गेलं तरी तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिरून आल्याचे भाग्य लाभते. शनिवारवाडा, कसबा गणपती, जोगेश्वरी, महात्मा फुले मंडई, अप्पा बळवंत सॉरी अेबीसी चौक, श्रीमंत दगडूशेठ गणपती, मंडई शारदा गणेश मंदिर,भोअरी आळी त्यातही रेडलाईट एरियासह सुकट- बोंबील मार्केट, लक्ष्मीरोडचा कपडा बाजार, सोन्या मारूतीची ज्वेलरी, हे सगळं… संगळं…. पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. एक यांच्या कार्यक्षेत्रात येतं. इथला व्यापार उदीम सुरळीत असला तरी जुन्या काळातील गुन्हेगार आजही आहेतच. गुन्हेगार आता थकले असले तरी वळवळ काही थांबत नाही.
दोन सहायक पोलीस आयुक्त आणि सहा पोलीस स्टेशन चा कारभार तसा हेवी/ अजवड आहेच. परंतु पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखांनी सहाही पोलीस स्टेशन हद्दीत कारवाया केल्या आहेत. दरम्यान समर्थ मधील सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई फेक स्वरूपाची असल्याची चर्चा असली तरी कारवाया रट्टावून केल्या आहेत. आता या गुन्हेगारांवर कारवाईसाठी कित्येक फाईल्स पोलीस आयुक्त कार्यालयात पाठविल्या असल्या तरी कारवाईचे आदेश प्रतिक्षेत असल्याचे समजते. मध्यवर्ती पुणे शहरावर पोलीस आयुक्तालयाचा आघात न समजण्यासारखा आहे.
समर्थ पोलीस स्टेशवर सडकून कारवाई
समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत बहुतांश रूग्णालये, आरामकक्ष आणि खाऊ गल्ली आहेत. जुने वाडे संस्कृती पूर्णतः लोप पावली असली तरी त्याच्या पाऊलखुणा आजही दिसतात. याच समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत एका जुगार अड्डयावर एसएस सेलने बनावट स्वरूपाची कारवाई झाली असल्याचे अनेक तक्रार करीत आहेत. स्थानिक पोलीसांचेही तेच मत असल्याचे समजले आहे. त्यामुळे शहर पोलीस आणि स्थानिक पोलीसात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातही वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली केल्याने पोलीसांसह नागरीकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. बनावट कारवाई आणि पोलीसांच्या बदल्या हा न सजण्यासारखा प्रकार झाला असल्याची चर्चा होत आहेत.
अंतर्गत बदल्याच्या फेऱ्यात –
ज्या पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शाखेच्या दोन वेळा कारवाया होतील त्या पोलीस स्टेशन मधील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील, या शिवाय ज्या पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्डयांवर दोन वेळा कारवाई करण्यात येईल त्या जुगार अड्डा मालकांवर तडीपारीची कारवाई करण्यात येईल असे पोलीस आयुक्तांच्या बैठकीत ठरले असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्याच नियमानुसार समर्थ पोलीस स्टेशनवर कारवाई केली, त्याच नियमानुसार स्वारगेट,कोरेगाव पार्क, चतुःश्रृंगी,खडकी, येरवडा,कोंढवा, मुंढवा पोलीसांवर कारवाई होणे अपेक्षित असतांना, ती कारवाई संस्थगित का ठेवली आहे. स्वारगेट – मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांना विशेष सवलती कशासाठी हा प्रश्न देखील अनुत्तरीत आहे. अंतर्गत बदल्या हा नियमित सेवेचा भाग आहे. कारवाईचे सुत्र समान असणे आवश्यक आहे. एवढी मेहेरबानी या पोलीस स्टेशनवर कशासाठी होत आहे याचे उत्तर आता काही दिवसातच पोलीस आयुक्तालाने देणे अपेक्षित आहे.
थोडक्यात सध्या पुणे शहर पोलीस दलात संभ्रमाचे वातावरण आहे. नागरीकांत भय भिती आहे. गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे. मग कारवाईस्तव पाठविलेल्या फाईल्सवर निर्णय देखील तातडीने होणे अपेक्षित आहे. दोन दोन महिने प्रस्ताव पडून असतील तर दाद मागायची कुठे याचेही उत्तर अजून सापडलेले नाहीये.नागरीक, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीसांच्या भावनाही पोलीस आयुक्तालयाने समजुन घ्याव्यात एवढीच माफक अपेक्षा.
पोलीसांच्या घराचा प्रश्न, मुलांचा शाळा प्रवेश, पीएफ आणि पेन्शन साठी ट्रेझरीच्या छळाचा प्रश्न, महिला पोलीसांच्या ड्युट्या, सुट्टया, अशा लहान सहान प्रश्नांनी डोकेदुखी वाढवली आहे. शासन, सार्वजनिक बांधकाम आणि महसुल विभागाशी चर्चा करून डोकेदुखीचे विषय सोडविता आले तरी या पोलीस आयुक्तांचे आभार मानावे तेवढे कमीच होतील अशाही अपेक्षा व्यक्त होतांना दिसत आहेत.
पोलीस आयुक्तालयाकडून कारवाई करण्यात….

  • पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 व 5 यांचे लाड कशासाठी
  • परिमंडळ 2 व 4 वर अंतशः कारवाई
  • परिमंडळ 1 वर कारवाईचा भडीमार पण कारवाईविना कित्येक फाईल्स प्रतिक्षाधीन….
  • समर्थवर सडकून कारवाई, मग – स्वारगेट, कोरेगाव पार्क, चतुःश्रृंगी,खडकी, येरवडा,कोंढवा, मुंढवा पोलीसांवर विशेष सवलती कशासाठी..?अंतर्गत बदल्यांचा मुहूर्त कधी
  • सवलतीच्या दरात ढवाळ जेवणाच्या पंक्तीच्या पंक्ती का उठत आहेत…!

समर्थवर सडकून कारवाई, – स्वारगेट, कोरेगाव पार्क, चतुःश्रृंगी,खडकी, येरवडा,कोंढवा, मुंढवा पोलीस कारवाईसाठी कोणता मुर्हूत योग्य आहे…