नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
फरासखाना हद्दीतील कुंटणखान्याला 300 वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळे आक्षेप हे निःशब्द होणे स्वाभाविक आहे. कोरेगाव पार्क पोलीस हद्दीत जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र असल्याने सेक्स टुरिझम ही संकल्पना येथे रुजली गेली आहे. इथपर्यंत सगळं ठिक होत. परंतु मुंढवा पोलीस, विमानतळ पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील देहविक्रीच्या जंजाळाचे रहस्य अजुन उलगडत नाही. जागो जाग मसाज पार्लर आणि स्पाच्या नावाखाली उघडपणे देहविक्री सुरू आहे. यात देश विदेशातील मुली व महिलांसह स्थानिक मुलींचा वापर करण्यात येत आहे. कायदयाने कुठल्याही प्रकारची देहविक्री दंडनिय अपराध ठरविण्यात आलेला आहे. तरी देखील भारती विद्यापीठासह इतर पोलीस स्टेशन कारवाई का करीत नाहीत. दरम्यान आम्हाला जो पर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत, तो पर्यंत आम्ही कारवाई करू शकत नाही अशीही पंक्ती हल्ली जोडण्यात येत आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्यावर वर आणखी कोण मोठे वरीष्ठ आहेत असाही सवाल विचारला जात आहे.
शेकडो अर्ज तरी कारवाईच्या नावाने अर्जांची शेकोटी –
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला, त्या त्या दिवशी स्थानिक मंडळे, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळी निवेदने देवून, भारती विद्यापीठ हद्दीतील मसाज पार्लर व स्पा बंद करण्याबाबत विनंतीवजा निवेदने दिली आहेत. आत्ता कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे पाचवे अधिकारी असतील. त्यांनाही त्यांच्या पदग्रहणादिवशी अनेक संस्था, राजकीय पक्षांनी निवेदने दिली. आज एक वर्ष झाले तरी कारवाईच्या नावाने शिमगा आहे. राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी दिलेल्या शेकडो अर्जांची शेकोटी केली जाते काय असाही सवाल आज या संस्था विचारत आहेत.
पुणे शहर प्रवेशव्दारावर हातभट्टीसह जुगाराचे ग्रहण-
पुणे शहराची हद्द वाढली आहे. तरी देखील पुण्याच्या दक्षिणेकडून शहरात प्रवेश करण्याचे प्रवेशव्दार म्हणजे कात्रज आहे. कात्रज चौकातील भयावह गर्दी आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा हे रोजचे झाले आहे. खाजगी प्रवासी वाहने बेधडकपणे वाहन चालवितात, प्रवासी भरतात व प्रवासी उतरत असतात अशी आजची परिस्थिती आहे. रिक्षाचालकांची दादागिरी हे तर रोजचेच झाले आहे. त्यातच मटका, ऑनलाईन लॉटरीची दुकाने देखील भर कात्रजच्या प्रवेशव्दारावर असल्याने जुगारड्यांचा मेळा जमलेला असता. बाजुलाच गावठाणात व वरच्या दिशेला, हातभट्टी मिळत असल्याने माल्टापंटर रस्त्यावर लेझीम खेळत झिंगत असतात. वाहन चालवितांना, चालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. सुदैवाने, चौकातील देशी विदेशी दारूचा गुत्ता दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत केला आहे. नाहीतर भररस्त्यावरच एकाच वेळी पाच पन्नास मंडळी बार समजुन दारू ढोसत असल्याचे अनेक वर्ष दिसत होते. त्यातच पीएमपीएमलचा डेपो असल्याने गर्दीत आणखीन भरत पडत आहे. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात भारती विद्यापीठ पोलीसांना सपशेल अपशय आले आहे.
हुक्का… तरूणांचे आयुष्य संपवित आहे-
वाढते नागरीकरण, त्यातही भारती विद्यापीठ सारखे मोठे शैक्षणिक संकुल असल्याने, देश विदेशातील विद्यार्थ्यांचा राबता असतो. पैसे खर्च करणारे व चंगळवादी विद्यार्थी देखील येथे कमी नाहीत. त्यामुळे भारती विद्यापीठ हद्दीत हुक्का पार्लर मोठ्या संख्येने सुरू आहेत. हुक्का म्हणजे केवळ नशा… नशेसाठीच हुक्कापार्लरमध्ये आलेले असतात. हुक्का हा देखील नशिला अंमली पदार्थ आहे. गांजा, एमडीने जेवढी नशा येते तेवढीच नशा हुक्का पार्लरने येते. दरम्यान त्यांचे अनुकरण आज स्थानिक तरूण मुले देखील करू लागली आहेत. संडे असो की बर्थ डे शाळा व महाविद्यालयीन तरूणांचे पाय या हुक्का पार्लरकडे वळू लागले आहेत. निदान या तरूण पिढीला वाचविण्यासाठी तरी किमान हे बंद करा, बंद करता आले नाही तर निदान पोलीस नियंत्रण तरी ठेवा अशीही मागणी होत आहे.
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या हजेरीत भारतीची दयनिय स्थिती –
अनेक काळानंतर भारती विदयापीठ पोलीस स्टेशनला एक कर्तव्यदक्ष व जबाबदार वरीष्ठ पोलीस अधिकारी मिळालेले आहेत. मागील दोन वर्षात पुणे शहरातील अंमलीपदार्थ विरोधी कारवाईचा कर्दनकाळ म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. त्यांचा दरार व नाव आजही आहे. त्यांच्या बदलीनंतर, अंमली पदार्थ विरोधी विभाग अपंग झाला आहे. विशेषः त्यांच्या बदलीनंतर पुणे शहरात कुठेही मोठी कारवाई नाही. कर्तव्यदक्ष, हरजबाबी अधिकारी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशला मिळाले असले तरी कार्यवाही करणारी यंत्रणाच स्थुल असेल तर कार्यालयाचा गाडा हाकायचा तरी कसा हा एक अंतर्गत व गुप्त प्रश्न अनुत्तरी राहतो. त्यासाठी वरिष्ठांनी, वरिष्ठांसारखा बडगा उगारायला हवा असे एकंदरीत तेथील परिस्थितीवरून दिसून येते. राजकीय हस्तक्षेप आणि चौपाटी बहाद्दरांनी केलेल्या कागाळ्यांना वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.