मुंबई/दि/ प्रतिनिधी/national forum
भाजप ओबीसींना स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतेय पण, ओबीसींना मंडल कमिशनद्वारे 27 टक्के आरक्षण लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान वी.पी. सिंग यांचा जयघोष करायला ते का तयार नाहीत? हे आश्चर्यकारक आहे. असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विट करत भाजपा-आरएसएसवर हल्लाबोल केला.
पुढे ते म्हणाले की, माजी पंतप्रधान वी.पी. सिंगांनी भाजपला आजार म्हटले होते म्हणून ते असं करीत आहेत का? की भाजप देशाच्या स्थैऱ्याला सर्वात मोठा धोका आहे असं म्हटलं म्हणून? की वी. पी. सिंगांच्या कार्यकाळात आडवाणी आणि त्यांच्या गुंडांना अडवून अटक करण्यात आली होती म्हणून भाजपा त्यांचा उल्लेख टाळते आहे असा रोकडा सवाल ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजपला विचारला आहे.
पुढे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये ओबीसींना आवाहन करत असे म्हटले आहे की, “माझ्या ओबीसी बंधू आणि भगिनींनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारा की मंडल कमिशनमुळे ओबीसींना झालेला तीन दशकांचा लाभ खाजगीकरण आणि आरक्षणाशी खेळ करून भाजप-आरएसएस धुळीस का मिळवत आहे? ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेला भाजप-आरएसएस एवढी का घाबरते? एवढा विरोध का करते?
भाजप-आरएसएसला ओबीसींना राजकीय आरक्षण का द्यायचे नाही? हे कसलं ओबीसी प्रेम आहे? ट्विटरवर असे थेट आणि बोचणारे प्रश्न विचारून त्यांनी भाजपा-आरएसएसवर हल्लाबोल केला.
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या ट्विट मुळे भाजपची गोची झाल्याचे बोलले जात असून यावर भाजप कडून काय उत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर मात्र ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या ट्विट मुळे भाजपच्या ओबीसी धोरणावर टीका होताना दिसत आहे.