Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी धक्कादायक घटना सुसंस्कृत पुण्यात, पतीसमोरच पत्नीवर खाजगी सावकाराचा बलात्कार

खाजगी सावकारी आणि अवैध धंदयातील पोलीसांच्या भागीदारीमुळेच पुणे शहरात गुन्हेगारी वाढली
सराईत गुन्हेगाराने पुण्यातील खडकीसह शिवाजीनगर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस भागीदारीत मटका जुगाराचे अड्डे सुरू केले….

नॅशनल फोरम/ पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
खाजगी सावकारी आणि मटका,जुगार अड्ड्यातील पोलीसांच्या भागीदारीमुळे पुणे शहरातील गुन्हेगारी अधिक वाढली आहे. खाजगी सावकारी, कंपनी सावकारी आणि त्याच बरोबरीने पुणे शहरात सुरू असलेले मटका, जुगार अड्डे, रमीचे क्लब यामध्ये पोलीसांची भागीदारी असल्यानेच पुणे शहरात गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. गुन्हेगारांनी याच्याही पुढे एक पाऊल टाकत, पोलीसांना मारहाण करणे, पोलीस स्टेशनसह, पोलीस वसाहतीत चोरीचे प्रकार घडत आहेत.त्यातच आता पुणे शहरात बांग्लादेशी नागरीक बेकायदा वास्तव्य करीत असल्याची बाब समोर आली आहेच. शिवाय पुणे शहरात दहशतवादयांनी आश्रय घेतल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता खाजगी सावकारीने डोके वर काढले आहे. मागील एक वर्षापासून आम्ही नॅशनल फोरम मधुन खाजगी सावकारी बाबत आवाज उठवित आहोत. परंतु तक्रार आली नाही म्हणून कारवाई नाही असे उत्तर देत आहेत. त्यामुळे पुणे शहरात खाजगी सावकारी करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करून पुणे शहरातील सर्व मटका जुगार अड्डे तातडीने बंद होणे आवश्यक आहे. याबाबतही नॅशनल फोरम मधुन मागील काही महिन्यांपासून आवाज उठविला जात आहे. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नॅशनल फोरम मधील बातमीची दखल घेतली असून, पुण्याचे आमदार श्री. रविंद्र धंगेकर यांनी पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत भाष्य करून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.

हडपसरमध्ये खाजगी सावकाराचा उच्छाद –
खाजगी सावकाराने हातउसने घेतलेले 40 हजार रुपये परत न दिल्याने, त्या व्यक्तीला समोर बसवून त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. एवढच नाही तर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार करुन हा व्हिडीओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केला. पुण्यातील हडपसर परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये ही घटना घडली होती. 34 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय 47 वर्षे) याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले हे पैसे फिर्यादीचा पती परत करु शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. सोबतच तक्रारदार महिलेसोबत पतीसमोरच जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.

पुन्हा शरिर संबंधाची मागणी, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर महिलेची पोलिसात धाव-
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आरोपीने मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र महिलेने नकार दिल्याने आरोपीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केला. यानंतर महिलेने हडपसर पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी इम्तियाज हसीन शेखला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पुण्यातील वाढती गुन्हेगारी –
पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी मागील महिनाभरात पोलीसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. हजारोनी गुन्हेगार चेक करण्यात आले, त्यानंतर अनेक गुन्हेगारांवर कारवाई झाली. काही जणांवर मकोका लावण्यात आला. एमपीडीएच्या कारवाया करण्यात आल्या. त्यातच मध्येच कोयता गँग डोके वर काढत असते. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी काही पोलीसांचे निलंबन केले तर काहींना समज देण्यात आली आहे. असे असतांना देखील पुणे शहरात गुन्हेगारी अटोक्यात येत नसल्याचे या घटनेने दिसून आले आहे.

सराईत गुन्हेगाराने पुण्यातील खडकीसह शिवाजीनगर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस भागीदारीत मटका जुगाराचे अड्डे सुरू केले…
पुण्यातील वाढती गुन्हेगारी, विदेशी नागरीकांचे वास्तव्य, दहशतवाद्यांचा आश्रय, खाजगी सावकारी, वाढते मटका जुगार अड्डे यामुळे पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान पुणे शहरातील एका सराईत गुन्हेगाराने खडकी पोलीस स्टेशनसह आता विश्रांतवाडी येथील शांतीनगर तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भैय्यावाडी येथे मटका जुगार अड्डे सुरू केले असल्याचे समोर आले आहे. संबधित गुन्हेगारावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. तथापी पोलीसांच्या सहकार्यामुळे एक सराईत गुन्हेगाराने संपूर्ण पुणे शहरात हातपाय पसरायला सुरूवात केली असल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांपासून पोलीस नियंत्रण कक्ष आणि पोलीस आयुक्त कार्यालयास कळवुन देखील कारवाई होत नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 यांच्या हद्दीतील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील अवैध मटका जुगार अड्डा तातडीने बंद करून, खडकी व विश्रांतवाडीतील पोलीस भागीदारीतील अवैध मटका जुगार अड्डे बंद करण्याची मागणी होत आहे.(क्रमशः अधिक वृत्त सोमवारच्या अंकात)