- पुणे शहरात पोलीस- गुन्हेगारांचे समांतर आर्थिक प्रशासन चालविले जात आहे काय….
- पुण्याचे पालकमंत्रीपद अजितदादांकडे आल्यानंतर, समांतर प्रशासन यंत्रणा मोडून काढली जाईल काय…
- इजी मनीचे आर्थिक सोर्स असलेल्या मटका जुगार अड्डे, खाजगी सावकारी, अंमली पदार्थांवर जबरी कारवाई हाच एक मार्ग
- खात्याचे मुखबिर पळुन गेले आहेत…की सक्तीच्या रजेवर
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्याच्या पालकमंत्रीपदी पुनः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांची वर्णी लागली आहे. दरम्यान कोरोना महामारी लॉकडाऊन पासून पुणे शहरात कोयता गँगची दहशत निर्माण झाली, त्यानंतर झपाट्याने गुन्हेगारी वाढत चालली आहे. तत्कालिन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे कार्यकाळापासून मोक्का व एमपीडीए खाली किती गुन्हेगारांवर कारवाई केली, त्याची आकडेवारी जाहीर केली जात आहे. त्यात गुन्हेगारांवर चाप बसण्याऐवजी गुन्हेगारी अधिक वाढत असल्याचे शिवाजीनगर न्यायालयातील गर्दीवरून दिसून येत आहे. पुणे शहर पोलीस हे गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय… असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आकडेवारी जाहीर केल्याने, गुन्हेगारांवर जरब बसण्याऐवजी त्यात वाढत होत असल्याने हे गुन्हेगारीचे उदात्तीकरण आहे काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच आज शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील तोबा गर्दी, ड्रग माफियाचे पलायन, स्वारगेट येथील अंडरवर्ल्डच्या नावाने सुरू असलेला जुगाराच्या क्लबची खबर पोलीस नियंत्रण कक्षासह पोलीस आयुक्त कार्यालयास कळवुन देखील आजपर्यंत कारवाई न झाल्यामुळे हे धंदे आजही सुरू आहेत. त्यामुळे पुणे शहरात पोलीस – गुन्हेगारांचे समांतर आर्थिक प्रशासन सुरू आहे काय असाही पुनः तिसरा प्रश्न निर्माण झाला आहे. अजितदादा पवार यांच्या नवनियुक्तीनंतर, पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आता कोणते निर्णय घेतले जाणार हा देखील एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होत आहे.
पुणे शहराचे भयाण वास्तव – मला आमदार झाल्या सारखं वाटतय….
पुणे शहरात किती भयानक स्वरूपाची गुन्हेगारी वाढली आहे त्याचे चित्र आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोंबर 2023 रोजी दिसून आले आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात तशी नेहमीची गर्दी असते. परंतु आज तोबा गर्दी झाली होती. पोलीस पिंजऱ्यातील वाहनांमध्ये आरोपी, गुन्हेगार, खचाखच भरले होते. एकाच वेळी तीन ते चार वाहनातून आरोपी गुन्हेगार उतरवून न्यायालयात हजर केले जात होते. न्यायालयातून पुन्हा त्यांना पिंजऱ्याच्या पोलीस वाहनात बसवले जात होते. परंतु आरोपी घेऊन जाताना व पुन्हा न्यायालयातून आणताना त्यांच्या समर्थकांची तोबा गर्दी झाली होती. असं वाटत होतं की हे एखादं परीक्षा केंद्र आहे, परीक्षा केंद्राच्या बाहेर जशी विद्यार्थ्यांची तुंबळ गर्दी झालेली असते किंवा शाळा महाविद्यालयातील प्रवेश घेताना जशी गर्दी झालेली असते तशी तोबा गर्दी आज शिवाजीनगर न्यायालय दिसून आली. ओठावर मिसरूड न फुटलेल्या मुलांपासून ते खाता पिता गबरू ढबरू दिसत असलेल्या युवकांची संख्या लक्षणीय दिसत होती. पोलीस पिंजऱ्यातून जेवढे कैदी, आरोपी, गुन्हेगार पोलीस घेऊन जात होते, त्याच्या 50 पट गर्दी या समर्थक मुलांची दिसून येत होती. कोर्टात घेऊन जात असताना किंवा पोलीस पिंजऱ्यातून वाहनात बसलेले असताना त्यांच्या समर्थक मुलांचे (भलत्याच आनंदाने) हातवारे पाहून असे वाटत होते की, पोलीस पिंजऱ्यामध्ये हे कुणी आरोपी, गुन्हेगार, कैदी नसून हे कुणीतरी प्रतिष्ठित आहेत की काय किंवा आमदार, खासदार, मंत्री आहेत की काय किंवा फिल्मस्टार आहेत असा भास होत होता. पिंजऱ्यातील आरोपींपैकी काहींचे चेहरे तर… मला आमदार झाल्यासारखं वाटतय असेच अविर्भाव दिसत होते.
तोडांत गुटख्याचा तोबरा- आणि टपोरी वर्तन-
आज आमदार, खासदार, मंत्र्यांच्या भाषणाला, कार्यक्रमाला जेवढी गर्दी होत नसेल तेवढी गर्दी आज शिवाजीनगर न्यायालय दिसून आली आहे. काही काळ असेही वाटले की शिवाजीनगर न्यायालयाने त्यांच्याकडील काही भाग कॉलेज साठी दिला आहे की काय, की कॉलेजमधील ॲडमिशनची गर्दी आहे की काय किंवा एखाद्या माध्यमिक शाळेसाठी शिवाजीनगर न्यायालयाने त्यांच्याकडील शिलकीची जागा एखादया शाळा कॉलेजला भाड्याने दिली आहे की काय असा भास होत होता. दरम्यान अंगावरील टपोरी स्वरूपाचे कपडे, त्याच स्वरूपाची केशभूषा, तोंडात गुटरख्याचा तोबरा, भाई म्हणून त्या स्टाईलने हातवारे करणे, यावरून हे कुठल्याही शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गर्दी नसून आरोपी, कैदी, गुन्हेगारांचे समर्थक असलेले गुन्हेगारच असल्याचे दिसून आले.
पोलीस पिंजऱ्यात आता जेवढे आरोपी, त्याच्या पेक्षा पाच पट बंदोबस्तासाठी पोलीस हवेत-
पोलीस आरोपी, कैदी, गुन्हेगारांना न्यायालयात घेऊन येत असताना त्यांची संख्या वाहनात बसेल इतकी मोजकी असते. परंतु समर्थकांची संख्या प्रचंड मोठी होत चालली आहे. त्यामुळे इथून पुढे जेवढे आरोपी, गुन्हेगार, कैदी असतील त्याच्या दहापट पोलीस या पोलीस वाहना सोबत देणं काळाची गरज ठरत आहे. पुणे शहर हळूहळू कासव गतीने गुन्हेगारांचे शहर म्हणून नावलौकिक मिळवत असताना, आज शिवाजीनगर न्यायालयातील पोलिसांनी आणलेले आरोपी, गुन्हेगार, कैदी व त्यांच्या समर्थकांना पाहून पुणे शहरातील गुन्हेगारी ही कासव गतीने नाही तर सशाच्या वेगाने सुरू आहे.
पुणे शहर हे 2030 पर्यंत गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जाईल का –
पुणे शहर व शहरातील अशीच परिस्थिती राहिल्यास 2030 सालापर्यंत पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर किंवा गुन्हेगारांच्या अमंलाखाली असलेले शहर म्हणून नावलौकिक मिळवायला त्यात पुण्याचा उणेपणा राहिला नाही असेच दिसून येत आहे. पोलीस कायद्याची अंमलबजावणी करीत आहेत असं एकंदरीत दिसून येत आहे. परंतु कायद्याची, पोलिसांची जरब नागरिकांवर का बसत नाही हा एक माझ्या दृष्टीने संशोधनाचा आणि अन्वेषणाचा भाग झाला आहे.
गुन्हेगारीचे उदात्तीकरण-
पुणे शहर पोलिसांकडून गुन्हेगारीचे उदत्तीकरण होत आहे का, पुणे शहर पोलीस हे गुन्हेगार तयार करणारा कारखाना आहे का असेही प्रश्न निर्माण होत आहेत. पुण्यातील मागील आठवड्यातील गुन्हेगारीच्या घटना पाहता, ससून सारख्या शासकीय रुग्णालयात येरवडा कारागृहातील कैदी कसे व कुठल्या प्रकारचे उपचार घेत आहेत, त्याच्या दैनंदिन बातम्या प्रसारित होत आहेत. त्यांचा हा आदर्श इतर नवीन तयार होणारे गुन्हेगार घेत आहेत का, ससून रुग्णालयातून ड्रगचा अर्थात अंमली पदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्याच्यातील मुख्य आरोपी पळून गेला, अशा बातम्या प्रसारित झाल्या आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने संबंधित ड्रग माफिया पळून नव्हे, तर ससून रुग्णालयाजवळून चालत… चालत… गेला असल्याचे सीसीटीव्ही फुटेज काही खाजगी वृत्तवाहिन्याने प्रसारित केले आहे.
स्वारगेट पोलीस स्टेशन मधील अंडरवर्ल्ड कामगिरी-
याच बरोबरीने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनचे मोबाईल स्टेटस ठेवून, लाईन बॉय म्हणून पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर जुगाराचा क्लब सुरू आहे. 24 तासातील 24 तास सुरू असणारा हा जुगाराचा क्लब आहे. या जुगार क्लब लगतच स्वारगेट पोलीस स्टेशन व स्वारगेट पोलीस लाईन वसाहत व जवळच खडक पोलीस स्टेशन आहे. असे असताना देखील एवढा मोठा जुगाराचा क्लब 24 तास सुरू आहे. परंतु एवढ्यावरच न थांबता संपूर्ण स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत दुसऱ्या इसमाने एकूण 15 मटका जुगार अड्डे व दोन जुगाराचे क्लब मागील अनेक महिन्यांपासून सुरू केले आहेत. पोलीस नियंत्रण कक्षासह पोलीस आयुक्त कार्यालयाला खबर देऊन देखील मागील 72 तासात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. यावरून पुणेकरांनी नेमका कोणता बोध घ्यायचा असा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवाजीनगर न्यायालयातील वाढत जाणारी आरोपी, गुन्हेगार, कैदयांची संख्या पाहता यांच्या कृतीला नेमकं कोण जबाबदार आहे? यांचा आदर्श नेमके कोण आहेत ? यांना पाठीशी नेमकं कोण घालत आहे? यांच्या मनांत पोलीस आणि कायद्याविषयी जरब का निर्माण होत नाही, असेही प्रश्न निर्माण होत आहेत.
गुन्हेगार पकडून कोर्टात हजर करणे म्हणजे कायदयाची अंमलबजावणी होते असे म्हणायचे काय-
पुणे शहर पोलीस कायद्याची (परिणामकारक) अंमलबजावणी करीत असताना प्रत्येक प्रकरणांबाबत कोर्ट कारवाई केली म्हणजे विषय संपला असे न करता, त्या गुह्याच्या मुळाशी जाऊन ही परिस्थिती नेमकी पुणे शहरात का निर्माण झाली आहे त्याबाबत योग्य ते अन्वेषण करून किंवा ज्या कायद्यांमध्ये त्रुटी राहिली असेल त्याबाबत कायदेमंडळ अर्थात राज्य शासनाला कळवून त्यात दुरुस्त्या करून घेणं हा देखील पोलीस विभागाचा महत्त्वाचा भाग आहे. तथापि कारवाई करणं, गुन्हे दाखल करणे आणि हात वर करून थांबणे या वृत्तीमुळे पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल का? याविषयी शंका निर्माण होत आहे. याबाबत पुणे शहर पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करणंच उचित ठरणार आहे.
गुन्हेगार हे राजकीय पक्षांसह सावकारांचे रॉ मटेरिअल आहेत काय –
गुन्हेगार, आरोपी, कैदी हे सध्या राजकीय पक्षांसह खाजगी सावकार, मटका जुगार अड्डे चालविणारांचे रॉ मटेरियल झाले आहे. राजकीय पक्षांना कुठल्याही प्रकारचे ध्येय धोरण राहिलेलं नाही. कुठलीही चळवळ अस्तित्वात नाही. त्याकारणामुळे सर्वसामान्य नागरिक. स्वयंसेवक म्हणून, कार्यकर्ता म्हणून, पुढे यायला तयार नाही. त्यामुळे हे आरोपी, गुन्हेगार, कैदी त्यातल्या त्यात तडीपार गुन्हेगार, जबर गुन्हे दाखल असलेले आरोपी, गुन्हेगार हे राजकीय पक्षांचे रॉ मटेरियल झाले आहेत की काय असाही एक प्रश्न निर्माण होत आहे.