Thursday, November 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

खडकी व विश्रांतवाडीतील अपराध्यांच्या गैरकृत्यांना वरीष्ठ पोलीसांची संमती… तडीपार व रेकॉर्डवरील गुन्हेगार अवैध धंदयावर रायटर,पंटर म्हणून काम करीत असल्यास त्याचे श्रेय नेमके कुणाला…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षमतेची पराकाष्ठा करून दखलपात्र अपराधांच्या घटनेसंबंधीची किंवा असे अपराध करण्याच्या बेतासंबंधीची माहिती मिळवणे, ते वरिष्ठांकडे सादर करणे, अपराद्यांना न्यायालयासमोर आणण्यासाठी तसेच अपराधास प्रतिबंध करण्यासाठी सर्वोत्तम अशा कायदा व वरिष्ठांचे आदेश यांच्याशी सुसंगत असलेल्या उपाययोजना करणे आणि गुन्ह्याचा प्रतिबंध व अन्वेषण करण्यासंबंधी मुंबई पोलीस अधिनियमात तरतुदी आहेत. तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने पोलिसांना कायदेशीरपणे दिलेल्या प्रत्येक आदेशिकेचे तत्परतेने पालन करणे, त्याची बजावणी करणे आणि वरिष्ठांनी दिलेल्या आज्ञा सर्व कायदेशीर मार्गाने अमंलात आणणे बाबत सक्त तरतुदी आहे.तथापी खडकी व विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अपराधाचा बेत आणि प्रत्यक्ष अपराध घडत असताना देखील, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कायद्याची व वरिष्ठांच्या आदेशांची अवज्ञा केली जात असल्याची बाब दिसून येत असल्याचे हद्दीतील अपराधिक गैर कृत्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित अपराधी व वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांची अवज्ञा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तनाचा ठपका ठेवून त्यांच्या विरुद्ध कारवाई होणे अपेक्षित आहे.

खडकी व विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे पोलिसांना कायदेशीरपणे दिलेल्या आदेशिकेचे पालन होते का-
पुणे शहरातील वाढती लोकसंख्या, लोकसंख्येच्या घनते बरोबरच अपराध करणाऱ्यांची, कायद्याची अवज्ञा करणाऱ्यांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर आतापर्यंत मोक्का कायदयानुसार सुमारे 37 व एमपीडीए कायद्यान्वये सुमारे 30 अपराधिक इसमांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले आहे. शेकडो गुन्हेगार इसमांना तडीपार करण्यात आले आहे. तथापी अपराधिक इसम व तडीपार इसमांकडून पुनः पुनः पुणे शहरातील कायदा आणि व्यवस्थेचा प्रश्न गंभिर केला जात आहे. दरम्यान स्थानिक पोलीसांकडून संबंधित गुन्हेगार अपराधिक इसमांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना हद्दीत अवैध मटका जुगार अड्डे, रमी, क्लब सारखे आर्थिक उत्पन्नाची साधने निर्माण करून त्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम केले जात असल्याचे दिसून येत आहे.

बहुतांश अवैध व बेकायदेशिर धंदयाच्या मालकासह येरवड्याच्या मांडवा खालुन आलेल्यांना रायटर व पंटर म्हणून काम दिले जात आहे. अपराधिक गैरकृत्य करणे आणि बेकायदेशिर अवैध धंदे चालविणे हाच एककलमी कार्यक्रम सुरू असतो. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ठरत आहे.

खडकी मधील भयानक वास्तव –
काल शनिवार 22 जुलै रोजी खडकी येथील अवैध गैरकृत्यांची खबर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील पोलीस नियंत्रण कक्षाला कळवुन, पोलीस किती वेळात येतात याची ग्राऊंउवर जावुन माहिती घेतली असता, स्थानिक पोलीस किंवा बिट मार्शल अर्धा तास झाले तरी गुन्ह्याच्या घटनास्थळावर आले नव्हते. याबाबत पुनः पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले तरी देखील पोलीस आले नव्हते. खडकीतील रेल्वेच्या अलीकडील भाग आणि रेल्वेपलीकडील असे दोन भाग केल्यास, अलिकडे दोन आणि पलिकडे बाजारात अशा बहुतांश ठिकाणी अपराधिक इसमांकडून गैरकायदयाचे कृत्य केले जात असल्याची बाब पोलीसांना कळवुन देखील पोलीस हजर झाले नाहीत.

दरम्यान वरीष्ठ पोलीस अधिकारी माझ्या शब्दाबाहेर नाहीत, त्यामुळे माझ्यावर, किंवा आमच्यावर कारवाई होणार नाही, कुणी कितीही बोंबललं तरी त्याचा काही उपयोग होणार नसल्याची दर्पोक्ती केली जात आहे. यावरू स्थानिक पोलीसांकडून कायदयाची अवज्ञा करणाऱ्या अपराधिक इसमांवर कारवाई करण्याऐवजी ते कारवाई करीत नाहीत. नियंत्रण कक्षाला कळवुन देखील गुन्ह्याच्या ठिकाणी पोलीस येत नसतील तर खरोखरच अपराधिक इसम दर्पोक्ती करीत नसून त्यात वास्तव असल्याचे जाणवत आहे. याच कारणामुळे खडकी पोलीस स्टेशन मधुन दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, तरी त्यात सुधारणा होत नसतील तर आयुक्तालयाने खडकी पोलीस स्टेशनचा कारभार, पोलीस आयुक्तालयाच्या सनियंत्रणाखाली घेणे आवश्यक ठरत आहेत.

विश्रांतवाडीत पोलीसांची विश्रांती-
खडकीतील काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांनी शांतीनगरात अशांती निर्माण केली आहे. पोलीस स्टेशनच्या लगत असलेल्या राजीव गांधी नगर, पुढे मच्छी मार्केट भिमनगर, वडारवाडी येथेही अपराधिक इसमांनी गैरकृत्यांची बेकायदेशिर अवैध धंदे सुरू केले आहेत. सध्या विश्रांतवाडीत तर अंमली पदार्थांची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालाकडील अंमली पदार्थ विरोधी गुन्हे शाखेच्या पथाने आत्तापर्यंत तीन वेळेस विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अंमली पदार्थावर मोठी कारवाई केली आहे. मटका जुगार अड्डे, रमी, पत्ते क्लब, पणती,पाकोळी सारखे सोरट, अंमली पदार्थ आणि त्याच बरोबर जागोजाग हातभट्टी विक्री केली जात आहे. हे सर्व अपराधिक इसमांकडून अवैध स्वरूपाचे व्यवसाय कायदयाची अवज्ञा करून केले जात आहेत. याबाबत तक्रारी आल्यानंतर देखील कारवाई होत नाही. त्यामुळे सध्या विश्रांतवाडी पोलीस विश्रांतीवर गेले आहेत की काय अशी शंका येत आहे.
असेही कोंम्बिंग ऑपरेशन –
पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार व सहपोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या कठोर आदेशानंतर, पोलीस स्टेशन निहाय, झोन निहाय कोम्बिंग ऑपरेशन केले जात आहे. त्या त्या विभागातील गुन्हेगार चेकींग केले जात आहे. त्यात काही अपराधिक इसम आढळुन येत आहेत, तर काही तडीपार इसम पुणे शहरात बेकायदा वास्तव्य करीत असल्याचे बहुतांश ऑल आऊट ऑपरेशन मध्ये आढळुन आले आहे. थोडक्यात सक्षम प्राधिकाऱ्याने पोलीस अधिकाऱ्याला कायदेशीरपणे दिलेल्या प्रत्येक आदेशिकेचे किंवा इतर आदेशांचे तत्परतेने पालन करणे व बजावणी करणे आणि त्यांच्या वरिष्ठाने दिलेल्या आज्ञा सर्व कायदेशीर मार्गाने अंमलात आणणे हे कर्तव्य असतांना देखील त्या कर्तव्यात कसुरी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे होणारे कोंम्बिंग ऑपरेशन नामधारी होत आहे की काय अशी शंका येत आहे.

स्थानिक पोलीस स्टेशन व तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर गृहविभाग, मुंबई पोलीस अधिनियम याव्दारे मोठी जबाबदारी दिलेली आहे. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांबद्दल आणि गुन्ह्याचे वृत्त योग्य रितीने नोंदविले जाते किंवा कसे तसेच गुन्ह्यांचा तपास योग्य रितीने होत असल्याबाबत पाहण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांची आहे. पोलीस नियंत्रण कक्षाकडून पहिला कॉल हा पोलीस निरीक्षक यांच्याकडे जातो, त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार बिट मार्शल गुन्ह्याच्या ठिकाणी हजर राहून कर्तव्य पार पाडत असतात. त्यामुळे नियंत्रण कक्षाकडून आलेल्या कॉल्सवर उत्तर देण्याची जबाबदारी निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचीच आहे. तरी देखील कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.