Tuesday, December 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

महागाईचा महाउद्रेक

पुणे/दि/अच्छे दिनाचे वादे करून लोकांना फसवणार्‍या केंद्रातील भाजपा सरकारने महागाईवर नियंत्रण मिळवले नसून या महागाईत गरीब मात्र होरपळताना दिसत आहे. भारतातील महागाई १४.२३ टक्क्यांच्या उच्चांकी पातळीवर गेली असल्याने आज गरीबासमोर जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
यापूर्वी डिसेंबर १९९१ मध्ये इतकी उच्चांकी पातळी होती. देशात घाऊक महागाई वाढण्याचा दर एप्रिलनंतर सलग दुहेरी अंकात आहे. केंद्राकडून मंगळवारी जारी घाऊक महागाईच्या आकडेवारीबाबत आयसीआरएच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर म्हणाल्या, ‘अंदाजापेक्षा जास्त महागाई वाढली आहे. गेल्या महिन्यात किरकोळ महागाई दर ५ टक्केपेक्षा कमी होता. घाऊक महागाई १४ टक्क्यांवर गेली आहे. यामुळे आगामी दिवसांत सामान्य ग्राहकांवर त्याचा परिणाम होणे अटळ आहे. महागाई वाढीच्या आंतरराष्ट्रीय कारणांचा परिणाम फक्त भारतावरच झालेला नाही. सामान्यपणे महागाई वाढीचा कमी दर असलेल्या अमेरिका, इटली, स्पेन, जर्मनी, सिंगापूर आदींतही नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई २० टक्क्यांपर्यंत गेली आहे.
खाण्यापिण्याच्या पदार्थांचे दर दुप्पट वेगाने वाढले, भाजीपाल्याच्या महागाईचा १३ महिन्यांचा उच्चांक कच्चे तेल, नैसर्गिक वायू, धातू आदींतील दरवाढीमुळे नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई वाढली आहे. कच्चे तेल नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत ३९.८१ टक्के महागले आहे. ही आकडेवारी यासाठी भीतिदायक आहे की, नोव्हेंबरमध्ये फूड इंडेक्सचे (खाण्यापिण्याच्या वस्तू) दर ६.७० टक्के दराने वाढले आहेत.
ऑक्टोबरमध्ये ते ३.०६ टक्के वाढले होते. तज्ज्ञांनुसार, आगामी दिवसांत खाण्यापिण्याच्या वस्तू महाग होऊ शकतात. भाजीपाल्याचा महागाई दर १३ महिन्यांच्या ४.९ टक्के या उच्चांकी पातळीवर गेले आहेत. ते ऑक्टोबरमध्ये फक्त १.७ टक्के होते.