Tuesday, December 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पतीचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी पत्नीचा राडा, २०० कोटीचा गैरव्यवहार – शासकीय कामातील अडथळा आणल्याचे प्रकरण दडपून टाकण्याचे पुणे महापालिकेतील अधिकार्‍यांचे प्रयत्न

कनिष्ठ अभियंत्यांची बदली… हाकलपट्टी की प्रकरण दाबुन टाकण्यासाठी करण्यात आलेले नाटक…..


पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
माहितीच्या अधिकारात अपिल सुनावणी सुरू असतांना, कनिष्ठ अभियंत्यांच्या पत्नीने प्रथम अपिल सुनावणीत अर्जदाराला धक्का मारल्याचा बहाणा करून, त्यांना शासकीय कार्यालयात गलिच्छ शिवीगाळ करून चल इथून निघुन जा म्हटल्याचे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे. पतीचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी पत्नीने पुणे महापालिकेत राडा घातल्याने सगळीकडे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत अर्जदार श्री. दीक्षित यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे महापालिकेकडे करण्यात आलेली असतांना, आज एक आठवडा उलटून गेला तरी कनिष्ठ अभियंत्याच्या बदलीखेरीज कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने, पत्नीचे राडा प्रकरण दाबुन टाकण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. रामचंद्र शिंदे यांची बदली बीओटीत केल्याचे आदेश काढण्यात आले असतांना देखील आज सोमवार पर्यंत त्यांनी पदभार सोडला नव्हता. शिंदेंची बदली हा एक बहाणा असून, गैरकृत्य लपविण्यासाठी निव्वळ कागदी घोडे नाचविले असल्याचे दिसून येत आहे.

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात २०० कोटींचा गैरव्यवहार लपविण्यासाठी गुन्हेगारी टोळ्या व तृतीयपंथी इसमांचा वापर करून नागरीकांना छळले जात असल्याची तक्रार पुणे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती. तथापी आता पुणे महापालिकेत गैरव्यवहार व भ्रष्टाचार लपविण्यासाठी महिलांचा वापर करण्यात येत असल्याचे गैरव्यवहाराची मोठी साखळी असल्याचा संशय येत आहे. बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदे यांच्या विरोधात गैरव्यवहार केल्याप्रकरणी मागील तीन वर्षात सुमारे २५० पेक्षा जास्त तक्रार अर्ज नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले होते. 
तसेच आमदार तुपे यांचे निकटवर्तीयांना बांधकाम प्रकरण मंजुरीसाठी सुमारे ५० लाख रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण झाले असतांना देखील रामचंद्र शिंदे यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली नव्हती. दरम्यान रामचंद्र शिंदे यांने सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ऍट्रॉसिटी कायदयाखाली गुन्हे दाखल करण्याची धमकी देवून नागरीकांना माहिती मागविण्यापासून परावृत्त करण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. याबाबतही मोठ्या संख्येने तक्रार अर्ज पुणे महापालिकेत दाखल आहेत. 

प्रकरण दडपण्याचे प्रयत्न –
दरम्यान रामचंद्र शिंदे यांच्या पत्नीने शासकीय कामात अडथळा आणून कार्यालयीन कामकाजात अडथळा आणला आहे. यामुळे त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करणे अपेक्षित असतांना देखील, पुणे महापालिकेतील नगरअभियंता कार्यालयाने गुन्हा दाखल करण्याबाबत कोणत्याहीप्रकारची कार्यवाही केली नाही. यामुळेच सामजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी, अपचारी कर्मचारी व त्याच्या पत्नीने कार्यालयात घातलेल्या राडा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात, पुणे महापालिकेला पंचांग बघून गुन्हा दाखल करण्यासाठी मुहूर्त शोधत आहेत काय असा उद्वीग्न सवालही करण्यात आलेला आहे.
पुणे महापालिकेत चुकीचे पांयडा पाडू नका –
पुणे महापालिकेतील बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदे यांनी केलेले गैरव्यवहार लपविण्यासाठी श्री. शिंदे यांच्याकडून नागरीकांना ऍट्रॉसिटीची धमकी देणे, नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांविरूद्ध पोलीसात परस्पर तक्रारी करणे, बिल्डरांच्या गुन्हेगारी टोळ्या, तृतीयपंथी इसम आणि आता स्वतःच्या पत्नीचा वापर करण्यात आलेला आहे. माहिती अधिकारातील प्रथम अपिल अर्जाची सुनावणी सुरू असतांना, अचानकपणे कनिष्ठ अभियंत्यांच्या पत्नीने कार्यालयात घुसून राडा केल्या प्रकरणी त्यांच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. परंतु त्याबाबत शहर अभियंता कार्यालय, महापालिका आयुक्त कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होतांना दिसत नाही. अशा प्रकारे पुणे महापालिकेची बदनामी व नाचक्की होत असतांना, त्यावर पांघरून घालुन चुकीचे पायंडे पुणे महापालिकेत पाडले जात आहेत. तरी अशा प्रकारचे चुकीचे पायंडे पुणे महापालिकेत पाडू नका असे आवाहन सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केेल्या आहेत.


श्रीकांत गायकवाड व वरीष्ठ अधिकार्‍यांची बघ्याची भूमिका –
शासकीय कामकाज नियमावलीनुसार माहिती अधिकारातील प्रथम अपिल अर्जाची सुनावणी सुरू असतांना, माहिती अधिकारी यांनी आरडा ओरडा करून, त्याच्या पत्नीला इशारा करण्यात आला. आरडा ओरडा सुरू असल्याचा इशारा ऐकुणच कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदे यांच्या पत्नीने सरकारी कार्यालयात बेकायदा घुसून अर्जदार यांना गलिच्छ शिवीगाळ करण्यात आली. तसेच नागडा करून मारीन अशी धमकी देवून, अर्जदार यांना कार्यालयात मारहाण करण्यात आली असल्याचे व्हिडीओ समोर आला आहे.
यावेळी प्रथम अपिल अधिकारी यांनी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांच्या पत्नीला रोखणे आवश्यक होते. माहिती अधिकार अपिल सुनावणी संपल्यानंतर, कार्यालयाच्या बाहेर जावून काय करायचे ते करा असे सांगणे अपेक्षित होते.
परंतु श्रीकांत गायकवाड यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. तसेच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व वरीष्ठ अधिकार्‍यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने, संशयाची सुरी देखील आता श्रीकांत गायकवाड यांच्या सहित वरीष्ठ अधिकार्‍यांकडे वळली आहे. २०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात श्रीकांत गायकवाड आणि वरीष्ठ अधिकार्‍यांचा संबंध आहे काय अशीची चर्चा सध्या माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.
घडलेला सर्व प्रकार अनुचित आणि गैर स्वरूपाचा होता. या सगळ्या प्रकरणांमुळे पुणे महापालिकेची नाचक्की झाली आहे. अशा परिस्थितीत बघ्याची भूमिका न घेता, पुणे महापालिकेची प्रतिष्ठ राखणे आवश्यक आहे. गैरकृत्य करणार्‍यांना वेळीच रोखणे आवश्यक आहे. अन्यथा पुणे महापालिकेत भ्रष्टाचार करणारे अधिकारी व कर्मचारी आपआपल्या पत्नीला मध्यस्थ करून अर्जदारांसहित अधिकार्‍यांना देखील टार्गेट करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पुणे महापालिकेत अनुचित स्वरूपाचे पायंडे पाडू न देता वेळीच गैरकृत्यांना आळा घालणे आवश्यक आहे. तसेच गैरकृत्य केल्याप्रकरणी रामचंद्र शिंदे व त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. २०० कोटीत सहभागी असलेल्या व नसलेल्या अधिकार्‍यांनी पुढे येवून पुणे महापालिकेची प्रतिष्ठा जपणे आवश्यक आहे. दोषींवर कारवाई होणे अगत्याचे आहे.


कनिष्ठ अभियंत्यांची बदली… हाकलपट्टी की प्रकरण दाबुन टाकण्यासाठी करण्यात आलेले नाटक…..
बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदे यांनी केलेल्या गैरकृत्यामुळे पुणे महापालिकेची व बांधकाम विभागाची अप्रतिष्ठा झाली आहे. त्यामुळेच रामचंद्र शिंदे यांची बदली बीओटी विभागात करण्यात आली आहे. ही बदली आहे की हाकलपट्टी हा प्रश्‍न असला तरी २०० कोटी रुपयांचे गैरव्यवहार प्रकरण दाबुन टाकण्यासाठीच त्यांच्या बदलीचे नाटक करण्यात आले असल्याचा आरोप सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी केला आहे.
नियमानुसार दर तीन वर्षांनी बदली होतेच. परंतु रामचंद्र शिंदे हे तीन वर्षापेक्षा अधिक काळ बांधकाम विभागात कार्यरत असल्याने त्यांची बदली अपेक्षित होती. परंतु त्यांनी केलेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची चौकशी कधी करणार हा प्रश्‍न आहे. प्रकरण दाबुन टाकण्यासाठीच बदली करण्यात आली आहे. ही हाकलपट्टीही असू शकते. परंतु संपूर्ण निलंबन झाल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नसल्याची प्रतिज्ञा सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे.


बदली प्रकरणाची स्टंटबाजी – कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार-
रामचंद्र शिंदे यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारचे कृत्य केले असे नाही तर औंध क्षेत्रिय कार्यालयात असतांना देखील उभयतांची भांडणे मोठ मोठ्यानी झाली होती. पुन्हा दुसर्‍या कार्यालयातही अशाच प्रकारची भांडणे झाली होती. आता पुणे महापालिकेच्या मुख्य कार्यालयाजवळ अशा प्रकारची भांडणे करून, श्री. शिंदे हे किती कर्तृत्ववान आहेत हे त्यांनी वेळोवेळी दाखवुन दिले आहे.
सध्याही त्यांची बदली बीओटी सेल मध्ये करण्यात आली आहे. बदलीचा आदेश गुरूवारी काढण्यात आला आहे. शुक्रवार ते रविवार सुट्टी होती. आता सोमवारी त्यांच्या बदलीचे आदेश देवडे यांच्याकडे दिली असल्याची माहिती शहर अभियंता कार्यालयातील श्री. गवळी यांनी दिली आहे. तसेच शहर अभियंता यांच्या अधीक्षक कार्यालयाकडे याची प्रत देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. तथापी गुरूवारी आदेश काढल्यानंतर, तातडीने पदभार सोडणे अपेक्षित होते. परंतु श्री. शिंदे यांनी पदभार सोडलेला नाही. यावरून बदली आदेश हा केवळ बहाणा असून, श्री. शिंदे यांना पाठीशी घालण्यासाठी केवळ कागदी घोडे नाचविण्यात आले आहेत.
ते काहीही असले तरी श्री. शिंदे व त्यांच्या पत्नीने शासकीय कार्यालयात बेकायदा घुसून पुणेकरांना शिवीगाळ करणे, मारहाण करण्याचा निंदनिय प्रकाराचा निषेध सगळीकडे होत आहे. अशा परिस्थितीत श्री. शिंदे यांना तातडीने पदभार सोडावयास लावुन, संबंधित बेकायदा घुसलेल्या महिलेविरूद्ध कारवाई होणे आवश्यक आहे. याबाबत पुणे महापालिकेने कार्यवाही न केल्यास, पुढील कार्यवाही करावी लागेल अशी माहिती माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी दिली आहे.


दीक्षितांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली –
दरम्यान आज सोमवार सायं ६ वाजण्याच्या सुमारास माहिती समोर आली आहे की, दीक्षितांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली आहे. दीक्षितांना गाफिल ठेवून, चर्चेच्या फेर्‍यात ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. सोमवारी सांयकाळ पर्यंत ही माहिती आली आहे. तसेच श्री. दीक्षितांना संबंधित महिला ही कनिष्ठ अभियंत्यांची पत्नी असून, ती अनु. जाती संवर्गातील असल्याचे माहिती असल्यानेच त्यांनी केल कृत्य केले आहे अशी शेवटची ओळही वाचण्यात व ऐकण्यात आली आहे. आत दीक्षित नेमकं काय करतायत हे पाहणे आत्स्युक्याचे ठरले आहे.